Sangli Samachar

The Janshakti News

निमित्त पुराचे... नव्या जाणीवांचे ! (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २२ जुलै २०२४
२ ऑगस्ट २०१९, पहाटे ५.१५ – ५.३० ची वेळ. बेंगलोरहून मिरजेकडे जाणारी राणी चन्नम्मा एक्सप्रेस रेल्वे आपला वेग हळूहळू कमी करत हुबळी स्टेशनच्या प्लॉटफॉर्मवर विसावली. 
“चाय गरम, गरम चाय, गरम इडली-डोसे”ची हाक कानावर पडू लागली. मी बसलेल्या रेल्वेच्या डब्यामध्ये ३-४ चहावाले आले. हवेत थोडा गारठा होता. एका चहा विक्रेत्याकडून मी चहा घेतला. थंड हवेमध्ये असा वाफळलेला चहाचे घोट घेताना जीवाला कसे मस्त वाटते. 
प्लॅटफॉर्म सोडायची वेळ आली की इच्छा असो की नसो रेल्वेला पुढच्या प्रवासाला निघावेच लागते. 

राणी चन्नमा रेल्वेची पण वेळ भरली आणि तिने हुबळी रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म सोडला. खिडकी बाहेर बघत गरम चहाचे घुटके घेण्याचा आनंद मी लुटत होतो. धारवाड स्टेशन सोडून आता राणीने अळणावरची वाट धरली. मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो. हिरवीगार शेते, जंगले, डोंगर, डोंगरमाथ्यावर विसावलेले काळे ढग, मधूनच वाहणारे छोटे-छोटे धबधबे, थोडेसे धुके, अधून मधून येणारी पावसाची सर, डोक्यावर इरले घेऊन शेतामध्ये काम करत असलेली माणसे. आपल्या कुंचल्याने पृथ्वीच्या कॅनव्हासवर चैतन्यमय सौंदर्यांच्या चितारलेल्या या सर्वश्रेष्ठ कलाकृती मागे असलेल्या ‘त्या’ हातांची माझ्या मनामध्ये जाणीव झाली आणि हे सर्व आपणाला फक्त ‘त्याच्या’ प्रेमामुळेच मिळते हे उमजून माझे मन कृतज्ञतेने भरून गेले. 

डोळ्यावाटे निसर्गराजाचे सौंदर्य हृदयामध्ये साठवत ५-६ तासांचा वेळ कसा गेला हे मला समजले नाही. राणी चन्नमा रेल्वे मिरज स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर थांबली आणि मी भानावर आलो. बॅग घेऊन स्टेशनच्या बाहेर आलो. बाहेर कुंद हवा होती, पाऊस येणार असे वाटत होते. वडापच्या रिक्षामध्ये बसून मी घराची वाट धरली. मनामध्ये कुणाकुणाला भेटायचे, कुठेकुठे जायचे याची उजळणी करत घरी पोहचतो न पोहचतोच पावसाला सुरूवात झाली.
मी विचार केला. जेवण करेपर्यंत पाऊस थांबेल मग ठरवल्याप्रमाणे मित्रांना भेटायला जाऊया. मी जेवण आटोपले. पाऊस कांही थांबला नाही. पेपर वाचत हॉलमध्ये कोचावर मी लवंडलो आणि भरपेट मस्त जेवणामुळे आलेल्या सुस्तीमुळे मला झोप लागली. जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. अजूनही पाऊस थांबलेला नव्हता. घराबाहेर पडायला मला नको वाटू लागले. मग मोबाइलवरच मित्रांशी बोललो. एकमेकांची ख्याली-खुशाली विचारली आणि दुस-या दिवशी भेटायला येत असल्याचे सांगितले. 


