| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जुलै २०२४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर, राज्यातील बहिणींनी यासाठी अर्ज करण्याकरिता, शासकीय कार्यालयाची आणि सेतू केंद्राची पायरी झिजवणे सुरू केले. परंतु यातील कागदपत्रांची जुळवा जुळव करताना तिची दमछाक होऊ लागली. यावरून सरकारवर विरोधकांकडून आणि महिला वर्गाकडून टीका झाल्यामुळे, लाडक्या बहिणींची ही धावाधाव थांबवण्यासाठी ही योजना नव्याने सादर करीत सुसूत्रता आणली गेली.
परंतु अजूनही काही महिलांची अडचण कमी होताना दिसत नाही. यातील एक कारण म्हणजे, माहेरच्या रेशन कार्ड वरून आपले नाव कमी करण्यासाठी भाऊरायाला करावी लागणारी मनधरणी... तर दुसरी सर्वात मोठे अडचण म्हणजे शाळेचा दाखला मिळवण्यासाठी माहेरी वाढलेली फेरी... यावरून आता माहेर आणि सासर दोन्हीकडून सरकारवर खापर फोडले जात आहे.
एक तर रेशन कार्डावरील लाभ घेण्यासाठी ज्या बहिणीचे नाव अद्याप कमी केले नाही, त्या भाऊरायांना आता बहिणीचे नाव कमी करावे लागणार आहे. त्यामुळे मिळणारा लाभ आहे कमी होणार असल्यामुळे भाऊराय नाराज आहे. तर दुसरीकडे, कागदपत्रे आणण्याच्या कारणावरून बहिणीचे वारंवार माहेरी जाणे सासरच्या लोकांना पसंत नाही. त्यामुळे भाऊजीही नाराज असल्याचे चित्र दिसत आहे...
आणि म्हणूनच एकीकडे भाऊरायाकडून दुसरीकडे भाऊजींकडून सरकारवर आरोपांचे घाव घाव घातले जात आहेत. आणि सध्या हाच सर्वत्र चर्चेचा व चेष्टेचा विषय बनला आहे. आता सरकार यावरून काय मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.