| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जुलै २०२४
वयोश्री योजना, लाडकी बहीण योजना आणि त्या पाठोपाठ आलेली लाडका भाऊ योजना याबाबत सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या योजना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आखल्या असून, प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळण्याची शक्यता कमी असल्याचा आरोप यापूर्वी सर्वच विरोधी पक्ष नेत्यांनी केला होता. तर या योजनांमुळे राज्य कर्जाच्या खाईत लोटले गेल्याचा आरोप ही झाला होता.
तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी हे सर्व आरोप खोडून काढत, सरकारची पावले नि योजना सर्वसामान्य जनतेसाठी असून, यासाठी योग्य ते आर्थिक नियोजन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. परंतु आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी, लाडका भाऊ योजनेतून सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे.
याबाबत खुलासा करताना दानवे यांनी म्हटले आहे की ही योजना नवी नव्हे, ती 1974 पासून महाराष्ट्रात कार्यान्वित आहे सगळ्या योजनांना रोजगार प्रोत्साहन, प्रशिक्षण या माध्यमातून सरकार स्टायपंडरुपी अर्थसहाय्य देत आले आहे. परंतु सरकार जनतेचे आणि तरुणांची फसवणूक करीत असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
सरकार जुन्याच योजनांना मुलामा चळवीत मुख्यमंत्र्यांच्या नावाने नव्याने दाखवण्यात येत आहेत. असे सांगून दानवे यांनी म्हटले आहे की, जनतेने या योजनेच्या नावाला फसू नये. लाडका भाऊ असो किंवा लाडकी बहीण निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारला आठवू लागले आहेत. प्रत्यक्षात या योजना जुन्याच आहेत.
यावर शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दानवे यांच्यावर टीका करीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा खोटा प्रचार सुरू असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्ष नेत्यांना अजून आव्हान आणि आवाहन यातील फरक कळत नाही असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.
दरम्यान काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी योजनेवरुन सरकारला कोंडीत पकडले आहे. लाडक्या भावाला सहा आठ आणि 12000 असे मानधन देणार असाल तर लाडक्या बहिणीला केवळ पंधराशे रुपये का ? असा सवाल करून महिलांची किंमत इतकी कमी आहे का असा सवाल करीत, महिलांनाही पाच हजारांच्या वर रक्कम द्यावे अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.