| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जुलै २०२४
लोकसभेत भाजपासह महायुतीवर आरोपांच्या प्रचाराच्या फैरीवर फैरी झाडल्या होत्या. परिणामी महायुतीला या निवडणुकीत मोठा झटका बसला होता. एका सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीतही बहुमतापासून वंचित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने भाजप नेते खडबडून जागे झाले आहेत. आणि म्हणूनच या निवडणुकीत काँग्रेस व विरोधी पक्षांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना ठोशास ठोसा उत्तरे देण्याचे तयारी भाजपाकडून करण्यात आले आहे. यासाठी दहा जणांचे फायरब्रँड टीम उतरवली आहे. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मुलुख मैदान तोफांचा समावेश आहे.
भाजपकडून रोज सकाळी नऊ वाजता या आरोपावर प्रतिक्रिया देण्यासाठी चार जणांची टीम तैनात असणार आहे पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि रावसाहेब दानवे यांचा समावेश असणार आहे. तर संध्याकाळी चार वाजता दिवसभरातील आरोपांचे खंडन राज्याचे मंत्री सुधीर मुनगट्टेवार, गिरीश महाजन, माधव भंडारी, अतुल भातळकर आणि राम कदम हे सज्ज असणार आहेत. याशिवाय प्रत्येक विभागात वीस नेत्यांची टीम मैदानात उतरवली जाणार आहे. या विभागीय टीम मध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ माजी केंद्रीय मंत्री भारतीय पवार यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही भाजपकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. काल भाजपने याबाबतचा निर्णय घेताच, काँग्रेसच्या वरिष्ठ प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत रणनीती आखण्यासाठी हे दोघे वरिष्ठ नेते मुंबईत दाखल झाले आहेत. टिळक भवानी येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात याबाबतची मॅरेथॉन बैठक संपन्न झाली. यावेळी जागा वाटपांबरोबरच महायुती समोर महाआघाडी कडून सर्वमान्य सक्षम उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. यादरम्यान भाजप व विरोधी पक्षांकडून होणाऱ्या आरोपाला तात्काळ प्रतिउत्तर देण्यात येईल.
दरम्यान भाजपा व काँग्रेस दोन्ही बाजूंकडून मत विभागणी होऊ नये, यासाठी पक्षांतर्गत बंडखोरीवर नजर ठेवण्यात येणार आहे. मात्र आता या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आरोप प्रत्यारोपावरून मतदार कोणत्या पक्षाच्या पारड्यात आपले मत टाकतात याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.