yuva MAharashtra कृष्णेची पाणी पातळी वाढल्याने पूरबाधित क्षेत्रात नागरिकांना स्थलांतराचे आवाहन !

कृष्णेची पाणी पातळी वाढल्याने पूरबाधित क्षेत्रात नागरिकांना स्थलांतराचे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जुलै २०२४
महापालिका प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सोयी सुविधांसह सतर्क आहेत. एन.डी.आर.एफ पथक आणि महापालिका अग्निशमन दल, अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे, असे सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले आहे.


कृष्णा नदीची पाणीपातळी २६ फुटांवर पोहोचली असून सतर्क झालेल्या महापालिकेने पूरबाधित क्षेत्रातील रहिवाशांना स्थलांतराच्या तयारीत राहण्याच्या सूचना सोमवारी दिल्या. पाणीपातळी आणखी दोन फुटांनी वाढल्यास इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोडवरील शिवमंदिर परिसर, काका नगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी आदी भागात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आज बाधित क्षेत्रात जाऊन नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करत सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. तसेच महापालिकेच्यावतीने निवारा केंद्र सुरू करण्यात येत असून अत्यावश्यक व महत्वपूर्ण साहित्य घेऊन तयारीत राहण्याचे आवाहन केले आहे.