| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ३० जुलै २०२४
फेसबुकवर प्रकाशित झालेल्या एका व्यंगचित्रामध्ये बसमधील एक प्रवासी भगव्या रंगातील मुखपृष्ठ असलेले पुस्तक वाचत असतो. आणि तो पुस्तक वाचतोय हे पाहून बसमधील अन्य सर्व प्रवासी त्याच्याकडे आश्चर्याने बघत मोबाईलच्या कॅमेऱ्याने त्याचा फोटो घेत असतात. वाचनाची कमी झालेली आवड व मोबाईलचा आजच्या समाजावरील कुप्रभाव ही वास्तवता लक्षात घेऊन एका वाचकाने त्या चित्राखाली ‘होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक’ -१ असे चपखल भाष्य केले होते. तर आणखी एका वाचकाने ‘खरं आहे, पण भगव्या रंगावरून वादळ तर उठणार नाही ना?' अशी टिप्पणी केली होती.
आजच्या समाजातील वाचनाची कमी झालेली आवड, विशिष्ट रंगाबद्दलचा अपप्रचार, गैरसमज यावर मी विचार करत असतांना माझ्या मनातील ‘तो’ नेहमीचा कोपरा उपस्थित झाला व मला म्हणाला,
“राजा, रंगावरून वादळ उठण्याच्या घटना कांही आजच्या काळातील आहेत असे नाही. शेकडो वर्षांपासुन अशी वादळे चालूच आहेत. कधी गोरा रंग काळ्या रंगाला कमी लेखतो, हिणवतो आणि प्रत्युत्तरा दाखल काळा रंग गो-या रंगा विरूद्ध बंड पुकारतो. कधी हिरवा रंग आपला प्रभाव सर्वत्र पडावा या उद्देशाने इतरांच्या कक्षेत आक्रमण करतो आणि त्याला हुसकवण्यासाठी मग सर्व विरोध करतात. कधी भगव्या रंग निळ्या रंगाचे आत्यंतिक शोषण करतो आणि मग निळा रंगाचा उद्रेक होतो व तो रस्त्यावर उतरून सर्वांना अडवतो. कधी सर्व रंग एकत्र येऊन ‘यल्लो यल्लो डर्टी फेल्लो’ म्हणून पिवळा रंगाची हेटाळणी करतात आणि तो पिवळा रंग मग पंख, नख्यांच्या सर्पाच्या ज्वाला दाही दिशांना फैलावुन सगळ्यांना त्रास देतो. अशा कितीतरी वादळांची नोंद इतिहासामध्ये आहे.”
माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याचे वक्तव्य ऐकून मी त्याला विचारले,
"तू म्हणतोस ते खरं आहे पण, मला हे समजत नाही की, समाजामध्ये वादळे उठवणाऱ्या या वेगवेगळ्या रंगाची निर्मिती त्या निर्मात्याने कशासाठी केली? एक आणि फक्त एकच रंग त्यांने निर्माण केला असता तर ही वादळे उठलीच नसती व सर्व जग आनंदाने भरून गेले असते, नाही कां?"
माझ्या प्रश्नावर माझ्या मनातील ‘तो’ कोपरा सात्विक संतापाने म्हणाला,
“राजा, आपल्या सीमीत बुद्धीने त्या असीमाच्या निर्मितीबद्दल शंका घेऊ नकोस. त्या जगन्नायकाने विश्वाची रचना, निर्मिती सुनियोजित पद्धतीने केली आहे. त्याची प्रत्येक निर्मिती, फक्त मानवप्राणी सोडून निर्मात्याने आखलेल्या मार्गाने आपले मार्गक्रमण करत आहे. फक्त मानव हा एक असा जीव आहे जो त्याच्या जीवनाचा अंत निश्चित असूनही त्या अनंताने आखुन दिलेल्या मर्यादाचे आपल्या स्वार्थापोटी उल्लंघन करत असतो, इतरांच्या क्षेत्रामध्ये आक्रमण करत असतो.
खरं तर, या सृष्टीमध्ये येताना माणूस कांहीही घेऊन येत नाही व जातानाही कांहीही घेऊन जात नाही पण हा स्वतःच्या देहिक सुखासाठी, खोट्या मानमरतबासाठी अहंकारी, लोभी, माणूस दुस-या माणसालाच नव्हे तर अन्य सर्व जीवांना, पक्षी-प्राण्यांना, निसर्गाला आपल्या कह्हेत करू पाहतो, त्यांच्यावर अधिकार गाजवु पाहतो, बंधने घालुन आपला गुलाम करण्याचा प्रयास करत असतो.
अशा या संकुचित, दुषित व स्वार्थी विचारातून माणसाने माणसा-माणसात उच्च-नीचता आणली, रंगा-रंगात भेदभाव सुरू केला आणि साऱ्या सृष्टीचे वातावरण असंतोष, द्वेष, तिरस्कार, उच्च-नीचतेच्या कल्पनांनी दुषित केले आहे. आणि याचा परिणाम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, वादविवाद, भांडणे, परस्पराविरूद्ध विरूद्ध शस्त्रे पारजणे, सु-या, तलवारीचे घाव घालुन दुर्बलांचे हात-पाय तोडणे, मुंडकी छाटणे, स्त्रियांना विवस्त्र करणे. बालकांचे बालपण करपवून टाकणे आणि सर्वत्र भय, दहशत, किंकाळ्या, आक्रोश, दुःखाची वादळे उठणे, यामध्ये झाला आहे. या सगळ्याला कारणीभूत कोण आहे ? तो निर्माता कि माणूस ?
