yuva MAharashtra नववी ते अकरावीच्या गुणावर बारावीचा निकाल अवलंबून, पारखच्या अहवालावर इतरही पर्याय !

नववी ते अकरावीच्या गुणावर बारावीचा निकाल अवलंबून, पारखच्या अहवालावर इतरही पर्याय !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३१ जुलै २०२४
आतापर्यंत दहावी व बारावी हे दोन टप्पे महत्त्वाचे होते. परंतु आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार बारावीची परीक्षा शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या काळात बारावीच्या निकालात नववी, दहावी आणि अकरावीचे गुण महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

पारख नावाच्या राष्ट्रीय मूल्यांकन नियामकाने नुकत्याच शिक्षण मंत्रालयाला यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. अहवालानुसार इयत्ता नववी ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्याने मिळवलेले गुण हे इयत्ता बारावीच्या त्याच्या अंतिम निकालाशी जोडले जावेत. अहवाल सादर करण्यापूर्वी पारखने गेल्या वर्षी ३२ शाळांशी या विषयावर सखोल चर्चा केलेली आहे.


इयत्ता नववी, दहावी आणि अकरावी मधील विद्यार्थ्यांची कामगिरी आणि परीक्षा या दोन्हींवर आधारित गुण इयत्ता बारावीच्या शेवटी विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, असे पारखने शिक्षण मंत्रालयाला दिलेल्या अहवालात म्हंटले आहे. देशभरातील शाळा मंडळाद्वारे याचे मूल्यांकन करण्यासाठी एनसीआरटीने मागील वर्षी पारखची स्थापना केली होती.

अहवालात नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना कामगिरीच्या आधारे बारावीचा निकाल तयार करण्यात यावा, असे म्हंटले आहे. या तीन वर्गातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगली कामगिरी केली आणि सतत वर्गात उपस्थित राहिल्यास त्याचा फायदा त्यांना बारावीच्या निकालात मिळायला हवा, असे अहवालात म्हंटले आहे.

पारखच्या अहवालात इयत्ता बारावीच्या निकालात इयत्ता नववीला १५ टक्के, दहावीला २० टक्के आणि अकरावीला २५ टक्के वेटेज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय बारावीच्या निकालामध्ये एकत्रित मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह असेसमेंट (संपूर्ण प्रगतीपुस्तक,प्रकल्प) आणि सहामाही परीक्षा यांनाही महत्त्व दिले जाईल, असेही अहवालात म्हंटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , शिक्षण मंत्रालय हा अहवाल सर्व राज्य शाळा मंडळांना पाठवणार आहे. जेणेकरुन सर्वांनी यावर आपले मत मांडावे आणि सर्वांनी सहमती दर्शवल्यास हा अहवाल लवकरच लागू करता येईल. गेल्या वर्षभरात या शिफारशीवर ३२ शाळा मंडळांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेची पहिली फेरी झाली होती.

या बैठकीमध्ये राज्यांनी वेगवेगळे युक्तिवाद केले. इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीची कामगिरी बारावीच्या रिझल्टमध्ये एकत्रित करण्याऐवजी नववीमधील ४० टक्के आणि दहावी मधील ६० टक्के वेटेज याच्यावर दहावीचा निकाल दिला पाहिजे. तसेच अकरावीमधील ४० टक्के आणि बारावीतील ६० टक्के वेटेजवर बारावीचा निकाल द्यायला हवा, असे राज्यांनी सुचवले आहे.