yuva MAharashtra सुख म्हणजे काय असते ?

सुख म्हणजे काय असते ?


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १७ जुलै २०२४
जीवनाच्या संध्याकाळीही फुलेल सुखाची पहाट
तरूण मुलां-मुलींचे आई-वडिलांशी, सुनांचे सासु, सास-यांशी पटत नाही. लहानसहान कारणांवरून घुसफुस होते. एकमेकांचा अपमान केला जातो. मनें दुखावली जातात. परिणामी वृद्ध मनातल्या मनात दुःखी होतात, कुढत कसे तरी दिवस काढतात किंवा मुलां-सुनांपासून वेगळे, स्वतंत्रपणे राहतात. या मध्यवर्ती कल्पनेवर आधारलेला ‘बागबान’ हा सिनेमा मी पाहिला व माझ्या मनात कांही प्रश्न घोळू लागले. 
 
मुलां-नातवंडापासून वेगळे राहून वृद्ध आई-वडील खरंच सुखी-आनंदी होतात कां? 
मुलां-नातवंडापासून वेगळे राहिल्याने मूळ प्रश्न सुटतो कां?

वृद्धांच्या दुःखद परिस्थितीला तरूण पिढी जबाबदार की वृद्धांचेही कांही चुकते?
दैनंदिन जीवनात वृद्धांनी कसे वागले असता सर्व कुटुंबीय एकत्र, आनंदात, परस्पर संबंध न बिघडवता, सुखा-समाधानात राहू शकतील? 
वाढत्या वयाप्रमाणे शहाणपण येत असावे, पण आनंद, सुख, शांती?     

दररोज सकाळचे फिरणे आटोपल्यावर चहा पिण्याच्या निमित्ताने कट्ट्यावर जमणा-या आमच्या ग्रुपमध्ये, दुस-या दिवशी सकाळी सर्वजण जमल्यावर चहा पितांना मी माझ्या मनात उठलेल्या प्रश्नांना वाचा फोडली. 
“मी हा सिनेमा पाहिला आहे. वृद्धांच्या दुःखद परिस्थितीला दुष्ट सुना व मुले यांचे वागणेच कारणीभूत असते याचे वास्तव चित्रीकरण या सिनेमामध्ये आहे. या सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे आज प्रत्येक घराघरामध्ये दुष्ट सुना व मुले वृद्धांचा मानसिक छळ कमी-जास्ती प्रमाणात करत आहेत. 

आता आमच्याच घराचे उदाहरण घ्या. सरकारी नोकरीतून निवृत झालेल्या देशमानेंनी आपली व्यथा मांडायला सुरूवात केली. 


“माझ्या मुलाचे लग्न झाले. सून घरी आली. आम्हा पती-पत्नीच्या खाण्यापिण्याच्या सवयीं, रात्री झोपण्याच्या व सकाळी उठण्याच्या वेळा, घराची स्वच्छता, निटनिटकेपणाच्या कल्पना व घरी आलेल्या सुनेच्या सवयीं, विचार, वागण्याशी मेळ खाईनात. त्यावरून सासु सुनेमध्ये कधी-कधी घुसफुस होऊ लागली. यामध्ये भर पडली ती आमच्यावर ‘बेबीसिटर’चे काम सुनेने लादल्यावर. आमची सून आम्हा पती-पत्नी उभयतांना मुलांना सांभाळण्याचे काम देऊन बाजारहाट, शाळा, बँक, महिला भिशी मंडळ अशा निमित्ताने तीन-तीन, चार-चार तास घराच्या बाहेर राहू लागली व नाही म्हटले तरी आमच्या स्वातंत्र्यावर अप्रत्यक्षपणे बंधने आली. 

सवयी, आचार-विचार यातील मतभेदातून सुरू झालेल्या कुरबुरीत, स्वातंत्र्यावर लादल्या गेलेल्या बंधनांने आगीत तेल ओतण्याचे काम केले. परिस्थितीने विस्फोटक रूप धारण करण्यात केले. साध्या-साध्या गोष्टींवरून सासु-सुनेच्या तोंडातून लाह्या फुटल्यासारखे शब्द तडातड फुटू लागले. शब्दांने शब्द वाढू लागला. या सा-याला कंटाळून एके दिवशी माझी पत्नी मला व राहत्या घराला सोडून परगांवी माझ्या मुलीकडे कायमची राहायला गेली.   

