| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २१ जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने कंबर कसली आहे. या निवडणुकीत किती जागा लढवायच्या यावर भाजपात अंतर्गत खल चालू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी झाल्या. महाराष्ट्रातही भाजपाला मोठा फटका बसला आहे.
त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपाकडून महाराष्ट्र सरकार, तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा जोमात प्रचार केला जातोय. विरोधकांच्या टीकेला आणखी ताकदीने उत्तर देण्यासाठी भाजपाकडून रणनीती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विरोधकांच्या आरोपांना तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येकवेळी आदेशाची वाट पाहू नका. थेट मैदानात उतरा, असे फडणवीस म्हणाले आहेत.
पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहतो
देवेंद्र फडणवीस आज (21 जुलै) प्रदेश भाजपाच्या महाअधिवेशनात बोलत होते. यावेळी बोलताना विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवतात. विरोधक म्हणतात सिलिंडरच्या किमती वाढल्या. आम्ही 2013 सालच्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. त्या सध्याच्या किमतीपेक्षा अधिक होत्या. या किमती दाखवल्यानंतर ते गप्प बसतात. मी आत्मचिंतन करतोय. आपली एक अडचण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर मी उत्तर देईन. नाहीतर देणार नाही, असे प्रत्येकजण म्हणतो, असे फडणवीस म्हणाले.
मैदानात उतरा, थेट बॅटिंग करा, पण...
आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करावी. मैदानात उतरा. पण अट एकच आहे. हीट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. तुम्हाला खोटं बोलायचंच नाही. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. त्यांना खोटं बोलायचं आहे. तुम्हाला खरं बोलायचं आहे. तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजेत, असा आदेशच फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार हे लिहून ठेवा, असा दावा केला आहे. तसंच त्यांनी राज्यातील जनता आपल्याच पाठीशी असल्याचंही म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, "सध्या चातुर्मास सुरु आहे. हा मास तपश्चर्येचा आहे. या मासाचा संपर्क, संवाद आणि तपस्येसाठी उपयोग करायचा असतो. आपणाला हा चातुर्मास समर्पनाचा म्हणून साजरा करायचा आहे. मी आधीच सांगितलं या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं 2013 ला असंच अधिवेशन घेतलं आणि 2014 ला आपण पूर्ण बहुमताने निवडून आलो. पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आजची तारीख लिहून ठेवा, देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं लिहून ठेवा. या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचचं सरकार निवडून येईल." असा दावा फडणवीसांनी यावेळी केला.
भाजपचा विचार गावागावपर्यंत पोहचवा
तसंच ते म्हणाले, "ही पुण्यभूमी (Pune) आहे. महाराजांच्या पायाने पावन झालेली, शिक्षणाचं माहेर घर असणारी, समाजसुधारकांचं माहेरघर असणारी ही भूमी आहे. इथला विचार गावागावपर्यंत पोहोचतो. भाजपचा विचार गावागावपर्यंत पोहचवण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. आपण 2014, 2019, 2024 सालची निवडणूक लढलो 2014 ला लोकांचा निर्धार बघितला 2019 लोकांचा पाठींबा बघितला आणि 2024 ला देखील जनता आपल्याच पाठीशी होती," असंही फडणवीस म्हणाले.