Sangli Samachar

The Janshakti News

सांगा रस्ता कुणाचा ? रस्त्यावरील बाजार, की रस्त्यांचा बाजार ?...


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जुलै २०२४
मुंबई असो पुणे असो किंवा एखादे मोठे शहर तेथील अतिक्रमणाने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. अनेक रस्ते तर अतिक्रमणामुळे इतके व्यापलेले असतात या रस्त्यावरून वाहनातून सोडा पण, पायी चालणे हे मुश्किल असते. या साऱ्या प्रकाराला सांगली-मिरज वा कुपवाड शहर हे ही अपवाद नाही. अनेक महत्त्वाच्या रस्त्यावर खोकी आणि फिरस्ते बाजार मांडलेला दिसून येतो. ज्याचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो.

परंतु ज्या अतिक्रमण विभागाकडे याची जबाबदारी असते तेथील अधिकारी या साऱ्या प्रकाराकडे कानाडोळा करीत असतात. याला जितके हे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतात, तितकेच लोकप्रतिनिधीही. अतिक्रमण विभागाने एखादे खोके हटवले, रस्त्यावरील फिरस्त्यांचे साहित्य जप्त केले, तर शहरातील अनेक लोकप्रतिनिधी अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून, प्रसंगी प्रत्यक्ष भेटून दमदाटी करीत असतात. यामुळेही अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला अडचणी येत असतात.


सध्या सांगली मिरज कुपवाड शहरातील अनेक रस्ते अशा अतिक्रमणांनी व्यापलेले आहेत. मिरजेतील महापालिका प्रशासकीय इमारत भोवतालचे रस्त्यावरील अतिक्रमण आणि फिरस्त यांनी वेढली आहे. तर कुपवाड शहरातील मुख्य रस्ता कितीही अतिक्रमण हटवले तरी, पुन्हा यावर बळजोरी होत आहे. तर सांगली शहरातील मुख्य आणि नेहमी वाहता असलेला मेन रोड, कापड पेठ आणि मारुती रोड हा सर्वाधिक समस्याग्रस्त दिसून येतो.

माणुसकीची जाणीव ठेवून या रस्त्यावरील पोटार्थी असलेल्या या फिरस्त्यांना पांढरे पट्टे आखून दिलेले आहेत. मात्र सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी या फिरस्त्यांचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असतो. दोन्ही बाजूंनी यांचे झालेले आक्रमण आणि भरीस भर म्हणून येथे पार्किंग केलेली दुचाकी वाहने, यामुळे हे महत्त्वपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी दहा फूट हे राहत नाहीत. याबाबत या मार्गावरील दुकानदारांनी अनेक वेळेला महापालिका प्रशासनाला निवेदने दिलेले आहेत. परंतु संबंधितांच्या हेकेकोरपणामुळे आणि लोकप्रतिनिधीमुळे या व्यापाऱ्यांचे काहीही चालत नाही. 


अनेकदा या मार्गावरील अतिक्रमणामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना रस्ताही राहत नाही. एखाद्या व्यापाऱ्याने या फिरस्त्यांना, भाजीविक्रेतांना आपल्या दुकानात येण्यासाठी रस्ता सोडून बसण्यास सांगितले तर प्रकरण हातघाईवर येते. मध्यंतरी मारुती रोडवरील एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा व्यापारी पोलिसात गुन्हाही दाखल करू शकला नाही. यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात यावे. मात्र याचे कोणतेही सोयर सुतक ना फिरस्त्यांना, ना भाजी विक्रेत्यांना ना त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना राहिलेले नाही. त्यामुळे हा गंभीर प्रश्न अधिक गंभीर होत चाललेला आहे. यातून वाहनधारक, पादचारी आणि दुकानदारांची केव्हा सुटका होईल हे तो परमेश्वरच जाणो...