| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरु - दि. १३ जुलै २०२४
‘टींग-टॉन्ग, टींग-टॉन्ग’ दारावरील बेलचा आवाज झाला. जाळीच्या दारातून मी दाराबाहेर पाहिले. दाराबाहेर कुरियरवाला उभा होता. जाळीच्या दाराला असलेल्या छोट्या झरोक्यातून त्याने पुढे केलेल्या कागदावर माझा मोबाईल नंबर लिहून व खुणेच्या जागी सही करून त्यांने दिलेले पाकीट मी घेतले. माझ्या खास मित्राच्या मुलीच्या विवाहाची पत्रिका आली होती. लग्न परगांवी होते. पण हा माझा खास मित्र असल्याने व त्या निमित्ताने इतरही जुन्या मित्रांना भेटता येईल या विचाराने (एका दगडात दोन पक्षी) लग्नाला जाण्याचे मी नक्की केले. लग्नाला जाण्याचा विचार मनामध्ये पक्का होताच इंटरनेटवरून जाता-येताचे रेल्वेचे तिकीट रिझर्व केले व मित्राच्या मुलीच्या लग्नामध्ये आहेर काय द्यावा यावर विचार करू लागलो. पण कांही केल्या योग्य वाटेल असा आहेर कांही सुचेना. त्यामुळे पत्नीचा सल्ला घ्यायचे ठरवून मी तिला विचारले,
“अगं, या माझ्या मित्राच्या मुलीच्या विवाहप्रसंगी काय भेट देऊ?”
“तुम्हाला खरंच कां माझा सल्ला हवा आहे? अंह, कांही सांगू-बोलू नका. मला माहिती आहे. मी माझे मत सांगितल्यावर नेहमीप्रमाणे माझ्यापुढे तुम्ही मान डोलावणार आणि मनातल्या मनात ‘आयला हिला कांही अक्कलच नाही, उगाचच विचारले’ असे म्हणणार. तरीही तुम्हाला ज्ञान शिकवायची आलेली संधी सोडायची नाही हे ठरवून मी तुम्हाला सांगते. पटले तर त्याप्रमाणे वागा, नाहीतर नेहमीप्रमाणे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे हे आहेच.
आता तुम्हीच (च अगदी ठसक्यात) विचारले म्हणून सांगते. भांडी, कपडे, पुस्तके, लेमन-टीसेट आणि फुलांचा भला मोठा बुके सोडून कांहीही भेट द्या. जळ्ळी मेली लोकांची अक्कल. आठवते कां, आपल्या लग्नात आपल्याला एकाच प्रकारची दहा भांडी, सहा लेमनसेट, तीन टीसेट, मला आवडत नसलेल्या रंग-डिझाईनच्या अकरा साड्या आल्या होत्या. आणि तुमच्या त्या कलाप्रिय विद्वान मित्रांनी तर जड भाषेतील वजनदार पुस्तके आणि चित्र कशाचे आहे यावर पीएचडी केली तरी न समजणारे कसलेतरी मोठे पेंटींग आपल्याला भेट दिले होते. या सा-याच्या भरीला आले होते फुलांचे एकवीस बुके. सगळ्या घराचा नुसता फ्लॉवर पार्लर झाला होता. हे सारे बोहरणी व रद्दीवाल्याला देता-देता माझ्या नाकी दम आला होता.”
माझ्या पत्नीने ‘सल्ला देते’ या गोंडस संज्ञेखाली नेहमीप्रमाणे माझी अडचण जास्तच वाढवली. आणि फिरून एकवेळ, मित्राच्या मुलीच्या विवाहप्रसंगी कोणती भेट द्यावी यावर मी विचार करू लागलो. विचाराअंती मी इंटरनेटचा आधार घेतला.