या नंतर तर माझी अवस्था खूपच बिकट झाली. पत्नी घरी नसल्यामुळे मी एकाकी पडलो. नाही म्हटले तरी माझ्या जेवणाखाण्याची आबाळ होऊ लागली. माझ्या हक्काचे, माझी काळजी घेणारे माणूस, सुनेमुळे माझ्यापासून दूरावल्याची भावना माझ्या मनात दृढ होऊ लागली. एकतर पत्नी आपल्यापासून दुरावल्याचे दुःख व जेवणाखाण्याची आबाळ. मनात नकारार्थी विचारांची दाटी होऊ लागली. स्वभाव चिडचिडा बनला. मनाविरूद्ध घडणा-या लहानसहान कारणांवरून मला राग येऊ लागला. 

माझ्या रागीट वृत्तीच्या परिणामी सुनेचा अहंकार दुखावला जाऊ लागला व तीही रागाने मला प्रत्युत्तर देऊ लागली, माझ्या मनाला लागेल असे बोलू-वागू लागली. असे झाले की मला जास्तच राग यायचा व मीही जशास तसे वागू लागलो. दररोजचे हे नित्य रडे माझी सून आपण काय केले, काय बोललो, कसे वागलो हे माझ्या मुलाला न सांगता फक्त माझे रागावणे, वागणे, बोलणे तिच्या नव-याला म्हणजे माझ्या मुलाला सांगू लागली. मग त्याचाही माझ्याबद्दल गैरसमज होऊन त्यांनेही माझ्याशी बोलणे कमी केले.

किरकोळ कारणांवरून सुरू झालेली ठसठस, आपल्याला हवे-नको पाहणारे, आपल्याशी आपुलकीचे चार शब्द बोलणारे घरी कुणी नाही, सुनेला मी घरी नको आहे. या माझ्या अंतिम विचारांप्रत पोहचली. त्यामुळे मी घराबाहेर जास्त वेळ राहू लागलो. कांहीतरी निमित्त काढून परगांवी मुलीकडे, पाहुण्यांकडे, मित्रांकडे जाऊन राहू लागलो. तिथेही जास्त दिवस राहता येत नसल्याने नाईलाजाने कांही दिवसांनी मी घरी परतत असे ते पुन्हां कांही तरी निमित्त काढून घरापासून, मूलापासून, सुनेपासून दूर जाण्यासाठी. 

आज घरी आम्ही एकमेकाशी क्वचित बोलतो. माझा मुलगा, सून माझ्याशी धडपणे बोलत नाहीत, माझी विचारपूस करत नाहीत. दिवसभर मी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतो, टी.व्ही. बघतो, झोपून टाकतो, नाहीतर पाय ओढत इकडे-तिकडे भटकत राहतो. घरातील माझे अस्तित्व फक्त जेवण व झोपणे यापुरतेच मर्यादित बनले आहे. माझी पत्नीही मुलीकडे मनामध्ये कुढत, माझ्यापासून दूर, मनाची समजूत घालत कसेतरी दिवस काढत आहे. आम्ही सर्वजण अहंकार, राग, नकारार्थी विचार, नैराश्य, गैरसमजाच्या दुष्ट जाळ्यात आमच्या नकळत गुरफटले गेलो आहोत. परिणामी आमच्या घरातील सुख, शांती, समाधान भंग पावले आहे. 

अशा या परिस्थितीत मला, माझ्या पत्नीला कशामध्येही रस वाटेनासा झाला आहे. खरं तर, जीवन नकोसे झाले आहे. माझ्या या स्थितीवर तुम्ही सर्व जण विचार करून राजाभाऊनी जे प्रश्न मघाशी उभे केले आहेत त्याची उत्तर द्या. तक्रारपेटी उघडल्यावर आलेल्या तक्रारीं बाहेर काढण्यासाठी पेटी उपडी करताच त्यातून जसा तक्रारींचा लोट ज्याप्रमाणे बाहेर पडतो त्याप्रमाणे, संधी मिळताच देशमानेनी आपले दुःख भसाभसा सांगून आपले मन मोकळे केले.


देशमानेंचे बोलणे ऐकून माझ्या मनात सहज एक विचार तरंगला. मनुष्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवा-याची जशी व जितकी गरज असते, त्याचप्रमाणे व तितकीच आपली सुख-दुःख इतरांशी वाटण्यासाठी, आपल्या अंतरंगातील बोल प्रदर्शित करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या व्यासपीठाची गरज असते, नाही कां?  
      
