| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जुलै २०२४
तंबाखू सेवनाच्या दुष्परिणाम बाबत, विशेषतः ग्रामीण स्तरावर जास्तीत जास्त यांनी जागृती करावी, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत डॉ. दयानंद बोलत होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की विक्रीस बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू, मावा विक्री करणाऱ्या पानपट्टीवर कडक दंडात्मक कारवाई करावी, रेस्टॉरंट, बार, बस स्थानक, रेल्वे स्टेशन इत्यादी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान क करणाऱ्या व्यक्तीवर अन्न औषध प्रशासन व पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद आलासकर यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची तसेच केलेल्या कार्यवाही बाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, जिल्हा परिषद माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद आलासकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, समिती सदस्य नियंत्रण कक्षा अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.