yuva MAharashtra नको रे मना क्रोध हा खेदकारी ! (✒️ राजा सांगलीकर)

नको रे मना क्रोध हा खेदकारी ! (✒️ राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बेंगळुरु - दि. ९ जुलै २०२४
माझ्या मनातील “तो” नेहमीचा कोपरा आज तसे कांही कारण नसतांनाही कुठुन तरी उद्भवला आणि मला सांगू लागला, 

“राजा, तूझ्या चिडखोर, रागीट स्वभावामुळे तू स्वतःसाठी अडचणी निर्माण करतोस, स्वतः दुःखी होतोस व इतरांना दुःखी करतोस. स्वतःचेच नुकसान करून घेतोस. तुझ्या या रागीट स्वभावापायी कित्येक हितचिंतक व मित्र तू गमावले आहेस. लोक तूझ्या तोंडावर व मागेही तुझी निंदा करतात. घरीदारी दिवसेंदिवस तू अप्रिय होत चालला आहेस, लोक तुला टाळतात हे तुला समजत नाही कां?”

मनातील ‘त्या’ कोप-याच्या कठोर पण सत्य बोलण्याला मी होकारार्थी मान हलवली व म्हणालो, 

“तुझे सांगणे योग्य आहे. माझ्या मनाविरूद्ध कांही घडले की मला एकदम चिड येते. रागाच्या भरात समोरील व्यक्ति, स्थळ, काळ यांचा विचार न करता तोंडाला येईल ते मी बोलतो.
कांहीच्याबाही करून बसतो. राग आल्यावर माझ्याकडून जास्त चुका होतात. नंतर मला माझ्या वागण्या-बोलण्याचा पश्चाताप होतो, नाही असे नाही. पण व्हायचा तो अनिष्ठ परिणाम झालेलाच असतो. रागावर नियंत्रण कसे करावे किंबहुना राग येऊच नये यासाठी काय करावे हे मला समजत नाही.” मी म्हणालो. 


“राजा, क्रोधाबाबत एक महत्वाची बाब समजाऊन घे. मानवाच्या सहा रिपुतील प्रमुख रिपु राग-क्रोध. याच्या तडाख्यातून कोणीही सुटलेला नाही, अगदी देवदेवता, महान ऋषीसुद्धा. भगवान शंकराला राग आला आणि त्याने कामदेवाला भस्मसात केले होते. श्रीमद् भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला ‘क्रोधात् भवति संमोहः, संमोहात् स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः, बुद्धिनाशात् प्रणश्यति।।’ असा उपदेश करणारा भ. श्रीकृष्णही, पितामह भीष्मांनी पांडव सैन्याचा केलेल्या संहाराने क्रोधीत झाला व हाती शस्त्र न धरण्याची आपली प्रतिज्ञा त्याने मोडली. 

दुर्वास, जमदग्नी या ऋषींची नावे आजही एखाद्या रागीट व्यक्तिच्या स्वभावाचे वर्णन करतांना वापरली जातात. अशा या कथातून हे स्पष्ट होते की राग सर्वानाच येतो देवादिकांना, ऋषीमुनींना, साधु-संतानाही. मी-तू तर सर्वसामान्य माणसे. रागाच्या भावनेतून ना आपली अंतीम श्वासापर्यंत सुटका आहे, ना राग येऊच नये अशी स्थिती निर्माण करणे आपल्या हाती आहे.  

परंतु, आलेला राग प्रदर्शित कसा करायचा हे ठरवणे मात्र आपल्या हाती आहे. कारण क्रोधापेक्षा तो प्रदर्शित करतांना उच्चारलेले शब्द, हावभाव, आक्रस्ताळीपणा, केलेल्या कृती, मारहाण, शिक्षा, दंड, क्रोधाच्या मूळ भावनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त घातक असतात. त्यामुळे राग आला तरी तो कशा रितीने प्रदर्शित करायचा याचे तंत्र आपल्याच भल्यासाठी आपण जाणणे जरूरीचे आहे. 

