yuva MAharashtra महापुरामुळे सांधल्या पुन्हा मनभेदाच्या भिंती, एकमेकांच्या मदतीसाठी धावले अमर अकबर अँथनी !

महापुरामुळे सांधल्या पुन्हा मनभेदाच्या भिंती, एकमेकांच्या मदतीसाठी धावले अमर अकबर अँथनी !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जुलै २०२४
कोयना, चांदोली, राधानगरीसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामधील इतर धरणातील पाणलोट क्षेत्रात तसेच सर्वच नद्यांच्या परिक्षेत्रात पडणाऱ्या कोसळधार पावसामुळे पंचगंगा नदीतील पाण्याने काल धोका पातळी वाढली. वारणा नदीही पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या वेगवान प्रवाहाने संत वाहणाऱ्या कृष्णा नदीचा फुगवटा वाढला आणि कृष्णेने आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. 


काल काका नगर सूर्यवंशी प्लॉट आरवाडे पार्क मगरमच्छ कॉलनी इत्यादी भागातील गल्ल्यागल्ल्यांमध्ये पाणी शिरले आणि लोकांची धावपळ सुरू झाली. प्रशासनाबरोबरच स्थानिक स्वयंसेवकांचे व या भागातील तरुणांचे हात मदतीसाठी सरसावले. हे हात होते सर्व धर्मीयांचे. विशाळगड प्रकरणावरून कटुतेच्या पडलेल्या अनेकांच्या मनभेदाच्या भिंतीना पुन्हा एकदा सांधल्या. पृथ्वीराज पाटील फाउंडेशन, मदन भाऊ युवा मंच तसेच पप्पू डोंगरे आणि इतर कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागाकडे धाव घेतली असून, या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान आज सकाळी सहा वाजता कृष्णा नदीचे सांगली आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी 36 झाली असून कोयना धरणाचे काही वक्र दरवाजे उघडण्यात आले असून वीस हजार क्युसेसने पाणी सोडल्यामुळे ती लवकरच 40 चा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर पातळीतील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.