Sangli Samachar

The Janshakti News

एकनाथ शिंदे यांच्या टीम इंडियाला दिलेल्या अकरा कोटीवरून वडेट्टीवार यांची फटकेबाजी !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जुलै २०२४
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाने नुकतेच टी ट्वेंटी मध्ये जागतिक विजेतेपद पटकावले आणि जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. बीसीसीआयने टीमइंडियावर 125 कोटी रुपयांची खैरात केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर मुंबईतील विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे या चौघांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आणि आता राजकीय फटकेबाजी सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याची ओपनिंग महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.


याआधी बीसीसीआयने या खेळाडूंवर 125 कोटी रुपयांची खैरात केली असताना, एकनाथ शिंदे यांनी 11 कोटी रुपये देण्याची गरज नव्हती असं त्यांनी म्हटलं आहे. हे खेळाडू देशासाठी खेळतात, तेव्हा राज्याच्या तिजोरीत खळखळात असताना, देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंवर पुन्हा राज्याच्या तिजोरीतून पैसे उधळण्याची काय गरज होती असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.


आता वडेट्टीवार यांनी टीकेची जोरदार फटकेबाजी केल्यानंतर इतर विरोधी नेते फटकेबाजीसाठी पुढे येणार हे नक्की ! त्याचवेळी जनतेतूनही राखीव खेळाडू म्हणून खदखद व्यक्त होत आहे. यापूर्वी क्रिकेटच्या तुलनेत कुस्ती, कबड्डी, खो-खो या खेळातील खेळाडूंवर शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची सार्वत्रिक टीका व्यक्त होत होती. क्रिकेटमधील खेळाडू जाहिरातीतून अमाप पैसा कमवत असतात. त्या तुलनेत इतर क्षेत्रातील खेळाडूंवर होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल नेहमीच नाराजी व्यक्त होत असते. आता हा सामना अजून किती काळ रंगतो हे येणारा काळच ठरवेल.