| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी आणि महायुतीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. याचाच आढावा घेण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव व सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप महाराष्ट्रात 150 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहे. पुणे येथे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन २१ जुलै रोजी संपन्न होणार असून, यामध्ये याबद्दलची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याशीही चर्चा करणार आहेत. यानंतरच यावर शिक्कामर्थक होईल असे समजते.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला माहितीत सहभागी करून घेतल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संलग्न विवेक या मराठी साप्ताहिकामध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार भाजपवर ताशेरे ओढण्यात आले होते. पुणे येथील महाराष्ट्र भाजप कार्यकारणीच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत 48 पैकी भाजपला फक्त नऊ जागा जिंकता आल्या होत्या, ज्यावरून मोठे घामासान पाहावयास मिळाले.
आता महायुती मधील घटक पक्ष भाजपला किती जागा देतो यावर निवडणुकीस सामोरे जाण्याचे करण्यात येईल. आगामी विधानसभा निवडणुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखालील लढली जाईल, असे बोलले जात असतानाच, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेत असलेले विनोद तावडे यांच्याकडे ही सूत्रे सोपवण्यात येत असल्याचे चर्चाही भाजप अंतर्गत सुरू असल्याचे समजते.