या सगळ्याला कारणीभूत आहे माणूस, माणूस आणि फक्त माणूस आणि त्याचा अहंकार, स्वार्थी वृत्ती व कुकर्मे. त्यामुळे ही वादळे काल उठली होती, आज उठत आहेत व उद्याही उठतील. राजा, आता तुला समजले असेल की रंगावरून उठणा-या वादळांचे कारण परमेश्र्वराने सृष्टीमध्ये, तिच्या रंगामध्ये निर्मीलेली विविधता नाही तर माणूस आहे.
माणसाने रंगांकडे दुषित दृष्टीने पाहायला सुरवात केली आणि त्याला सृष्टीत विविध रंग निर्माण करण्याऱ्या त्या हातांचे विस्मरण झाले. परिणामी, भगवा रंग, जो शौर्य, त्याग आणि ‘वासांसि जीर्णानी यथा विहाय नवानि गृहणाति नरोsपराणि’ या अंतिम सत्यास जाणणा-या तृप्त जीवनाचे प्रतिक आहे, तो माणसाला भडक वाटू लागला. हिरवा रंग, जो शांतता, समृद्धी, बुद्धीप्रामाण्य, एकांत, व निसर्गाचे प्रतिक आहे, तो माणसाला आक्रमक भासू लागला. निळा रंग जो धैर्य, विशालता, अथांगता, सर्व समावेशकाचे प्रतिक आहे, माणूस त्याला क्षुद्र समजु लागला. पिवळा रंग जो ज्ञानाचे, दुरदृष्टीचे, अथक परिश्रमाचे प्रतिक आहे, माणसासाठी तो अग्निसम दाहक बनला.
राजा, त्या निर्मात्याने सृष्टीमध्ये फक्त एक व एकच रंग निर्माण केला असता ना तर ही सृष्टी, त्यावरील सर्व जीवन निरस होऊन गेले असते, जगण्यातील आनंद संपून गेला असता. जीवन एकसुरी, एकाच सरळ रेषेत, कंटाळवाणे बनले असते. त्यामुळे सृष्टीच्या रचियत्याने जे कांही निर्माण केले आहे, त्यामध्ये जी विविधता आणली आहे ती यच्चयावत सर्व जीवसृष्टी सुखामध्ये, आनंदामध्ये राहावी या उद्देशाने.”
विविध रंगाच्या उत्पत्ती मागील माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याने केलेले विवरण मला पटले आणि त्याला मी एक प्रश्न केला,
"तू जे कांही सांगत आहेस ते सर्व मला पटले पण, रंगावरून उठणारी ही वादळे टाळायची कशी?"
“राजा, रंगावरून उद्भवणारी वादळे जर टाळायची असतील ना, तर माणसाने कोणत्याही रंगाकडे दुषित नजरेने पाहायचे नाही. आपला रंग तोच फक्त चांगला, तोच सर्वश्रेष्ठ व इतर सर्व रंग वाईट-हीन असा अपप्रचार करायचा नाही. इतर रंगाना हिणवायचे नाही. आपला रंग इतरांवर लादण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपल्या रंगाच्या वैचारिक स्वातंत्र्याची जपणूक आवश्यक करायची पण, इतरांच्या वैचारिक स्वातंत्र्यावर घाला घालायचा नाही.
बस्स, इतके साधे, सरळ, सोपे आचरण सर्व माणसांनी आचरले की आपोआपच सर्व वातावरण स्वच्छ होऊन अंधारामध्ये मार्ग दाखवणारा सुर्याचा सर्वरंग समावेशक प्रकाश सर्वत्र पसरेल. अशा या स्वच्छ वातावरणात मग तो निर्माता पावसाचे तुषार मिसळवेल आणि आकाशाच्या कॅनव्हासवर विविध रंग एकत्र असलेले सुंदर इंद्रधनुष्य उमटेल. सर्व वातावरण आनंदाने भरून जाईल.
वेगळ्या शब्दांत सांगायचे तर माणसाने आपले अंतरंग जिथे ‘तो’ वास करत असतो त्यामध्ये कसलीही भेसळ करायची नाही, ते नेहमी निर्मळ ठेवायचे, नेहमी लक्षात ठेवायचे,
माणुस आहे पामर पण ठेवीता निर्मळ त्यांने अंतरंग ।
उगवेल इंद्रधनु अन् उधळेल दाही दिशा सहस्त्र रंग।।
माझ्या मनांत उठलेले रंगाचे वादळ मनातील ‘त्या’ कोप-याच्या बोलांनी शमले आणि दाही दिशांना सहस्त्र रंगाची उधळण करणा-या इंद्रधनुष्याची वाट मी पाहु लागलो.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण
१. कै. ग.दि. माडगूळकरांच्या ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ या गीतातील एक ओळ