Sangli Samachar

The Janshakti News

जात-पात, भाषा, सगळे भेद बाजूला ठेवण्यातील आयुष्याची खरी गंमत आटपाडीत सापडली - मा. राम नाईक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ जुलै २०२४
वडिलांनी आणि संघाने सामाजिक समसरतेचे संस्कार दिले. जात-पात, भाषा, सगळे भेद बाजूला ठेवण्यातच आयुष्याची खरी गंमत आटपाडीत सापडली. माझी जडणघडण आटपाडीत झाली. पद्म भूषण मिळाले त्यामागच्या योगदानासाठी मी आटपाडीकरांचा कृतज्ञ आहे, असा ऋणनिर्देश माजी मंत्री, माजी राज्यपाल, भाजपाचे वरिष्ठ नेते राम नाईक यांनी आपल्या सत्कार प्रित्यर्थ आपल्या भाषणात व्यक्त केला.

आटपाडी येथे पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात राम नाईक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, निमंत्रक माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राम नाईक पुढे म्हणाले की, ज्या मातीत मी वाढलो, त्या आटपाडीने मला आयुष्यभरासाठी शिक्षण व संस्काराची शिदोरी बांधून दिली. पद्म भूषण पुरस्कारापर्यंतचा माझा मार्ग प्रशस्त केला आणि आज तीच आटपाडी माझा सत्कार करते आहे. मी शब्दातून आटपाडीचे ऋण कसे व्यक्त करू? मी आपल्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि हृदय सत्काराबद्दल नेहमीच कृतज्ञ राहीन अशी भावना भाजपचे जेष्ठ नेते माजी राज्यपाल पद्म भूषण राम नाईक यांनी व्यक्त केली.

सन्मान कार्यक्रमाचे निमंत्रक, उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, राम नाईक यांचा बहुमान हा आमचा देखील बहुमान आहे. राम नाईक यांनी शेवटच्या घटकाचा विचार केला. वकील, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल पदापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे मार्गदर्शन कायम रहावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना राम नाईक पुढे म्हणाले की, शालेय जीवनात सूर्यनमस्कार घालून जी काटकता आली, आरोग्य संपदा मिळाली ती नव्वदीतही साथ देत आहे. नारायणराव देशपांडे, देशमुखांसारखे स्वयंसेवक बंधू आणि शंकरराव खरात यांचा आशीर्वाद आटपाडीमुळे मिळाला. 

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना, माजी खासदार संजय पाटील म्हणाले राम नाईक यांच्या वडिलांचा म्हणजे नाईक मास्तरांचा वसा आटपाडी एज्युकेशन सोसायटी जपत आहे. साहित्यिक भूमीतील राम नाईक हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. समाजाची रीत बदलत असताना राम नाईक आज देखील सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

अध्यक्षीय भाषणात निशिकांत पाटील म्हणाले की, सन्मानाची भूक ही माणदेशाची खुबी आहे. निरपेक्ष भावनेने काम केल्याने उत्स्फूर्त उपस्थिती आहे. पद्म भूषण पुरस्काराची उंची राम नाईक यांच्यामुळे वाढली आहे. माणुसकी असलेला माणूस म्हणजे माणदेशी माणूस आहे. 

चारित्र्य आणि चरित्र जपणाऱ्या राम नाईक या व्यक्तिमत्वाचा जनसंघ ते भाजप हा निष्कलंक प्रवास आहे. गदिमा, व्यंकटेश तात्या, शंकरराव खरात आणि राम नाईक ही सर्व रत्ने आटपाडीची आहेत. त्यामुळे मला आटपाडीचा हेवा वाटतो.

डॉ. रविंद्र खरात, राजाराम गरुड, सुधीर चापोरकर, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी राम नाईक यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा दिल्या. यावेळी ब्रम्हानंद पडळकर, हर्षवर्धन देशमुख, बंडोपंत देशमुख, अप्पासाहेब काळेबाग, आनंदराव पाटील, प्रदीप देशपांडे, अनिल पाटील, शेखर इनामदार, हरिभाऊ माने, डी.एम.पाटील, विलास काळेबाग, राजेंद्र खरात व मान्यवरांसह उपस्थित होते.