Sangli Samachar

The Janshakti News

जिल्ह्यातील म्हैशाळ टेंभू ताकारी उपसा सिंचन योजना सौर प्रकल्पाखाली येणार - संजय काका पाटील


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ३ जुलै २०२४
सांगली जिल्ह्यातील प्रायोगिक तत्त्वावर सौर ऊर्जा योजनेखाली आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली असून या सौर प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून 2.35 टक्के इतक्या कमी व्याज दराने निधी दिला जाणार आहे. यामध्ये राज्य सरकार योजनेच्या तीस टक्के रक्कम देणार आहे, अशी माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी बोलताना संजय काका म्हणाले की, ही योजना लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सौर ऊर्जेमुळे योजना बंद होण्याची शक्यता कमी असून, खर्चात बचत होणार आहे. म्हैशाळ योजनेबरोबरच जिल्ह्यातील टेंभू आणि ताकारी या सिंचन योजनाही सौर ऊर्जा खाली आणण्याचा राज्य सरकारचा मनोदय आहे.


केंद्र सरकारने पायलट तत्त्वावर ही म्हैशाळची योजना मंजूर केली आहे. त्यातून 200 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे. या योजनेसाठी पंधराशे ते सोळाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 30 टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे तर इतर रक्कम 2. 35% व्याजाने जागतिक बँक देणार आहे. तिला केंद्र सरकारची गॅरंटी आहे असेही संजय काका म्हणाले.

येत्या तीन महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरात लवकर कामात सुरुवात होईल असे सांगून सध्या काका म्हणाले की म्हैशाळ, टेंभू, ताकारी या योजनेतून यावर्षी 40 टीएमसी पाणी उचलण्यात आले असून, हे देशातील तीन प्रकल्प सर्वात मोठे प्रकल्प ठरले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वीज बिला पोटी खर्च होणारे 57 कोटी रुपये दरवर्षी वाचतील, असे सांगून संजय काका म्हणाले की टेंभू व ताकारी योजनेसाठी सर्वे करण्यासाठी यापूर्वीच पत्र दिले होते. म्हैशाळ आणि टेंभू विस्तारित या दोन्ही योजनांची टेंडर्स उघडण्यात आली असून, लवकरच मुख्य पाईपलाईन आणि वितरणाचे काम सुरू होणार आहे या योजनेमुळे जत तालुक्याचा कायमचा दुष्काळ संपेल असेही संजय काकांनी सांगितले.