Sangli Samachar

The Janshakti News

ब्रँडेड पिठामध्ये दगडी पावडर मिसळून ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सर्वत्र संताप !


| सांगली समाचार वृत्त |
अलिगड - दि. ३१ जुलै २०२४
नफेखोरीसाठी विविध खाद्य पदार्थात विविध प्रकाराची भेसळ आपल्याला नवीन नाही. दररोज याबाबतच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होत असतात. असे भेसळयुक्त पदार्थ आपल्या आरोग्यास घातक आहेत हे माहीत असूनही बाजारातून असे अनेक पदार्थ आपण खरेदीही करीत असतो. उत्तर प्रदेश मधील अलीगड येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अन्न सुरक्षा आणि आवश्यक प्रशासन विभागाने केलेल्या छापीमारीमध्ये स्थानिक पिठाच्या गिरणीत एक दोन नव्हे तर तब्बल 400 किलो दगडाची पावडर आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. 

येथील दळलेले पीठ 'पंचवटी आटा' या नामवंत ब्रॅण्डेड कंपनीकडे जात असल्याचेही उघडकीस आले आहे. या दगडाच्या पावडरला अलबस्तर असे म्हणतात. अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय जयस्वाल यांनी स्थानिक जिल्हा अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला असल्याचे सांगितले. अलिगड औद्योगिक वसाहतीमध्ये हा कारखाना असून, येथील कामगारांना दगडी पावडरची भेसळ करताना रंगेहात पकडले आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासनाने तातडीने या पिठाचा बाजारातील सर्व साठा काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. आता या कंपनीवर कठोर कारवाई करण्यासंदर्भातील हालचाली अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासनाने सुरू केले आहेत.


दरम्यान अशा प्रकारची भेसळ केवळ 'पंचवटी आटा' या पिठात होते की अशाप्रकारे विकल्या जाणाऱ्या ब्रॅण्डेड कंपन्या असा प्रकार करतात का हा प्रश्न उपस्थित होत असून, पिठाच्या दर्जाबाबत समाजातून शंका उपस्थित केली जात आहे.