Sangli Samachar

The Janshakti News

खाकी वर्दीत दिसलं आईचं कोमल हृदय !


| सांगली समाचार वृत्त |
पिंपरी चिंचवड - दि. ८ जुलै २०२४
पोलीस हा नेहमीच टीकेचा धनी बनलेला आहे. अर्थात याला कारणेही तशीच आहेत. जी आपण सर्वचजण जाणतो. परंतु कधी कधी अशा काही घटना घडतात, ज्यामुळे 'या खाकी वर्दीत अजूनही माणुसकी जिवंत आहे !' असं आपण म्हणतो. मग कधी हा खाकी वर्दीतील पोलीस अपंग व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करतो, कधी सिग्नल मवर बंद पडलेली फोर व्हीलर ढकलण्यासाठी मदत करतो. कधी भिकाऱ्याला आसरा मिळवून देतो. एक ना शेकडो. असाच एक प्रकार पिंपरी चिंचवड येथे घडल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे, ज्यामुळे खाकी वर्दीतील आईच हृदय सर्वांना अनुभवास मिळालं.

याबाबत अधिक माहिती अशी की सध्या राज्यात सर्वत्र पोलीस भरती सुरू आहे. राज्यभरात लाखो तरुण-तरुणी यासाठी कष्ट घेताना पहावयास मिळत आहेत. याच दरम्यान पिंपरी चिंचवड येथे 262 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भोसरी, इंद्रायणी नगर भागात 19 जून ते 10 जुलै अखेर पोलीस भरती प्रक्रिया पार पडत आहे.



शनिवार दिनांक 6 जून रोजी एक महिला उमेदवार आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन मैदानी परीक्षेसाठी आलेले होती. त्यांना आपल्या बाळाला मैदानाच्या बाजूला ठेवलं आणि ती परीक्षेत उतरली. यावेळी अचानक बाळ रडायला लागलं. बराच वेळ ते बाळ रडत होतं. या बाळाकडे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस अंमलदाराचं लक्ष गेलं. तिने तात्काळ या बाळाला आपल्या कुशीत उचलून घेतलं त्यामुळे हे बाळ शांत झालं. परीक्षा झाल्यानंतर महिला उमेदवारांनं त्या पोलीस महिला अंमलदाराचे मनःपूर्वक आभार मानले, आणि आपलं बाळ जवळ घेतलं याच घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. आणि महिला पोलिस अंमलदारावर कौतुकाचा वर्षाव हे होत आहे.