देशमानेंचे बोलणे संपते ना संपते तोच आमच्या ग्रुपमधील सर्वात तरूण मेंबर, केदार बोलू लागला, 

“पण सर्वच तरूण मुले-मुली आपल्या आई-वडिलांशी व सुना आपल्या सासु, सास-याशी वाईट वागतात असे नाही. उदाहरणादाखल आमच्या घरातील वातावरण पहा. माझे आई-बाबा, मी, माझी पत्नी, मुले आम्ही सर्वजण आनंदात एकत्र राहतो. मी जे कांही सांगत आहे ते खरे आहे याची खात्री; माझ्या पश्चात माझ्या आई-बाबांच्याकडे चौकशी करून घेऊ शकता.”

“केदारच्या बोलण्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. सर्वच घरांमध्ये ‘बागबान’ सिनेमासारखी परिस्थिती नाही. या बाबत मीही आमच्या घराचे उदाहरण देऊ शकतो.” केदारच्या बोलण्याला पुष्टी देत आमच्या ग्रुपमधील वयाने सर्वात वृद्ध पण मनाने सर्वात तरूण असलेले नानासाहेब आपली कथा सांगु लागले. 

“माझ्या पत्नीचे निधन होऊन आज दहाहून अधिक वर्षांचा काळ लोटला आहे. पण माझा मुलगा व सून माझी खुप काळजी घेतात. मला एकाकी, एकटे वाटू नये म्हणून त्यांच्या बरोबर प्रवासाला, फिरायला, सिनेमाला येण्यासाठी आग्रह करतात. सून एखाद्या रविवारी सकाळी साजुक तुपातला शिरा करते. बाहेर धो-धो पाऊस पडत असतांना मला आवडणा-या चटकदार कांद्याभज्याची प्लेट व गरमागरम नेसकॉफीचा फेसाळलेला पेला हळूच माझ्या पुढ्यात सरकवते. शिवाय अधुनमधुन माझ्या आवडीचे पदार्थ खायला मिळत असतातच. दररोज रात्री आम्ही सगळे; मी, मुलगा, सुन, नातवंडे हसत-खेळत एकत्र जेवण करतो. सुट्टीच्या दिवशी नातवंडे आजोबांशी हक्काने पत्ते, क्रिकेट, कॅरम, आंधळी-कोशिंबीर खेळतात. मध्येच कधीतरी एखादी टॉफी नाहीतर चॉकलेट आजोबांच्या तोंडात प्रेमाने भरवतात.   
   
याचा अर्थ असा नव्हे की आमचे मतभेद होत नाहीत, कुरबुरी होत नाहीत. पण तेवढ्यापुरतेच. खरं तर, माझी काळजी घेणारे, माझ्यावर मनापासून प्रेम करणारे, माझे ‘आपले’ कोणीतरी आहे ही भावना मला समाधान देते. त्यामुळे माझ्या मनाविरूद्ध घडणा-या किरकोळ घटनांकडे मी कानाडोळा करतो. अधेमध्ये कधीतरी मी विक्षिप्तपणाने वागलो तर माझी सून, मूलगा मला सांभाळून घेतात. 

आता तुम्ही सर्वजण मला सांगा, या वयात सुखात, समाधानात, आनंदात राहण्यासाठी आपणा वृद्धांना आणखी वेगळे काय हवे असते?”  

“केदार, तुझे आई-वडिल, नानासाहेब तुम्ही भाग्यवान आहात. अहो या वयात सुखी होण्यासाठी आम्हा म्हाता-यांना आणखी वेगळे काय हवं असतं ? मुलां-मुलीं, सुनांकडुन चार आपुलकीचे शब्द, नातवंडाची माया, आपली काळजी घेणारं, आपल्या हक्काच कोणीतरी आहे ही भावना व मानसिक आधार, बस्स! या शिवाय आम्हां वृद्धांना आणखी कांहीही नको असतं. पण .....?” ग्रुप मधील आणखी एक सिनीयर मेंबर जोशी बोलते झाले.   
 
“पण आम्हाला मिळतो ना; तिरस्कार, हेटाळणी, टोमणे, कपाळ्यावर सत्राशेसाठ आठ्ठ्या आणि हे करू नका, तसे करू नकाचा अखंड डोस. मनाची नुसती घुसमट आणि विचारांची फरफट. सगळ्या चुका, सर्व दोष आपलाच आहे अशी आपणच आपल्या मनाची समजूत घालायची व आपल्या नशीबाचे भोग सहन करत, हरी-हरी म्हणत ‘त्या’ वेळेची वाट बघत कसे तरी दिवस काढायचे. दुसरे काय करायचे?” 

