yuva MAharashtra अलमट्टी धरणाची आणि हिप्परगी बंधाऱ्याची सुरक्षित पाणी पातळी ठेवण्यासाठी कर्नाटक प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना साकडे

अलमट्टी धरणाची आणि हिप्परगी बंधाऱ्याची सुरक्षित पाणी पातळी ठेवण्यासाठी कर्नाटक प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना साकडे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जुलै २०२४
अलमट्टी धरणाची पाणी पातळी जास्तीत जास्त ५१३.६० मीटर आणि हिप्परगा हिप्परगी बंधाऱ्याची पाणी पातळी जास्तीत जास्त ५१८ मीटर तातडीने ठेवण्याकरिता, कर्नाटक प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती सांगली, कोल्हापूर अंकुश आंदोलन कोल्हापूर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

कृष्णा खोऱ्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा असे तीनही जिल्हे महापुरामुळे संकटात आले आहेत. अलमट्टी धरणाची पाणीपातळी ३१जुलै अखेर ५१३.६० मीटरला स्थिर करा आणि हिप्परगी बंधाऱ्याची पाणी पातळी ५१८ मीटरला स्थिर करा अशी मागणी आमच्या समितीतर्फे आपल्याकडे तसेच सांगली, कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने करण्यात आली. त्यासाठी आंदोलनेही झाली. आपण स्वतः एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अधिकाऱ्यांना या पाण्याच्या लेवलवर लक्ष ठेवा आणि ही अलमट्टी आणि हिप्परगी बंधाऱ्यातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सातत्याने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधा असे सांगितले होते.


परंतु सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्हा अधिकारी व बेळगाव जलसंपदा विभागाशी अजिबात संपर्क साधलेला नाही. तसेच अलमट्टी आणि हिप्परगी बंधाऱ्यातील बंधाऱ्याशी संबंधित जलसंपदा विभागाला पाणी पातळी ५१३.६० आणि ५१८ मीटर ठेवण्यासाठी बिलकुल तगादा लावलेला नाही. परिणामी आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा महापुराचे संकट ओढवले आहे. तसेच अलमट्टी धरणातून साडेचार लाख की क्यूसेक्स विसर्ग सुरू करा, अशीही मागणी समितीने केली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सरकार आणि सांगली, कोल्हापूर व बेळगाव या तिन्ही जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तातडीने अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१३.६० आणि हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी पातळी ५१८ मीटर ठेवण्यासाठी आपण कर्नाटक शासनाची तातडीने समन्वय साधावा, अन्यथा सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही शहरे पाण्याखाली बुडतील अशी भीती वाटते आहे.

सांगली, कोल्हापूर ,सातारा या तिन्ही जिल्ह्यातील सर्व धरणे ९५ टक्के भरली आहेत. त्यामुळे सर्व धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याच वेळी सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. साहजिकच पाण्याचा प्रचंड प्रवाह कर्नाटकाकडे वाहून जात आहे. त्यामुळेच सांगली, कोल्हापूर, सातारा, बेळगाव, विजापूर आणि बागलकोट या जिल्ह्यातील जनजीवन, शेती, व्यवसाय संकटात आला आहे. त्याची कोणतीही जाणीव दोन्ही राज्यातील सरकार आणि स्थानिक जिल्हा प्रशासन यांना नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
अलमट्टीपासून ते कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्यापर्यंत आणि अलमट्टीपासून सांगलीपर्यंत कृष्णा, पंचगंगा, वारणा अशा सर्व नद्यांचे पाणी वाढते आहे. आणि जागच्या जागी थांबून राहत आहे. याचे कारण अलमट्टी धरण आणि त्या शेजारच्या हिप्परगी बंधार्‍यातून पाण्याचा विसर्ग पुरेशा प्रमाणात होत नाही. सन २०१९ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली असताना अलमट्टी धरणातून अगदी अखेरच्या टप्प्यात साडेचार लाख विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतरच सांगली कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यातील महापुराने माघार घेतली होती. आजच्या परिस्थितीत याच पद्धतीने प्रचंड विसर्ग करण्याची गरज आहे. 

सांगली, कोल्हापूर आणि सातारा येथील धरणातील विसर्ग आणि मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी असे सुमारे तीन लाख ५५ हजार क्युसेक्स पाणी राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकात प्रवेश करीत आहे. अलमट्टी धरणातून मात्र फक्त साडेतीन लाख क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तो तातडीने साडेचार लाख क्यूसेक्स करण्याची गरज आहे. अलमट्टी धरणातून तातडीने चार ते साडेचार लाख विसर्ग वाढवण्याची गरज आहे. तरच कृष्णा खोऱ्यातील पाणी वेगाने पुढे जाईल. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सरकार तसेच सांगली, कोल्हापूर व बेळगाव येथील जिल्हा प्रशासन यांनी तातडीने हालचाली करून अलमट्टीतून विसर्ग वाढवावा अन्यथा अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण येत्या पाच ते सहा ऑगस्टपर्यंत तरी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा, राधानगरीसह सर्व धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढणार आहे. म्हणून आत्ताच अलमट्टी धरणातून किमान साडेचार लाख क्युसेस विसर्ग करण्याची गरज आहे. तसेच अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाणीपातळी नियंत्रित करण्याची गरज आहे. कृपया आपण सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना बेळगाव जिल्हाधिकारी तसेच अलमट्टी धरणाचे अधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

या निवेदनावर, सर्जेराव पाटील, समन्वयक कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती, सांगली व कोल्हापूर, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, धनाजी चुडमुंगे, अंकुश आंदोलन समिती, कोल्हापूर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.