yuva MAharashtra ठाकरेंची शरद पवारांकडे पाठ तर भुजबळांनी घेतली गाठ ! उलटसुलट चर्चाना ऊधान !

ठाकरेंची शरद पवारांकडे पाठ तर भुजबळांनी घेतली गाठ ! उलटसुलट चर्चाना ऊधान !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ जुलै २०२४
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या उलथापालथ होत असून, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आणि तत्पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीने, ठाकरे गटाला एकटे पाडण्याचा डाव रचला असल्याचा आरोप केला जात होता. दोन दिवसापूर्वी याचे पडसाद पहावयास मिळाले. शरद पवार यांनी ठाकरे यांना अनेक वेळा केलेला फोन त्यांनी उचललाच नाही. दुसरीकडे संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाध्यक्षांना जिल्ह्यातील मतदारांचा कल घेण्यास सांगितले होते. जर वेळ पडलीच तर ठाकरे गट राज्यात स्वतंत्र निवडणुकीस सामोरे जाण्याची चर्चा त्यावेळी झाली.

इकडे विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची स्वतःची ताकद लक्षात आल्याने 'एकला चलो रे' ची भूमिका घेता येते का ? या दृष्टीने सर्व विधानसभा मतदारसंघातून अर्ज मागवण्याची पावले उचलली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


या पार्श्वभूमीवर आज सकाळी वारंवार शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडणारे छगन भुजबळ सिल्वर ओक वर पोहोचले. महाआघाडीत ज्याप्रमाणे ठाकरे गट अस्वस्थ आहे, तसाच महायुतीत अजित पवार गट अस्वस्थ आहे. लोकसभा निवडणुकीत या गटाला एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यांना स्वतः फिल्डवर लढावे लागले. त्यामुळे आता तिसरी आघाडी स्थापन करता येते का ? यासाठी छोट्या छोट्या पक्षांना एकत्र करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा अंदाज घेतला जात असून याचीच चाचपणी सध्या सुरू असल्याची चर्चा ऐकू येत आहे. 

मात्र आज झालेली ठाकरे-भुजबळ भेट ही राजकीय नसून सध्याच्या तणावग्रस्त सामाजिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी असल्याचा खुलासा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. शरद पवार यांनी ओबीसी विरोधात भूमिका घेतल्याने, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी सांगितले आहे.



आता ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानापर्यंत राजकीय वारे कसे कसे फिरते, यावर कुठला गट कुणाच्या दावणीला बांधला जातो, हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.