Sangli Samachar

The Janshakti News

सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची मांदियाळी, बंडखोरी बाबत सर्वत्र चर्चांना उधाण !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जुलै २०२४
अवघ्या दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात इच्छुक उमेदवारांचे मोर्चे बांधणे सुरू आहे. सांगली जिल्ह्यातही सर्व विधानसभा मतदार संघात इच्छुकांनी गुडघ्याला भाषण बांधलेले आहे. सांगली, मिरज, तासगाव-कवठेमंकाळ, जत, खानापूर -आटपाडी, पलूस-कडेगाव, वाळवा, आणि शिराळा या सर्वच ठिकाणी इच्छुकांचे मांदियाळी दिसून येत आहे.

विशेषतः इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा लोकसभेप्रमाणे सांगली विधानसभा मतदारसंघ ही चर्चेच्या केंद्रस्थानी राहील असे दिसते. याचे कारण म्हणजे महायुती आणि महाआघाडीचे दोन्हीकडे इच्छुकांची असलेली मोठी संख्या. महायुतीतून भाजपामध्ये विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ हे हॅट्रिकच्या तयारीत आहेत. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघात 'भाजपला मिळालेली कमी मते' हा मुद्दा आ. सुधीरदादांच्या हॅट्रिकच्या आडवा येतो आहे. परंतु गेल्या दहा वर्षात आ. सुधीरदादांनी येथे केलेली कोट्यावधी रुपयांचे केलेली विकास कामे, स्वच्छ प्रतिमा आणि सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांशी असलेला वैयक्तिक संपर्क हे त्यांचे प्लस पॉईंट आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पप्पू उर्फ शिवाजी डोंगरे, सौ. निताताई केळकर यांनी आमदारकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाने हे येथे चाचणी सुरू केले आहे.

महायुतीप्रमाणेच महाआघाडीतही गत वेळी निसटता पराभव स्वीकारावा लागलेले पृथ्वीराजबाबा पाटील यांच्यासमोर श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. परंतु गेल्या पाच वर्षात पृथ्वीराजबाबा पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील प्रश्न व समस्या हेरून त्याबाबत आवाज उठवला आहे. त्याचप्रमाणे दिवाळी, दसरा, मोहरम या मोठ्या सणात हिंदू मुस्लिम नागरिकांशी त्यांनी साधलेली जवळीक विशेषतः त्यांनी खेळलेले 'हिंदू कार्ड' हे यावेळी त्यांना विधानसभेच्या सभागृहात घेऊन जाऊ शकते. 


परंतु लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उघडपणे महाआघाडीच्या उमेदवारा विरोधात जयश्रीताई आणि त्यांच्या म्होरक्यांनी केलेली कामगिरी नजरेआड करता येणार नाही. विशेषतः जयश्री ताई यांच्यासाठी 'मदन भाऊ युवा मंच'ने 'आत्ता नाही तर कधीच नाही' या जिद्दीने कंबर कसली आहे. त्यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय बजाज आणि शिवसेना ठाकरे दिगंबर जाधव यांनी उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर सांगली विधानसभा मतदारसंघात पक्षाची अधिकृत उमेदवारी कोण बाजी मारणार ? याबरोबरच कोणासमोर कोणाचे बंडखोरी उभी टाकणार यावर विजयाचे पारडे डावे उजवीकडे झुकू शकते.