| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ जुलै २०२४
महाविकास आघाडीचं विधानसभेनंतर सरकार आलं… तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? होय… अगदी विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं नसताना… जागावाटप आणि निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न चांगलाच पेटलाय… 2019 साली सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला… शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष वैचारिक मत भिन्नता असतानाही एकत्र आले… आणि त्यांनी त्यांचं सरकारही उत्तमरित्या चालवलं… त्यावेळेस मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना… शिवसेनेच्याच येण्यानं हे सरकार बनल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची देणं रास्त होतं… पण शरद पवारांच्या हट्टामुळे ठाकरेंनी पक्षातील चेहऱ्याला पुढे न करता स्वतः मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळली… यानंतर शिंदेंनी घडवून आणलेलं बंड… पक्षात पडलेल्या दोन फुटी..
महाविकास आघाडीच्या बाजूने असणारं वारं हे आपण पाहत आहोतच… त्यामुळे आगामी विधानसभेला महाविकास आघाडीला १७० ते १८० जागा जिंकण्यात यश येईल, असं मत राजकीय विश्लेषकही व्यक्त करतायत… त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आलीय ही बॉटम लाईन पकडून चालायचं झालंच तर मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार नेमके कोण असतील? शिंदेंकडून महाविकास आघाडीच्या कोणत्या राजकीय चेहऱ्याकडे मुख्यमंत्री पदाची खुर्ची पास होईल? करंट स्टेटसमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणती राजकीय व्यक्ती परफेक्ट फीट बसू शकते? त्याचाच घेतलेला हा आढावा…
सर्वात आधी बोलूयात शिवसेना ठाकरे गटाबद्दल…. तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शिवसेनेकडून नो डाऊट मुख्यमंत्रीपदासाठी नाव असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं… या आधीच त्यांनी 2019 पासून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचा अनुभव त्यांच्या पाठीशी राहिलाय… सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदावर असतानाच शिवसेनेची फूट होऊन भाजपच्या मदतीने शिंदे मुख्यमंत्री झाले होते… त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून महाविकास आघाडी शिंदे आणि भाजपाला तगडा मेसेज देऊ शकते… लोकांच्या मनातही महाविकास आघाडी बद्दलचा रिस्पेक्ट वाढू शकतो… त्यात संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गटाचाच नोव्हेंबर मध्ये मुख्यमंत्री दिसेल, हे बोलून सीएम पदाच्या खुर्चीसाठी आत्तापासूनच बुकिंग करायला सुरुवात केलीये… त्यामुळे ठाकरेंचेच मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस जास्त वाढतात… राहिला प्रश्न तो केवळ 2019 साली ठाकरे यांना मुख्यमंत्री पद दिल्यामुळे आता हे पद काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात यावं, असा हट्ट धरला जाऊ शकतो… हीच एक गोष्ट शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळण्यासाठी अडचणीची ठरू शकते…
यानंतर पाहूया काँग्रेस कडून मुख्यमंत्रीपदासाठी नेमकं कोण शर्यतीत आहे ते… तर यात सर्वात पहिलं नाव येतं ते नाना पटोले यांचं… काँग्रेसला महाराष्ट्रात जी काही नवसंजीवनी मिळाली त्यात नाना पटोले यांचंही योगदान महत्त्वाचं आहेच… मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची अपेक्षा त्यांनीही नकळतपणे का होईना अनेकदा बोलून दाखवलीय… त्यात विदर्भात काँग्रेसला लोकसभेला मिळालेलं यश पाहता काँग्रेस विधानसभेलाही उत्तम कामगिरी करेल, असा सध्या अंदाज आहे… असं झाल्यास नाना पटोले यांच्याच नावाचा काँग्रेसकडून सर्वप्रथम विचार केला जाईल… पण राज्यातील पक्षातीलच असणारा स्थानिक नेत्यांशी संघर्ष पाहता ते थोडेसे बॅक फुटला जाऊ शकतात….
यात आणखीन एक नाव ॲड केलं जाऊ शकतं ते म्हणजे सतेज पाटील यांचं… पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पट्ट्यातील काँग्रेससाठीच हे एक महत्त्वपूर्ण नाव… या आधी सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाचा त्यांना अनुभव आहेच… पण प्रशासकीय कामांसोबत राजकीय डावपेच टाकण्यात सतेज पाटील यांचा कुणी हात धरू शकत नाही… कोल्हापूरच्या राजकारणाची हाव जवळपास सर्वच पक्षांना सुटली… त्यांनी तसे प्रयत्नही केले… पण कठीण काळातही हे प्रयत्न हाणून पाडण्याचं काम केलं ते सतेज पाटील यांनी… नुकतीच कोल्हापूर लोकसभेसाठी त्यांनी शाहू छत्रपतींना निवडून आणण्यात महत्त्वाची कामगिरी केली होती… त्यामुळे तरुण, तडफदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जशास तस उत्तर देणारा चेहरा म्हणून काँग्रेसकडून सतेज पाटलांच्या नावाची शिफारस होऊ शकते…
आता वळूयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडे… अगदी कमी कालावधीत शून्यातून उभारलेला आणि लोकसभेला सामोरे जात तब्बल आठ जागांवर दणदणीत विजय मिळवून दाखवण्याची किमया केलेला पक्ष म्हणून सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे पाहिलं जातंय… सहानुभूतीची लाट आणि राजकारणाचे डावपेच माहीत असल्यामुळे तुतारीला विधानसभेलाही जास्तीत जास्त आमदार निवडून आणता येतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे… त्यामुळे अजित पवार गटाला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला जाऊ शकतो…
तेव्हा यात पहिलं नाव येईल ते अर्थात जयंत पाटील यांचं… शरद पवारांची सगळ्यांनी साथ सोडली… पण जयंत पाटलांनी आपला निष्ठेचा हात कायम शरद पवारांच्या सोबत ठेवला… अगदी त्यांच्या फुटण्याच्या अनेक वावड्या उठल्या पण निष्ठा कशी असते हे सिद्ध करून दाखवलं ते पाटलांनीच… सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांनी फूट पाडल्यानंतर पक्ष उभा करण्यापासून ते प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत फ्रंटला राहून काम करत होते, ते जयंत पाटीलच… प्रदेशाध्यक्षपदाचा प्रदीर्घ अनुभव त्यासोबतच सरकारमध्ये विविध खाती सांभाळण्याचा अनुभव पाहता शरद पवार जयंत पाटील यांच्याच नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्का मारतील हे कन्फर्म समजलं जातंय… बाकी महिला नेतृत्व म्हणून राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याचा विषय आलाच तर सुप्रिया सुळे यांना दिल्लीतून राज्यात लॉन्च केलं जाऊ शकतं… पण त्यासाठी सध्या तरी बऱ्याच अडचणी दिसतायत…तर अशी आहेत मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असणारी महाविकास आघाडीची काही प्रमुख चेहरे…