एका छोट्याशा उदाहरणावरून मला काय सांगायचे आहे हे स्पष्ट करतो. समज तुझ्या हातामध्ये सरबताने काठोकाठ भरलेला पेला आहे. तुला कुणाचा तरी धक्का लागतो आणि पेल्यातून सरबत बाहेर पडते. आता कोणी विचारले की पेल्यातून सरबत कां बाहेर पडले? तर त्याचे उत्तर ‘धक्का लागल्याने’ असेच सर्वसामान्यपणे दिले जाईल; नाही कां ? पण विचार कर, हे उत्तर योग्य आहे कां ? नाही. योग्य उत्तर आहे, ‘पेल्यामध्ये सरबत’ होते म्हणून धक्का लागल्याचे निमित्त होऊन सरबत बाहेर पडले. पेल्यामध्ये सरबताऐवजी चहा, कॉफी, दूध किंवा अन्य कोणताही द्रवपदार्थ अगदी विषसुद्धा असते तरी तेच बाहेर पडले असते नाही कां? थोडक्यात सांगायचे तर, जे आत असते तेच बाहेर येते. 

राजा, आपल्या मानवी मनाची, अंतरंगाची स्थिती द्रवपदार्थाने भरलेल्या पेल्याप्रमाणे आहे. त्यामध्ये राग, द्वेष, कटुता, अहंकार, उद्दामपणा, मस्तवालपणा, चिढ, सूड, दंड यांच्या सोबत दया, करूणा, प्रेम, शांति, आनंद, हर्ष, कृतज्ञता, शांति, विनम्रता, विनयशिलता, निःशब्दता या सा-या भावना वास करत आहेत. आपल्या अंतरंगातील या भावना व्यक्ति प्रसंगानुरूप क्रिया-प्रतिक्रियेच्या रूपाने दृश्य स्वरूपात प्रदर्शित करत असतात. मनातील दृश्यरूपाने बाहेर पडलेल्या या भावना आपले नैसर्गिक तरंग वातावरणामध्ये सोडतात, जे समोरील व्यक्तिच्या मनामध्ये त्याच्या पंचेद्रिंयाच्या माध्यमातून प्रवेश करतात व त्याच्या नकळत त्याच्या मनाचाही ताबा घेतात, त्याला आपले गुलाम बनवतात. 

त्यामुळे ज्यावेळी क्रोधाची भावना क्रिया-प्रतिक्रियेतून प्रदर्शित होते त्यावेळी क्रोधाचे तरंग वातावरणामध्ये पसरवले जातात व या तरंगांच्या कक्षेमध्ये येणा-या प्रत्येक व्यक्तिच्या मनाचा ताबा घेतात. परिणामी सर्वचजण क्रोधीत होतात आणि क्रोधाच्या क्रिया-प्रतिक्रियेची एक न संपणारी शृंखला गुंफुली जाते. ज्याप्रमाणे अग्नि त्याला धारण करण्या-यालाच नष्ट करत असतो ना, त्याप्रमाणे क्रोधही त्याला धारण करणा-याला म्हणजे ज्याला आला आहे त्याचे नुकसान करतो, त्याला संपवतो, त्याला नष्ट करतो.   

त्यामुळे राजा, आपल्याला राग आला की अंतरंगातील आपल्या कोणत्या भावनांना प्रदर्शित करायचे, कोणते तरंग वातावरणामध्ये सोडायचे किंवा अन्य व्यक्ति रागावली असले, रागाचे तरंग वातावराणामध्ये सोडत असेल तर आपण कांहीही करून क्रोधाची ही मालिका, हे तरंग खंडीत करायचे, थांबवायचे, नष्ट करायचे. क्रोधाची मालिका, तरंग खंडीत करायचे एकदा कां तुला जमले, की तुला किंवा तुझ्या परिसरातील कुणाही व्यक्तिला राग आला तरी त्याचा तुझ्यावर परिणाम होणार नाही आणि रागाच्या दुष्परिणामातून तुझी निश्चितपणे सुटका होईल.” माझ्या मनातील ‘तो’ कोपरा प्रतिक्रिया आजमवण्यासाठी कांही क्षण थांबला.


“तुझे सांगणे मला पटते. पण हे जमायचे कसे?” मनातील ‘त्या’ कोप-याला मी माझी अडचण सांगितली.  

“राजा, आलेल्या रागाला आवर कसा घालायचा हे समजण्यासाठी एक कथा मी तुला सांगतो. माझ्या मनातील ‘तो’ कोपरा कथा सांगू लागला. 
 