गावातला माझा पहिला दिवस असाच गेला. दुसरा, तिसरा दिवसही सर्वत्र ढगाळ, कोंदट वातावरण, सूर्यप्रकाशाचा पत्ता नाही, दिवसरात्र पडणा-या पावसामुळे तसाच गेला. 
पावसाच्या संतत धारेचा जोर आणि कृष्णा, वारणा, पंचगंगा सर्वच नद्यांच्या पाण्याची पातळी तासातासाला वाढत होती. रस्ते, टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट, संपर्क व दळणवळणाची सर्व साधने बंद झाले. पुराचे पाणी गावात घुसू लागले. गावातील दुकाने, घराचे पहिले मजले १५-२० फूटापर्यंत पाण्यात बुडाले. सरकारने सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. हजारो लोक पुराच्या पाण्याच्या विळख्यात अडकून पडले. 

माझ्या घराशेजारचा २५-२६ वर्षाचा तरूण मुलगा पुरात अडकलेल्या परिचितांना सोडावायला गेला आणि स्वतःच पुरात अडकून बसला. आणखी एका जवळच्या मित्राची तरूण मुलगी, तिचे ५-६ महिन्याचे बाळ आणि सर्व कुटुंब पुराच्या पाण्यात अडकून बसले होते. घरांचा, घरातील लोकांचा, मित्रांचा, माणसांचा एकमेकांशी संपर्क तुटला. घरापासून दूर असलेल्यांना घरातील लोकांची, व्यापारी, कारखानदारांना त्यांच्या दुकानांची, कारखान्यांची परिस्थिती समजण्याचा कांहीही मार्ग उपलब्ध नव्हता. ना कुणाशी कुणाला संपर्क साधता येत होता ना कांही करता येत होते. खरे तर काय करायचे हेच कुणाला समजत नव्हते. वर्तमानपत्राची पाने पुराच्या पाण्याच्या बातम्यांनी व फोटोंनी भरून गेली. टीव्ही चॅनेलवरील पुराच्या वेगाने वाहणा-या पाण्यात जनावरे, वाहने, घरसामान वाहून जात असलेली दृश्ये आणि जवळच्या एका खेड्यातील कांही लोक पुरातील पाण्यामध्ये नाव उलटल्याने मृत्यू पावल्याची बातमी टीव्ही चॅनेलवर पाहून मनामंध्ये धडकी भरत होती. पिण्याचे पाणी, भाजीपाला, दूध, औषधे, जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवू लागला. सर्व वातावरण नैराश्याने, असुरक्षिततेने, चिंतेने, भयाने भरून गेले. आता पुढे काय होणार, कधी थांबणार हे अस्मानी संकट?


ही परिस्थिती कांही दिवस अशीच होती. पण वेगवेगळ्या संस्था त्यांचे हजारो स्वयंसेवक आपल्या कष्टाची, वेळेची पर्वा न करता निस्वार्थीपणे या संकटाला तोंड द्यायला सज्ज झाले होते. सरकारी यंत्रणेकडूनही मदत सुरू झाली. पुरातील पाण्यामध्ये अडकून पडलेल्या लोकांना सोडवुन स्थलांतर करण्यासाठी आर्मी, नेव्हीचे जवान रात्रं-दिवस खपु लागले. सैनिक, स्वयंसेवक, सर्वजण, लोकांना मदत केली पाहिजे या एकाच भावनेने प्रेरित होऊन काम करू लागले आणि हळूहळू चित्र पालटू लागले. आजारी, वृद्ध, स्त्रिया, लहान मुले, तरूण सर्वांचे स्थलांतर करण्याचे काम वेगाने सुरू झाले.

