| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जुलै २०२४
मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदी काठावरील ८,५४४ शेतकऱ्यांचे ४,१३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये फळपिक, ऊस, सोयाबीन, भुईमूग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुरामुळे शेतकऱ्याला कोट्यावधी रुपयाचा फटका बसला आहे.
कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सर्व अतिवृष्टी सुरूच राहिल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे या नद्यांच्या काठावर पूर परिस्थिती निर्माण झाली. परिणामी ४,१३१ हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरामुळे कृष्णा नदीपेक्षा वारणा नदीकाठच्या शिराळा तालुक्यातील सर्वाधिक पिके पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यातील ३० गावातील ५,३७८ शेतकऱ्यांचे २,९१८ हेक्टर वरील उभे पीक पाण्याखाली गेले आहे. या क्षेत्रातील पावसाचा मोठा फटका आडसाली उसाला बसला असून अनेक ठिकाणी पुन्हा उसाची लागवड करावी लागणार आहे ऊसाप्रमाणेच हळदीच्या पिकाचेही जबर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला व फळ पिकांचे हे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.