| सांगली समाचार वृत्त |
पिंपरी चिंचवड - दि. ९ जुलै २०२४
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतीय संविधानासह अन्य देशाच्या संविधानांचा अभ्यास सर्वसामान्य नागरिकांना करता यावा. या करिता पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण ''संविधान भवन'' प्रस्तावित केले आहे. संविधान साक्षरता या हेतुने हाती घेतलेल्या या कामाला गती द्यावी, असे आदेश संबंधित विभागांना दिले होते. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने संविधान भवन उभारणेकामी सल्लागार नियुक्तीची कार्यवाही सुरु केली आहे.
भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाबाबत जनजागृती व्हावी. या करिता जगातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी संविधान भवन बाबत सकारात्मक चर्चा झाली होती. सल्लागार नियुक्तीसाठी दि. ९ ते १८ जुलै २०२४ पर्यंत वास्तुविशारद नेमणूक करणे व त्याकामी दरपत्रक मागवण्यासाठी कोटेशन नोटीस प्रसिद्ध केली आहे. ई-कोटेशन सीलबंद दरपत्रक मागवण्यात आले आहे.
कुठे होणार संविधान भवन ?
तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये सदर संविधान भवन व विपश्यना केंद्र प्रस्तावित असून, प्राधिकरणाच्या सभा क्र. ३३७ दि. २२ जानेवारी २०१९ च्या विषय क्रमांक ४ अन्वये ठराव मंजुर केला आहे. त्यानुसार, पेठ क्रमांक ११ मध्ये ''संविधान भवन व विपश्यना केंद्र '' उभारणीसाठी मान्यता दिली आहे. सदर दोन्ही प्रकल्प स्वतंत्रपणे विकसित करण्याची आवश्यकता आहे. प्रकल्प सल्लागार नियुक्ती व तज्ञ समितीची नेमणूक करण्यासह प्राधिकरण सभेची मान्यताही मिळाली आहे. त्याअनुशंगाने, 'पीएमआरडीए' प्रशासन पेठ क्रमांक ११ मधील संबंधित जागा पीसीएमसीला हस्तांतरीत करणार आहे. या ठिकाणी संविधान भवन, विपश्यना केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी असे नियोजन करण्यात येणार आहे.
संविधान भवन उभारणीसाठी 'पीएमआरडीए'कडून पेठ क्रमांक ११ मधील जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया आणि या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सल्लागार नियुक्तीनंतर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी प्रशासनाने दिली आहे.