| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ जुलै २०२४
आगामी विधानसभेचे मतांचे गणित लक्षात घेऊन महायुती शिंदे सरकारने मतदारांवर योजनांचा वर्षाव सुरू ठेवला आहे. महिला मतदारांवर कृपादृष्टी दाखवत असतानाच आता ऊर्जा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीनंतर, ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' अंमलात आणणार असण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळ दर्शन घेण्यासाठी अडचणी येत असतात. विशेषतः दारिद्र रेषेखालील कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे. मध्यमवर्ग यातील जेष्ठ नागरिकांनाही इतर काही कारणामुळे तीर्थ दर्शन करता येत नाही. या सर्वांचा विचार करून सर्वंकष धोरण असून, त्याबाबत नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही योजना अमलात आणली जाईल.
'लाडकी बहीण' योजनेनंतर आता 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' नक्की कधीपासून सुरू होणार ? असा प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जाऊ लागला आहे. ' लाडकी बहीण योजनेत' अनेक त्रुटी राहिल्याने व महिलांचे कागदपत्रासाठी होणाऱ्या धावपळीतून झालेले हाल पाहता, आता 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने'मुळे ज्येष्ठ नागरिकांचे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे कागदपत्र जमा करण्यासाठी किती धावपळ करावी लागेल, हे योजना प्रत्यक्ष जाहीर झाल्यानंतर समोर येणार आहे. परंतु या मागे गेली कारण राजकीय असले तरी, ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय होणार असल्याने समाधानही व्यक्त होत आहे.