श्री जोशींच्या शेजारी बसलेल्या, सौ. जोशींनी आवंढा गिळला व चष्मा पुसण्याच्या निमित्ताने डोळ्यांना साडीचा पदर लावला. वातावरण एकदम गंभीर झाले. कुणीच कुणाशी बोलेनात. सारा ग्रुप कांही क्षणांसाठी स्तब्ध झाला.
ठुसठुसणा-या या शांततेची कोंडी फोडली सुमनने. 

“नानासाहेब, देशमाने, जोशी साहेब, वहिनी, चुकते कोणाचे, वृद्धांच्या दुःखावस्थेला दोषी कोण यावर चर्चा करून कांही साध्य होणार नाही. उलट गैरसमज व कटुता वाढतच जाईल. याच बरोबर मुला-सुनांपासून, नातवंडापासून वेगळे राहून आपण वृद्ध सुखी, आनंदी होऊ शकत नाही हेही निश्चित आहे. त्यामुळे मुख्य समस्या, आपणां सर्वानां आनंदात कसे राहता येईल यावर आपण विचारविनीमय केला तर तो जास्त उपयोगी होईल, नाही कां?” 

सुमनच्या प्रश्नांवर सर्वांनी होकारार्थी मान डोलावली व सुमनने आपले बोलणे पुढे चालू ठेवले.   

 “खरं तर, वृद्धांची दुःखावस्था ही कांही आजच किंवा अलिकडच्या काळात उद्भवलेली समस्या आहे; असे नाही. चारशे वर्षांपुर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहीलेल्या ‘दासबोध’ या ग्रंथामध्ये या परिस्थितीशी मिळतेजुळते वर्णन असणारे कांही श्र्लोक -१ आहेत. सांगायचा मुद्दा काय, तर ही समस्या तशी नवीन नाही तर; मागील पानावरून पुढे, एका पिढी मागून दुस-या पिढीत चालत आलेली आहे. आपल्याला आज ही समस्या जाणवत आहे, याचे कारण आपण आज जात्यात आहोत. उद्या म्हणजे आणखी कांही वर्षांनी ज्यावेळी आजची तरूण पिढी वृद्ध होईल, त्यावेळी त्यांनाही ही समस्या जाणवणार आहे. कदाचित त्या वेळी तिचे स्वरूप, आकार-विकार वेगळा असेल, पण समस्या असणार व ती जाणवणार हे निश्चित. कारण हे रहाटगाडगे आहे हे असेच फिरत राहणार.

त्यामुळे ही वस्तुस्थिती स्विकारून वृद्धांनी आपल्या जीवनाच्या संध्याकाळी सुखाची पहाट कशी फुलेल यावर विचार केला पाहिजे.” 

कांही क्षणांसाठी सुमन बोलायचे थांबला. 
सुमनच्या संतुलित विचारांचे मला नेहमी कौतुक वाटते. 

“सुमन, तूच सांग, काय केले असतां, कसे वागले असतां, आम्हा वृद्धांचे जीवन जीवन आनंदी होईल?” 

मी सुमनला विनंती केली व सर्वांनी मान डोलावून त्याला आपली सहमती दर्शविली. वृद्धावस्थेत आनंदी कसे राहता येईल यावर सुमनने मार्गदर्शन करावे या माझ्या विनंतीला सर्वांची संमती आहे हे पाहून सुमन बोलू लागला, 

“राजा; सर्वात प्रथम आपण हे समजाऊन घेतले पाहिजे की; ‘मी दुःखी आहे’ ही जर माझी समस्या असेल तर, ही माझी समस्या फक्त माझ्या एकट्याची आहे. एखादी व्यक्ति, मित्र, पुस्तक फार-फार तर मला मार्गदर्शन करू शकतील पण, माझ्या दुःखाचा भर व भार ओसरण्यासाठी, कमी होण्यासाठी मला व फक्त मलाच सतत बलपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. कोणताही देव, गुरू, बाबा, महाराज चमत्कार करून, आशीर्वाद देऊन, मला दुःखातून मुक्ती देऊ शकत नाही.   