इंटरनेटच्या एका साईटवर ज्या किंमतीची भेटवस्तु द्यायची आहे तेवढी रक्कम एखाद्या समाजसेवी संस्थेला भेट द्यावी असे सुचवले होते. प्रारंभी मला तो विचार आवडला. पण विवाह पत्रिकेमध्ये आहेर आणू नयेत स्विकारले जाणार नाहीत. असा पुणेरी भाषेतील खणखणीत उल्लेख नसल्याने व आहेराची रक्कम अमुक एका संस्थेला देणगी द्यावी असा आदर्शवादी विचारही मांडला नसल्याने स्वतःच्या मनाने असे कांही करणे माझ्या मनाला पटेना.
शेवटी विचार करून कोणत्या मित्राशी सल्लामसलत करावी असा विचार करत असतानाच माझ्या सर्वात जवळचा, माझा खरा मित्र, माझ्या मनातील ‘तो’ कोपरा उपस्थित झाला व म्हणाला,
“राजा विवाह प्रसंगी कशा प्रकारचा आहेर द्यावा या बाबत मी कांही सुचवू कां?”
माझा होकार पाहून माझ्या मनातील ‘तो’ कोपरा सांगू लागला.
“राजा, एका मुलीच्या विवाहप्रसंगी आलेल्या आहेराच्या पाकीटामध्ये एक पाकीट आकाराने नेहमीपेक्षा मोठे होते. त्यावर एका बाजुला गुलाबाची दोन टपोरी फुले सेलो टेपने चिटकवली होती. पाकीटामध्ये आकाशी रंगाच्या कागदावर लिहीलेले पत्र होते. पत्रावर आकर्षक कलाकुसरीची चौकट होती.
पत्राच्या दोन्ही बाजूस समास सोडून श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या दशक एकोणिसमध्ये वर्णन केलेल्या सर्व गुणंलकारित घडसुनी सुंदर केलेल्या बोळबोध अक्षरांतील मजकूर लिहीलेला होता.
।। श्री ।।
प्रिय चि.सौ.कां. शुभदा,
तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाली आणि ध्यानात आलं, अरे, कालपर्यंत फ्रॉक-स्कर्ट घालून दुडुदुडु पळणारी, लाजरी, बुजरी, आपली ही छोटी बाहुली, बघताबघता मानवी जीवनातील एक फार महत्वाची भूमिका समर्थपणे पेलवण्याइतकी मोठी झाली की. आणि बर कां शुभदा, ही भूमिका तू अत्यंत समर्थपणे पेलवणार आहेस याची मला खात्री आहे. मला एकट्यालाच नव्हे तर आम्हा सर्वांना, तूझ्या आई-बाबांना, भाऊ, नातेवाईक, व मनाने, विचारांने तुम्हां सर्वांशी अखंडपणे जोडले गेलेल्या माझ्यासारखे तुझे काका, मित्र-मैत्रीणी, सा-या सा-यांना आणि मुख्य म्हणजे तुझा जीवनाचा होणारा जोडीदार, तुझे सासू-सासरे, नणंदा, दिर, .... या सर्वांना खात्री आहे ही भूमिका तू समर्थपणे पेलवणार आहेस.
हे सर्व जरी खरे असले तरी मत्प्रिय मुली, ही भूमिका फार मोठी, बहुरंगी, बहुविध व बहुढंगी आहे. त्यामुळे या भूमिकेतील प्रत्येक प्रसंग यशस्वी होण्यासाठी तिचे स्वरूप व त्या मागील ’थीम’ समजाऊन घेणे आवश्यक व महत्वाचे आहे. महान कवी कालिदास, ‘रघुवंश’ या आपल्या महाकाव्यामध्ये या भूमिकेचे वर्णन करतांना लिहितातः
गृहिणी सचिवः सखी मिथः। प्रियशिष्या ललिते कलाविधौ।।
यावरुन तूझ्या लक्षात येईल की तुला एकाच वेळी गृहिणी, सचिव, मैत्रिण, मार्गदर्शक, शिष्य व नाना प्रकारच्या कलामध्ये निपुण, अशा विविध भूमिका एकाच वेळी निभावयाच्या आहेत.
