yuva MAharashtra विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन !



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १७ जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन २१ जुलै रोजी संपन्न होणार असून यामध्ये मतदार यादी, बुथ यंत्रणा, राज्य व केंद्र सरकारने केलेली कामे यावर पक्षाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की अधिवेशनाला राज्यभरातून सुमारे पाच हजाराहून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आदी नेत्यांसह पक्षाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाळा यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव अधिवेशनात संमत केला जाईल असेही बावनकुळे म्हणाले.


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे हे सर्वांनाच मान्य आहे परंतु तरीही आम्ही कधी कधी लहान भावाची भूमिका ही घेतो. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना 'मुख्यमंत्र्यांचा चेहरा' कोण असेल ? याबाबत प्रदेश कार्य करण्याच्या अधिवेशनात चर्चा होणार नाहीत तो निर्णय महायुतीचे नेतेच ठरवतील असेही बावनकुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत चारशे पार चा दावा भाजपाने केला होता विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकणार ? या प्रश्नाला त्यांनी सावधपणे उत्तर दिले. महायुतीला किती जागा मिळतील हा आकडा जनताच ठरवेल.

दरम्यान ऑगस्ट महिन्यात महाविकास आघाडीचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी भाजपतर्फे राज्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान संवाद यात्रा काढली जाणार आहे यामध्ये २० राज्यांमधील नेते २८८ विधानसभा मतदारसंघात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपावर अनेक खोटे आरोप करण्यात आले. मतदारांना संभ्रमित करणारा हा खोटारडेपणा आम्ही जनतेच्या समोर मांडू. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसमोर सांगितले.