Sangli Samachar

The Janshakti News

शेतकऱ्यांच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांती आणेल - शरद पवार


| सांगली समाचार वृत्त |
कवठे एकंद - दि. ८ जुलै २०२४
जगभर झपाट्याने प्रसारित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर सर्वप्रथम राजाच्या ऊस शेतीत होत आहे. या तंत्राचा वापर पुढे सर्व पिकांमध्ये होणार असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येईल. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे हे संशोधन देशाच्या कृषी क्षेत्रात महिलाचा दगड ठरेल असा विश्वास शरद पवार यांनी तासगाव येथे बोलताना व्यक्त केला.

कवठे एकंद येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शासनावर तर टीका केलीच परंतु शेतकऱ्यांचेही कान टोचले. यावेळी बोलताना ते म्हणाले की एकदा उसाची लागवड केली की नंतर थेट ऊस कारखान्याला घालवायला शेतकरी उसाकडे लक्ष देतो आणि जगाच्या राजकारणाची चर्चा करीत बसतो. मात्र शेतीच्या गुणवत्तेकडे तो लक्ष देत नाही. शेतीची उत्पादकता टिकवण्यासाठी जमिनीचा पोत सुधारण्याचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी हाती घेतला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.


ऊस हे आळसाचे पीक झाले असल्याचे सांगून शरद पवार यांनी वीज फुकट देण्याचे धोरण सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे आता पंप बंद करायला शेतात कोण जाईल ? सरकारने दिलेल्या सवलतीचा गैरवापर करू नका, असा सल्लाही त्यावेळी यावेळी शेतकऱ्यांना दिला. 

ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रावर आधारित हवामान बदलास सक्षमपणे तोंड देणाऱ्या प्रकल्पाचा प्रारंभ पुण्यात झाला, असे सांगून शरद पवार पुढे म्हणाले की, ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व बारामतीमधील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या तीन प्रख्यात संस्थांनी हा प्रकल्प तयार केला आहे. तीन वर्षे बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात चाचण्या घेतल्यानंतर आता एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रयोग राबविला जात आहे. ते पुढे म्हणाले की, राज्यात ऊस महत्त्वाचे पीक असल्याने तेच या प्रकल्पासाठी प्रथम घेतले गेले. या पिकाच्या काही समस्या आहे. सतत अतिरिक्त पाणी व खतांचा वापर ऊस शेतीत केला जात आहे. त्यामुळे समस्या उद्भवल्या आहेत.

उत्पादकता व साखर उतारा देखील कमी होतो आहे. परंतु आता ऊस शेतीमधील या समस्यांची सोडवणूक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राद्वारे होऊ शकेल, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी आ. सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.