अशा या विविधरंगी, विविधढंगी, महत्वाच्या भूमिकेमध्ये तुझ्या वाट्याचे नेमके संवाद कोणते ? कोणती वेषभुषा, कोणत्या भुमिकेसाठी, कशा पद्धतीचा ‘मेकअप’ सुयोग्य असेल ? रंगमंचावर तुझी जागा कुठे असणार आहे ? वेगवेगळ्या प्रसंगातील, नेपथ्य कसे असणार आहे ? आणि खुपसे असेच कांही ..... जे भूमिका यशस्वी होण्यासाठी करावे लागते ते सर्व कोण करणार आहे ?
आणि बरं कां शुभदा, हे सर्व कांही, तुला आणि फक्त तुलाच करायचे आहे. इथे ना कोणी अन्य लेखक, ना कोणी नेपथ्यकार, ना कोणी ‘प्रॉम्प्टर’, ना कोणी दिग्दर्शक. सारे कांही तू आणि फक्त तूच. यातील संवाद तूच लिहायचेस, त्याचे मूळ पाठ घासुनपुसुन तयार ठेवायचे आणि प्रसंगानुरूप भूमिकेशी एकरूप होऊन योग्य रित्या त्यांना फेकायचे. आता तुला प्रश्न पडला असेल ना, हे सर्व जमायचे कसे?
आणि इथेच; या घडीला, हे सांगण्यासाठी तुझ्या या काकाची, ज्यांने या रंगमंचावर अशाच कांही भूमिका त्याच्या अल्प कुवतीप्रमाणे निभावून नेल्या आहेत, त्याची ‘इंट्री’ होत आहेः चिरंतन आशिर्वादाचे कांही थेंब पसरवण्यासाठी.
शुभदा, या भूमिका जरी विविध असल्या तरी त्यामागे जी ‘थीम’ आहे, भूमिकांचा जो पाया आहे तो मात्र एकच आहे. आणि ही ‘थीम’, हा पाया आहे प्रेम, करूणा, माया, दया अशा व फक्त अशाच अन्य चांगल्या गुणांचा.
विविध रुपाने नटलेल्या या भूमिकांचा हा पाया समजावून घेऊन त्या यशस्वी करण्यासाठी गरज असते स्थितप्रज्ञेची. स्थितप्रज्ञ, ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी अपूर्व आहे, कोणत्याही प्रसंगी नेहमी स्थिर, शांत, अविचल आहे, प्रेम, करूणा, माया, दया, अनुकंपा .... यांनी पूरेपूर भरलेली व भारलेली आहे.
पोरी, तू आजवर तुझ्यामध्ये उपजतच असलेल्या या चांगल्या गुणांच्या, प्रेमाच्या भावनेने तुझ्या आई-बाबांना, लहान भावंडाना, मित्र, मैत्रिणींना समजावून घेतलेस, त्यांचे विचार जाणलेस. आता या नवभूमिकांमध्ये तुला, तुझ्या जीवनाच्या साथीदाराला व त्याच्या कुटुंबियांना समजावून घ्यायचे आहे, त्यांचे आचार-विचार तुझ्या उपजत चांगल्या गुणांनी, प्रेम भावनेने जाणून घ्यायचे आहेत. निखळ प्रेमाने त्या सर्वांना, त्यांच्या आचारा-विचारांना समजावून घेण्याचे, कोणत्याही परिस्थितीत प्रेम, करूणा, माया, अशा भावनांनी वागणे एकदा कां तुला जमले की, तुला उमजेल, जाणवेल, अनुभवता येईल....,
हे जग, हे जीवन खूप, खूप सुंदर आहे.
उमलणा-या प्रत्येक फुलामध्ये तूला सौंदर्य दिसेल. आपल्या स्मितहास्याने प्रत्येक फूल तुझ्या चेह-यावर स्मितहास्य फुलवेल. पावसाच्या धारा आईच्या मायेने तुला चिंब भिजवून टाकतील.