या नंतर दुसरी महत्वाची बाब जी आपण समजाऊन घेतली पाहिजे ती म्हणजे; आपल्या जीवनामध्ये दुःख आहे म्हणूनच आपल्याला सुख म्हणजे काय हे समजते. जसे एखाद्या जन्मांध व्यक्तिला काळोख व प्रकाश यातील फरक माहित नसतो, त्याच्या लेखी हे दोन्ही सारखेच असतात, त्याप्रमाणे जीवनात दुःख नसेल, सर्वकाळ सुख आणि सुखच असेल तर; सुख म्हणजे काय हे कसे समजणार? खरं तर; सुखाचे अस्तित्व दुःखावर अवलंबून आहे. त्यामुळे सुखाबरोबर दुःखालाही स्विकारण्याची आपली मानसिक तयारी असली पाहिजे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे; ‘जनीं सर्व सूखी असा कोण आहे?’ -२ हे आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. राजा, सदा-सर्वकाळ कुणीही, मग तो वीस वर्षांचा तरूण, किंवा ऐंशी वर्षांचा वृद्ध, आईच्या गर्भातून बाहेरच्या जगात नुकतेच पदार्पण केलेले बालक किंवा नाकासमोर सुत धरलेली व्यक्ति, दिवसांतील प्रत्येक क्षणी म्हणजे २४x७, आनंदी, सुखी असणे शक्य नाही; या कटू सत्याचा आपण स्विकार केला पाहिजे. आता मी जे कांही सांगितले ते आपणा सर्वांना पटते कां?” प्रश्न विचारून कांही क्षणांसाठी सुमन बोलायचे थांबला. 

सुमनच्या बोलण्याने आम्ही सर्वच प्रभावित झालो होतो व वृद्धावस्थेतील जीवन आनंदी, सुखी, समाधानी जीवन यावर सुमनने आणखी बोलावे असा सर्वांनी सुमनला आग्रह धरला.

सुमनने परत एकवेळ बोलण्यास सुरूवात केली,

“ सुख व दुःख या भावना मानसिक आहेत त्यामुळे आपले जीवन सुखी किंवा दुःखी होण्यामागे मुख्य कारण असते आपली मानसिकता. त्यामुळे वृद्धांनी जर आपली मानसिकता नीट समजाऊन घेतली तर त्यांना आंतरिक आनंदाची व त्या अनुषंगाने मिळणा-या सुख, शांतीची जोपासना जास्त चांगल्या रितीने करता येईल. पण यासाठी गरज असते अंतर्मुख होण्याची. आपल्या दैनंदिन जीवनातील आचार-विचारांची, चांगल्या-वाईट सवयींची, सगुणांची-दुर्गुणांची त्रयस्थपणे आत्मनिरीक्षण करण्याची. ‘कर्मण्ये वाधिकारस्ते’ उपदेशाप्रमाणे अलिप्तपणे कार्यरत राहण्याची वृत्ती आणि ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय’ मधील सत्य मनोमन स्विकारण्याची. 

अंतर्मुखता व आत्मनिरीक्षणाच्या छन्नीने मनावर, अंतरंगातील विचारांवर टाकीचे घाव घातले कि, अलिप्तता व अपरिग्रह वृत्ती -३ मनामध्ये ठसली जाते आणि या वैचारिक मुशीतुन तावुन सुलाखुन तयार झालेली मानसिकता सुखी जीवनाचा पाया रचते. राजा, अलिप्तता व अपरिग्रह वृत्तीचा हा पाया एकदा का घट्ट, मजबुत झाला की आपसुकच समजुतदारपणा, परिस्थितीशी जुळते घेणे, क्षमा मागणे व करणे जमु लागते. दैनंदिन जीवनातील आपल्या आचारविचारामध्ये बदल घडून येतो व वृद्धावस्थेमध्ये जीवन सुखी, आनंदी होऊन जीवनाच्या संध्याकाळीही सुखाची पहाट फुलते.” सुमनने आपले बोलणे थांबवले.

सुमनला काय सांगायचे आहे हे मला समजले पण ते आचरणात कसे आणायचे? कळतय पण वळत नाही अशा स्थितीत विचार करत मी घरी परतलो.

- आजचे बोल अंतरंगाचे पुर्ण
संदर्भः १. दासबोध (दशक ३, समास-२),२.श्री समर्थ रामदास स्वामीकृत श्री मनाचे श्र्लोक– ११, ३. अपरिग्रह वृतीः संस्कारधन’ –डॉ. इन्दुभूषण बडे