उपदेश : तीन दरवाज्यांच्या कसोटींचा !
एका गावांमध्ये एक वृद्ध ज्ञानी व्यक्ति राहात होती. मृत्यूसमयी त्यांने आपल्या मुलाला जवळ बोलावले व सांगितले, “मुला, हे जग सोडून जायची माझी वेळ जवळ आली आहे. तुला देण्यासाठी माझ्याकडे कोणतीही ऐहिक संपत्ती नाही. फक्त हा एक पत्र्याचा तुकडा आहे. तो मी तूला देत आहे.” 

त्या वृद्ध ज्ञानी व्यक्तिने आपल्या अंगरख्याच्या खिशातून एक पत्र्याचा तुकडा काढला व मुलाला दिला. त्या मुलाने तो पत्र्याचा तुकडा आपल्या हातात घेतला आणि तो वृद्ध फिरून एकवेळ मुलाला सांगु लागला, 

“मुला, हा पत्र्याचा तुकडा नेहमी तुझ्या जवळ ठेव. यापुढे जीवनाची वाटचाल करतांना कधीही कोणत्याही कारणामुळे तूला राग आला, मनांमध्ये क्रोध उत्पन्न झाला तर कांहीही करण्याआधी यातील मजकूर वाच आणि नंतर जे कांही करायचे आहे ते विचाराअंती कर.” 

एवढे सांगून त्या वृद्ध व्यक्तिने आपले प्राण सोडले. आपल्या वडिलांनी त्यांच्या अंतिम समयी केलेल्या उपदेशाचे पालन करत त्या मुलाने तो पत्रा सदैव आपल्या जवळ बाळगायला सुरूवात केली. 

कांही दिवस गेले. एके दिवशी एका व्यक्तिने त्या मुलाची खूप कठोर शब्दांत निर्भत्सना केली, त्याला खूप भलेबुरे बोलला. त्या मुलाला अतिशय संताप आला. संतापाच्या भरात तो मुलगा त्या व्यक्तिला खरमरीत उत्तर देणार होता. पण, मृत्यूसमयी आपल्या वडिलांनी केलेला उपदेश त्याला आठवला. आपल्या वडिलांनी मृत्यूसमयी दिलेला तो पत्र्याचा तुकडा आपल्या शर्टच्या खिशातून त्याने काढला व त्याच्यावरील मजकुर तो वाचू लागला. 

त्या पत्र्यावर तीन दरवाजे व मजकूर कोरला होता.  
उच्चारण्यापुर्वी तुझे शब्द, या तीन दरवाज्यामधून बाहेर पडू देत.
पहिले प्रवेशद्वार : हे खरे, सत्य आहे कां ?
दुसरे प्रवेशद्वार : हे जरूरीचे आहे कां ?
तिसरे प्रवेशद्वार : यात करूणा, दया, प्रेम, शांति आहे का ? 

पत्र्यावरील प्रवेशद्वारांचे चित्र व मजकूर वाचल्यावर तो मुलगा आपल्या मनात उठलेल्या क्रोधा बद्दल विचार करू लागला.  
पहिले प्रवेशद्वार - त्या व्यक्तिने केलेली निंदा, योग्य कारणासाठी असून सत्य तर सांगत नाही ? 
दुसरे प्रवेशद्वार - त्या व्यक्तिला प्रत्युत्तर देण्याचा, जशास तसे वागण्याचा, धडा शिकवण्याचा जो विचार, माझ्या मनामध्ये येत आहे तसे करणे खरोखरीच जरूरीचे आहे कां?
तिसरे प्रवेशद्वार - प्रत्युतरादाखल मी जी कृती करणार आहे ती, करूणा, दया, प्रेम, शांतीची आहे की राग, सूड, दंडाची आहे ?

मुलाच्या मनातील विचार त्या तीन प्रवेशद्वारातून बाहेर आले आणि त्या मुलाच्या लक्षात आले की, कदाचित आपली कांही चूक झाली असेल त्यामुळे खरे तर चुकीची जाणीव करून देणा-या त्या व्यक्तिचे आपण आभार मानले पाहिजेत, व परत तशी चूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण चूक मान्य करणे हा मनाचा मोठेपणा, घडलेल्या चुकीबद्दल क्षमा मागणे ही सज्जनता आणि चुकीची पुनरावृत्ती न करणे ही महानता आहे.
पण याच्या उलट, त्या व्यक्तिचे बोलणे सत्य नसेल, वर्तणुक अयोग्य असेल तर इतरांच्या अशा असत्य बोलण्यावर, चुकीच्या वर्तणुकीवर रागाने प्रतिक्रिया - प्रत्युत्तर देऊन आपल्या जीवनांतील अमूल्य वेळ व्यर्थ खर्ची कशासाठी करायचा ? स्वतःच्या मनाला शिणवून आंतरिक शक्तिचा -हास कशासाठी करून घ्यायचा ? अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर, कारण मनाने दुर्बल असलेल्या मनुष्यालाच राग आपला गुलाम बनवत असतो.

विचाराअंती त्या मुलाने करूणा, दया, प्रेम, शांती, समजूतदारपणाने वागण्याचा निर्णय घेतला आणि कटू शब्द बोलणा-या त्या व्यक्तिला म्हणाला, 

“मी जितका वाईट आहे तेवढे कांही तुमचे बोलणे, शब्द वाईट नव्हते. तुम्हाला जे कांही सांगायचे आहे ते निःशंकपणे सांगा.”

त्या व्यक्तिला त्या मुलाकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. तो म्हणाला, 

“मुला मी तुला तुझ्या लहानपणापासून ओळखतो. तुझे वडिल खूप ज्ञानी होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे. तुझी कांही गैर कृत्ये माझ्या कानांवर आली व अशा वाईट वर्तणुकीने आपल्या वडिलांच्या नांवाला तू बट्टा लावत आहेस असे मला वाटले. ‘वडिलांच्या किर्तीला कलंक लागेल असे गैर वागू नकोस’ असा सल्ला तुला द्यायचा या विचाराने मी आलो होतो. पण कसे काय कुणास ठाऊक, तुला पाहताच माझ्या मनात राग भडकून उठला आणि अत्यंत कठोर शब्दांत मी तुला कसेही बोललो. 
खरं तर, माझा उद्देश चांगला होता. पण तो प्रदर्शित करण्याचा माझा मार्ग चुकीचा होता. पण तूझ्या वर्तणुकीने माझा गैरसमज झाला होता, हे तू मला हे जाणवून दिले आहेस. मी जे कांही तुझ्याबद्दल ऐकले ते असत्य होते. तुला जे कांही मी बोललो ते विसरून जा.” 

जीवनांतील या प्रसंगातून तो मुलगा खूप कांही शिकला. त्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये त्या मुलाला अनेक वेळ राग आला परंतु, इतरांशी भांडण्याचा, वादाचा प्रसंग कधीही उद्भवला नाही.’ 

‘उपदेश - तीन दरवाज्यांच्या कसोटींचा’, कथा इथे संपली. 

आणि माझ्या मनातील ‘तो’ कोपरा मला म्हणाला, 

“राजा, भरलेल्या पेल्यातून काय सांडले हे उदाहरण व ‘उपदेशः तीन दरवाज्यांच्या कसोटींचा’ या कथेतून तुला समजले असेल की, क्रोध उत्पन्न होणारच नाही, अशी मनाची घडण किंवा परिस्थिती निर्माण करणे आपल्या हाती नसते. परंतु, मनामध्ये उत्पन्न झालेल्या क्रोधाला तात्काळ प्रकट न करता, शांतपणे विचाराअंती कृती करून त्याचे दुष्परिणाम टाळणे आपल्या हाती असते आणि हिताचेही असते.” 

आपले बोलून संपवून माझ्या मनातील ‘तो’ कोपराही आता अदृश्य झाला. 
आणि आपण एक क्षण जरी शांत राहिलो, तर शंभर दिवसांच्या दुःखातून आपली सुटका होते, हे मला समजुन चुकले आणि या पुढे क्रोधावर नियंत्रण ठेऊ शकणारा जादुई पत्र्याचा तुकडा सदैव माझ्याजवळ बाळगायचा निर्णय मी घेतला. 
   
- आजचे बोल अंतरंगाचे पुर्ण
संदर्भ - १. कथा आधार- साप्ताहिक ‘स्पिकींग ट्री बेंगलोर’, जुलै 9, 2017 
२. कथा आधार – प्रवचनः ओशो, ‘साक्षीकी साधना’ पुस्तक व सुफी संत जलालुद्दीन मुहम्मद सा'दी वचन, 
३. म. फुले यांचे वचन, 
४. अनामिक, 
५. एक चीनी म्हण.