yuva MAharashtra ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी दिलेल्या ऑफरला खा. विशाल पाटील यांचे खास शैलीत प्रत्युत्तर !

ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी दिलेल्या ऑफरला खा. विशाल पाटील यांचे खास शैलीत प्रत्युत्तर !


| सांगली समाचार वृत्त |
किर्लोस्करवाडी - दि. ९ जुलै २०२४
लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही विद्यमान खा. विशाल पाटील हे भाजपात जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. परंतु त्या त्या वेळी त्यांनी प्रत्युत्तर देऊन, आपली विचारधारा काँग्रेसची असल्याचे सांगितले होते. परंतु नुकतेच सांगलीचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी खा. विशाल पाटील यांना भाजपात येण्याचे थेट ऑफर दिली. परंतु 'मी माझी विचारधारा सोडणार नसून आपणच प्रलंबित कामे सोडवण्यासाठी सहकार्य करा.' असे उत्तर खा. विशाल पाटील यांनी आपल्या खास शैलीत दिले.

हा प्रसंग घडला तो किर्लोस्करवाडी येथील रेल्वे स्टेशनवर. गेल्या पंधरा वर्षापासून मध्य रेल्वे प्रवासी संघटनेचे हुबळी एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्याची मागणी सातत्याने होत होती. नुकतीच त्याची पूर्तता झाली आणि ही हुबळी एक्सप्रेस गाडी किर्लोस्करवाडी येथे थांबली. यावेळी खा. विशाल पाटील यांच्या उपस्थितीत ना. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी गाडी मार्गस्थ करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला. 


यावेळी बोलताना खा. विशाल पाटील म्हणाले की, कोल्हापूरहून केवळ मिरजेपर्यंत येणारी पॅसेंजर गाडी ही आपण किर्लोस्करवाडी पर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. यासाठी मिरज येथे लवकरच रेल्वेचे सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी व प्रवासी संघटना तसेच शेतकरी यांचे संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावू.