| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २७ जुलै २०२४
मिरज येथील प्रसिद्ध डॉक्टर सूर्यकांत वावळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या १७ वे भव्य रक्तदान शिबीरात पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी देहदान आणि अवयव दानाचा संकल्प जाहीर केला. या कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या माऊली फाउंडेशनमुळे देहदान आणि अवयवदानाच्या चळवळीला मोठी चालना मिळाली आहे.
शहरातील आय एम ए हॉल येथे उत्साहात संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.. सुरेश भाऊ खाडे तर अध्यक्षस्थानी डॉ. जी एस कुलकर्णी हे उपस्थित होते. यावेळी ऑर्गन अँड बॉडी डोनेशन फेडरेशनच्या जिल्हा समन्वयक डॉ. हेमा चौधरी यांनी फेडरेशनच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली तसेच अवयवदानाचे महत्त्व विषद केले. याबाबत माहिती जाणून घेऊन, डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी तात्काळ देहदान आणि अवयव दानाचा फॉर्म भरून दिला, आणि ही चळवळ वाढीस लागण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी डॉ. परमशेट्टी, डॉ. स्वप्निल नाडे, अश्विनी सातपुते, यांनीही देहदान आणि अभिवादानाचे फॉर्म भरले.
यावेळी दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सहकार्य केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांना माऊली धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. राजीव गांधी आणि डॉ. निकीत मेहता यांना धन्वंतरी पुरस्कार तर माऊली कलारत्न पुरस्कार शास्त्रीय संगीत तज्ञ पंडित ऋषिकेश बोडस यांना प्रदान करण्यात आला. तसेच माऊली प्रेरणा पुरस्कार जेनेरिकार्टचे डायरेक्टर श्रीपाद कोल्हटकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
गेली सतरा वर्षे सातत्याने माऊली फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते
सुरुवातीस श्रद्धा व्हावळ मुळे यांनी गणेश वंदना सादर केली. प्रस्तावना डॉ. ऋषिकेश व्हावळ यांनी केले तर आभार अरुण मालगावे यांनी मानले. सांगता डॉ. चिदानंद चिवटे यांच्या पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज पल्से यांनी केले.