वा-याची प्रत्येक झुळूक तुझ्यासाठी गाणे गाईल.
पाण्यावर उमटणा-या प्रत्येक तरंगातून तुला जलतरंगाचे सुरेल सुर ऐकू येतील.
खिडकीतून दिसणारी पानगळ तुझ्यासाठी लवकरच गुलमोहर फुलणार असल्याच्या संदेश देईल आणि, हिवाळ्याच्या थंडीत तू खांद्यावर लपटलेली शाल, आईच्या कुशीतील उबेची आठवण करून देईल.
मुली, तुझी कसोटी पाहणारे कांही प्रसंगही तुझ्या जीवनात येतील. पण त्यावेळी, तू प्रेम भावनेने तूझ्याशी जोडलेले हे सर्व, तुझ्या जीवनाचा साथीदार, सासू-सास-यांच्या रुपातील तुझे आई-बाबा, दिर-नणंदेच्या रुपातील तुझी भावंडे, व या वृद्ध काकासारखे हितचिंतक, तुला समजून घेतील, तुझी साथ देतील. आणि तूला उमजेल, जाणवेल, अनुभवास येईल हे जीवन, हे जग खुप खुप सुंदर आहे.
शुभदा... सुखी, समाधानी, आनंदी वैवाहिक जीवनातील या भूमिकांचा हा पाया जाण. जीवनातील प्रत्येक प्रसंगामध्ये तूझे संवाद प्रेमरूपाने, आपल्यातील अन्य ‘स्व’ना बाजूला ठेऊन तयार ठेव. प्रत्येक प्रसंग प्रेम, करूणा, माया, ममता.... भावनेने समरसून म्हणजे, तन, मनाने पूर्णपणे सामावुन कर आणि मग तुला जाणवेल, उमजेल, अनुभवास येईल,
नसते चिंता, नसते व्यथा ।
फुलते जिथे प्रेम कथा ।
आहेर हा न्यारा या शुभप्रसंगीचा।
आशीर्वाद ठरो तुजसाठी सुखाचा।।
अंतरीचे व अनुभवाचे असती हे बोल।
सदैव ध्यानात ठेव त्यांचे मोल।।
तुझ्या वैवाहिक जीवनासाठी खूपशा शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेम.’
“राजा, पत्रातील मजकूर इथे संपला होता. पत्राच्या खाली लपेटदार अक्षरात पत्र पाठवणा-याचे नांव लिहिले होते.”
माझ्या मनातील ‘तो’ नेहमीचा कोपरा पुढे मला प्रश्न करता झाला,
“राजा, आता तूच सांग, लग्नसमारंभामध्ये नववधुवराला भेटवस्तु, रोख रक्कम, व असाच कांहीतरी आहेर देण्यामागे मूळ उद्देश कोणता? शिष्टाचार, औपचारिकता, परतफेड, मदत,.... की स्नेह, प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छांचे लहानसे प्रतिक?"
नववधुवरांच्या जीवनातील या विशेष दिवसाची, त्या क्षणांची सदैव साठवण व्हावी यासाठी दिलेला कोणता आहेर जास्त उचित? पाकीटाची घडी मोठी दिसावी अशा प्रकारे दुमटवून ठेवलेल्या रूपयांच्या कांही नोटा, फुलांचा गुलदस्ता, कपडे, टीसेट-लेमन सेट, भांडीकुंडी, वॉल हँगिंग या सारख्या क्षणभंगुर तत्सम वस्तु की पत्ररूपाने दिलेला हा अनोखा आहेर?”
माझ्या उत्तराची वाट न पाहता माझ्या मनातील ‘तो’ कोपरा परतला. आणि यापुढे विवाह किंवा तशाच अन्य प्रसंगी असाच कांहीतरी अनोखा आहेर करण्याचा विचार मी मनोमन पक्का केला.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण !