| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २३ जुलै २०२४
मोदींच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकालाला हातभार लावणाऱ्या बिहार आणि आंध्रप्रदेशावर निधीची खैरात करणाऱ्या सरकारने, बहुमतापासून रोखलेल्या महाराष्ट्राला ठेंगा दाखवल्यासाठीच की काय... देशात सर्वाधिक कर भरणाऱ्या या राज्याला अर्थसंकल्पात ठेंगा दाखवला असल्याचा आरोप महाराष्ट्रातील विरोधकांनी केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये एनडीत सहभागी असलेल्या नितीश कुमार यांच्या बिहारसाठी तसेच चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्रप्रदेशसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. बिहारमध्ये एक्सप्रेस वे बनवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशाला अतिरिक्त 15 हजार कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राला मात्र ठेंगा
मात्र या बजेटमध्ये मुंबई, तसेच महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, शोभा बाच्छाव, विशाल पाटील, बळवंत वानखेडे, प्रतिभा धानोरकर, प्रियंका चतुर्वेदी आदी नेते यावेळी उपस्थित होते. महाराष्ट् आणि मुंबईच्या तोंडाला पान पुसण्याच काम सरकारने केले, येणाऱ्या काळात जनता विधानसभेच्या निवडणुकीत यांना धडा शिकवेल, असा इशारा यावेळी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.
विजय वडेट्टीवार संतापले!
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा!
देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का ? असा सवाल करून वडेट्टीवार म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये पळवणार आणि बजेट मध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं ? असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.