शाळा, कॉलेज, मोठे हॉल यामध्ये स्थलांतरीत लोकांना आसरा दिला गेला. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाच्या सर्वच थरातून मदतीचा ओघ सूरू झाला. कपडे, चादरी, ब्लॅंकेट, औषधे, चपात्या, भाक-या, कोरडे धान्य, बिस्कीटे, दूध पावडर, चहा पुरग्रस्त लोकांना देण्यासाठी हजारो हात पुढे आले. डॉक्टर, नर्स पुरग्रस्तांना आवश्यक सेवा देण्यासाठी झटू लागले. माझ्या घराशेजारचा तरूण मुलगा घरी सुखरूप पोहचला. मित्राची तरूण मुलगी व तिच्या ५-६ महिन्यांच्या बाळाची घराच्या तिस-या मजल्यावरून सैनिकांनी सुखरूपपणे कशी सुटका केली याचे वर्णन मित्राकडून ऐकतांना माझ्या मनामध्ये उचबंळून आलेल्या भावना शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाहीत पण, ज्यांनी अशा घटनांचा अनुभव घेतला आहे त्यांना जाणणे शक्य आहे. 

हे सर्व पाहतांना, अनुभवतांना मनांत विचार आला, संकटात सापडलेल्यांना, भयाने खचलेल्या जीवांना धर्म, जात, पात, श्रीमंत, गरीब, काळा, गोरा अशा मानवाने स्वतःच कोत्या, स्वार्थी विचारांतून निर्माण केलेल्या तुच्छ गोष्टींना बाजूला सारून मदत करणारे हे हजारो हात म्हणजे, श्रीमद्भगवद्गीतेमध्ये वर्णिलेला ‘शतशोऽथ सहस्त्रशः, नानाविधानी, दिव्यानि, नाना वर्णाकृतीनि, बहु वक्त्रनेंत्र, बहुबाहूरूपादम्, अनेकाद्भुतम्, अनन्तरूपम्, नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं विश्र्वेश्र्वर विश्र्वरूप’ असा ‘तो’ तर नाही? माझ्या मनाची खात्री झाली प्रत्येक मनुष्यांच्या अंतर्यामी कुठेतरी खोलवर ‘तो’ वास करत असतो आणि ‘तोच’ माणसातील माणसाला जागा करतो आणि विविध रूपाने प्रगट होतो. 

११ ऑगस्ट, २०१९. पाऊस आता जवळजवळ थांबला होता. पुराचे पाणीही ओसरू लागले होते. आर्मी, नेव्हीच्या परतू लागलेल्या जवानांना बहिनी ओवाळत होत्या, राखी बांधत होत्या. गेली आठ-दहा दिवस दडी मारलेला सूर्यनारायण आकाशामध्ये अवतरला होता. त्याची सहस्त्र किरणे नवा दिवस आणि नव्या आशा घेऊन आली होती. मिरज-बेंगलोर रेल्वे वाहतूक सुरू झाली होती. दुपारी ३.३० ची राणी चन्नमा बेंगलोरकडे जाण्यास थोडीशी उशीरा कां होईना पण सुरू झाली. रेल्वेच्या डब्यातील सिटवर बसून पुराचे अजुनही न ओसरेलेले पाणी मी पाहत होतो आणि, माझ्या मनामध्ये विचार आला. माणसांने कितीही प्रगती केली तरी तो निसर्गापुढे हतबल आहे, त्याच्यावर तो मात करू शकत नाही. 

मनातील विचार पुढे सरकु लागले आणि मला समजले आपल्या कुंचल्याने पृथ्वीच्या कॅनव्हासवर नयनरम्य सौंदर्य रेखाटणाराही ‘तो’च आणि निसर्गाचे रौद्र रूप निर्मीणाराही ‘तो’च. 
पुर, भूकंप, वादळ अशा घटनांतून ‘तो’च माणसाला त्याच्या क्षुद्रपणाची जाणीव करून देतो पण त्याच बरोबर धैर्य, ममता, प्रेम, परस्पर सहाय्य असे गुण प्रगट करण्याची संधीही देतो.  
‘तो’च ‘तो’ आहे जो प्रत्येक माणसाला या पृथ्वीवर ‘त्यां’ने कोणत्या उद्देशाने पाठविले आहे यावर अशा घटनांतून विचार करायला लावतो आणि त्याच्या अंतर्यामी दडलेल्या ‘त्या’ची जाणीव करून देतो.

- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण