yuva MAharashtra भारतातील कांद्याला मारायचे, पाकिस्तानच्या कांद्याला जगवायचे हे केंद्राचे धोरण - जयंत पाटील

भारतातील कांद्याला मारायचे, पाकिस्तानच्या कांद्याला जगवायचे हे केंद्राचे धोरण - जयंत पाटील


| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. २८ जुलै २०२४
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधकांमध्ये विविध प्रश्नांवर खडाजंगी पाहावयास मिळत आहे. विरोधक सरकारला धारेवर धरत असून, बीडमधून जयंत पाटलांनी सरकारला चांगलेच सुनावले. भारतातल्या कांद्याला मारायचे आणि पाकिस्तानातल्या कांद्याला जगवायचे, हे केंद्राचे धोरण असल्याचे सांगत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रावर तोंडसुख घेतले.

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना, महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठे यश संपादन केल्यानंतर, शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी फिल्डिंग लावत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आढावा घेत आहेत. काल त्यांनी बीड येथे कार्यकर्त्यांशी संपर्क साधत साधला. यावेळी विधानसभेसाठी जिल्ह्यातील तयारीचा रोड मॅप ठरवताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.


बीड जिल्हा राजकीय दृष्ट्या सोपा नाही. इथले प्रश्न दिल्लीत बसून सोडवायची गरज होती. बीडचा प्रश्न सोडवायचा असेल तर अतिरिक्त पाणी आणावे लागेल. असे सांगत लोकसभेतील विजय घटक पक्षातील मेहनतीमुळेच झाला असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पिक विम्याचा प्रश्न सरकारला सोडवता आला नाही पिक विमा मध्ये सगळ्यांचेच हात ओले होतात, असा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी सरकार वर केला. भारतातील कांदा निर्यातीवर कर, तोही ४० टक्के. भारतातल्या कांद्याला मारायचं आणि पाकिस्तानच्या कांद्याला जगवायचं हे केंद्र सरकारचे धोरण आहे निवडणूक आल्या आहेत आता कपडे काढून द्यायलाही ते तयार असल्याचे जोरदार टीका जयंत पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारवर केली आहे.