| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ जुलै २०२४
कृष्णा नदीच्या पुराने 39 फुटाची पाणी पातळी गाठल्यानंतर नदी काठावरील काही घरात पाणी शिरले. येथील नागरिकांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावले ते सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि त्यांची टीम. केवळ शाब्दिक धीर न देता, त्यांनी या भागातील नागरिकांना स्वखर्चाने महापालिकेच्या निवारा केंद्रात हलवलेच, परंतु त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही चोख बजावली. या मदत कार्याची चर्चा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि कदाचित म्हणूनच की काय या कार्यात खोडा घालण्याचे राजकारण काही जणांकडून सुरू झाल्याचा आरोप होत आहे.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असले तरी, त्यांच्या आरोग्याची वेळेवर तपासणी होणे गरजेचे होते. हे महत्त्वपूर्ण काम पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनने हाती घेतले आहे. परंतु, पुराने बाधित लोकांच्या निवारा केंद्रात आरोग्य कॅम्प घेण्याच्या मुद्यावर महापालिका अधिकारी आणि पृथ्वीराज पाटील फौंडेशन पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली.
आरोग्य कॅम्पला मान्यता देण्याबाबत अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षातील काही मंडळींकडून दबावतंत्र वापरले जात आहे, असा आरोप फौंडेशनतर्फे करण्यात आला. या गंभीर स्थितीत सेवा कार्यात राजकीय अडथळे नकोत, अशी विनंती काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी केली. त्यानंतर कॅम्पला मान्यता देण्यात आली. विरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त रवीकांत आडसुळ यांच्याशी चर्चा केली. दोन्ही अधिकाऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढला.
गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेज आणि पृथ्वीराज पाटील फौंडेशनतर्फे सुमारे चारशेहून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पूरबाधितांना नियमित तपासणीसह मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार रुग्णांना विशेष सेवा देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. या कॅम्पबाबत महापालिका पातळीवर काही अडथळे येत असल्याने वातावरण तापले. अधिकाऱ्यांनी खासगी कॅम्प नकोत, अशी भूमिका घेतली होती. यामागे राजकारण केले जात असल्याचा आरोप फौंडेशनतर्फे करण्यात आला.
आरोग्य सेवा या काळात महत्वाची आहे. कॅम्प कोणत्याही पक्षाचे असू देत, त्याला अडथळा आणू नका, अशी भूमिका फौंडेशनतर्फे अध्यक्ष बिपीन कदम यांनी घेतली. विरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना याबाबत माहिती देत आरोग्य सेवेत राजकारण नसावे, अशी विनंती केली. त्यांनीही सर्व सहकार्य केले जाईल, असा शब्द दिला. परंतु, आज सकाळी १७ नंबर शाळेत वाद उफाळून आला. आरोग्य सेवा द्या, मात्र फलक लावायचा नाही, असे काहींचे म्हणणे होते. त्यावर वीरेंद्र पाटील यांनी ‘असे करण्यासाठी कुणाचा दबाव आहे का ? आमचा फलक लागला म्हणून कुणाचे नुकसान होणार आहे का ? महापालिका या काळात लोकसेवा महत्वाची मानते की राजकारण ? ज्यांनी दबाव टाकला आहे ते महापूर काळात कुठे आहेत ? दुचाकीवरून फिरून मदत उभी राहत नाही, त्याला पुराच्या पाण्यात उतरावे लागते’, अशा शब्दांत उत्तर दिले. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा उत्तम काम करत आहे, त्यांनी राजकीय दबावाला बळू पडू नये, या काळात उभी राहणारी सर्व मदत महत्वाची आहे, अशी भूमिका पृथ्वीराज पाटील यांनी मांडली. अखेर कॅम्पला परवानगी देण्यात आली.
यावेळी पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम, माजी नगरसेवक तौफिक शिकलगार, करीमभाई मेस्त्री, निसार संगतरास, कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनित धोतरे, टिपू बारगीर, सोहेल बलबंड, विश्वास माने, वसीम आमिन, आशिष चौधरी, सूर्यकांत लोंढे, बाबगोंडा पाटील, सलमान मेस्त्री, कैसे जमादार, सरफराज शेख, नामदेव चव्हाण, अज्जू बेग, फाउंडेशनचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रकारामुळे महापुराने त्रस्त झालेल्या नागरिकांना होत असलेल्या मदत कार्यातही राजकारण आणले जात असल्यामुळे, सर्वत्र टीकेची झोप उठवण्यात येत आहे. केवळ पृथ्वीराज पाटील यांची वाढती लोकप्रियता रोखण्यासाठीच हा घाट घातला जात आहे का असा सवालही केला जात आहे. सांगलीचे लोकप्रिय महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, यांनी या कठीण काळात स्वतः ग्राऊंड लेव्हलवर उतरत अतिशय सुरेख, नियोजनबद्ध कार्य केले आहे. परंतु काही लोकांच्या कटकारस्थानामुळे महापालिकेच्या या चांगल्या कार्यास गालबोट लागू शकते. त्यामुळे या पुढील काळात मदत कार्यात कोणता पक्ष, कोणता गट, कोणती संघटना आघाडीवर आहे हे न पाहता, राजकारण आडवे न येऊ देता, मिळेल त्यांची मदत घेण्याची कर्तव्यभूमिका महापालिकेने घ्यावी अशी, अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.