| सांगली समाचार वृत्त |
बारामती - दि. १४ जुलै २०२४
लोकसभा निवडणुकीत एकही खासदार निवडून न आल्याने टीकेचे धनी बनलेले राष्ट्रवादीचे दादा अर्थात अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आपल्या वाट्याचे दोन्हीही आमदार निवडून आणले. आता त्याने विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. आणि याची सुरुवात त्यानी लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघात आपल्या पत्नीलाही निवडून आणू शकले नाहीत, त्याच बारामती मधून रणशिंग फुंकले आहे.
आज झालेल्या बारामती येथील राज्यव्यापी जनसमान मेळावा आयोजित करून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना जागवली. यावेळी त्यांनी केलेले भाषण सध्या विविध सोशल मीडियावरून वायरल होते आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या पत्नीचा पराजय पचवून अजित पवार नव्या जोमाने विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत.
यावेळी झालेल्या भाषणात त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. त्याचवेळी मतदारांना आवाहन करताना अजितदादा म्हणाले की, मी जो वादा करतो तो पुरा करतोच. लोकसभेला जे झाले ते झाले, आता त्याची विधानसभेत पुनरावृत्ती नको. राज्यातील महायुतीच्या कारभाराची प्रशंसा करीत अजित दादा म्हणाले की, महायुतीने आणलेल्या योजना या दोन महिन्यासाठी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. पण या योजना पुढे सुरू ठेवायच्या असतील तर राज्यातील मतदाराने महायुतीलाच भरघोस मतांनी निवडून द्यायला हवे.
आपल्या भाषणात त्यांनी शरद पवार किंवा आपल्या पुतण्यावर 'ब्र' ही काढला नाही. लोकसभा निवडणुकीत केवळ आणि केवळ शरद पवार आणि आपल्या घराण्यातील व्यक्तीवरच त्यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे शरद पवारांवर साठ वर्षाहून अधिक काळ प्रेम करणाऱ्या बारामतीकरांना त्यांचे हे आरोप खटकले होते. याचाच परिपाक म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ सुनीता ताईंचा झालेला पराभव. आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीत त्यांनी ही चूक सुधारण्याची ठरविल्याचे बोलले जाते.