| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरु दि. १२ जुलै २०२४
“ग्लुकोमा हा मुंगीच्या पावलांनी येणारा पण नंतर अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करणारा एक भयंकर आजार आहे. या आजारामुळे माणसाला कायमचे अंधत्व येऊ शकते.”
नेत्रतज्ज्ञ डॉक्टर गोविंद; माझ्या डोळ्यांच्या तपासणीचे रिपोर्ट वाचून मला सांगत होते. त्यांच्या बोलण्याच्या रोख न समजल्याने मी त्यांना विचारले,
“डॉक्टरसाहेब, मला हा आजार झाला आहे का ? याच्या परिणामी मी आंधळा होईन का ? स्पष्ट सांगा. कांहीही ऐकण्याची माझी मानसिक तयारी आहे.”
“राजाभाऊ, तुमचे नशीब चांगले आहे. अजूनतरी तुम्हाला या रोगाची प्रत्यक्ष लागण झालेली नाही. पण तुमच्या डोळ्यांतील कांही शिरा कमजोर वाटतात. त्यामुळे डोळ्यांत घालण्यासाठी मी औषध लिहून देतो. ते दररोज न चुकता डोळ्यांत घालायचे आणि दर तीन-चार महिन्यांनी डोळे तपासून घ्यायचे. वेळीच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आणि महत्वाचे आहे.” डॉक्टर गोविंद म्हणाले.
मी मनातून खुप नाराज झालो. डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध हॉस्पिटलमधील औषधाच्या दुकानांतून मी विकत घेतले आणि बाहेर आलो. विचारांच्या हजारो इंगळ्या माझ्या मनाला डसू लागल्याः आता उर्वरित आयुष्यभर हा दवाखाना आपल्यामागे लागला. कांही काळाने आपण आंधळे होणार. विचाराने मला कांही सुचेना. मनावर हजारो मणामणांचे दडपण घेऊन विचारांच्या कोलाहलात कसाबसा मी घरी पोहचलो.
“राजा, घाबरलास ? आंधळेपणामुळे मार्गात येणारे खाच-खळगे, खड्डे, अडथळे तुला दिसणार नाहीत, त्यात पडून, त्यांना थडकून तुझे नुकसान होईल, अपघात होतील, तू पूर्णपणे परावलंबी होशील याचे भय वाटत आहे ना तूला ?” माझ्या मनातील ‘त्या’ कोपऱ्याने हळुवारपणे मला आवाज दिला. मी होकारार्थी मान हालवली व हताशपणे म्हणालो,
“संपले रे माझे जीवन. या आंधळेपणामुळे मला आता कांहीही करता येणार नाही. आता दररोज जीवंतपणी मरण भोगायचे फक्त.”
नैराश्याने भरलेले माझे बोलणे ऐकून माझ्या मनातील ‘तो’ कोपरा म्हणाला,
“राजा; अंधत्वाच्या नुसत्या कल्पनेने जर तू इतका घाबरलास; हताश झालास, तर उद्या खरोखरच अंधत्व आले तर काय करशील ? पण काय रे; या साऱ्या जगामध्ये असा प्रसंग आलेला एकटा तूच आहेस कां ? नेहमी लक्षात ठेव. ‘अंधत्व दुःखदायक नाही तर ते सहन करता येत नाही हे दुःखदायक आहे.’ जीवनामध्ये पुढच्या क्षणी काय घडणार हे ना कोणीच जाणू शकत, ना कोणी ठरवू शकत. त्यामुळे जे जे घडते ते आपण मान्य करावे, स्विकारावे व परमेश्वराच्या शक्तिवर विश्वास ठेऊन त्याला धैर्याने तोंड द्यावे. आपल्या एका अभंगात संत तुकाराम महाराज सांगतात,
'आलिया भोगासी असावे सादर | देवावरी भर घालूनिया ।।१।।
तोचि कृपासिंधू निवारी साकडे | येर ते बापुडे काय रंक ।।२।।
भवाचिये पोटी दु:खाचिया राशी | शरण देवासी जाता भले ।।३।।
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता | चिंतावा तो आता विश्वंभर ।।४।।'
“बाबा रे, मी आधीच त्रासलो आहे. त्यात तुझ्या तत्वज्ञानाची भर घालू नकोस. मला एकट्याला सोड आणि जसा आलास तसा निघून जा बरं.”
गळ्यात दाटून आलेला हुंदका आवरत मनातील ‘त्या’ कोप-याला मी विनवले.
“ठिक आहे राजा, मी जातो. पण जातांना एवढेच सांगतो की, शारीरिक अंधत्व, अपंगत्व एक वेळ परवडले, त्यावर मात करून जीवन जगता येते. पण; वैचारिक अंधत्व, अपंगत्व, माणसाला जीवंतपणे मरण भोगायला लावते हे लक्षात घे आणि जीवनातील संकटांना धैर्याने सामोरे जात जीवनाची वाटचाल कर”
एवढे बोलून माझ्या मनातील ‘तो’ कोपरा अंतर्धान पावला. मनातील ‘त्या’ कोप-याचे समजावणे मला पटत होते. पण दररोज रात्री डोळ्यांमध्ये औषध घालतांना मनात खोलवर रुतलेले भय उफाळून परत-परत वर येत राहिले. मनामध्ये भयाचा सल बाळगत पाच-सहा वर्षांचा काळ लोटला.
एक दिवस रस्ता पार करण्यासाठी मी झेब्रा क्रॉसींगवर उभा होतो.
“रस्ता पार करायला कोणी मला मदत करेल का?”
माझ्या कानांवर शब्द पडले. आवाजाच्या दिशेने मी पाहिले. माझ्या बाजूला एक मध्यमवयीन व्यक्ति उभी होती. तिच्या हातातील पांढरी छडी व डोळ्यावरील काळ्या रंगाच्या चष्म्यावरून ती व्यक्ति अंध असल्याचे मी ओळखले. माझ्या मनातील सल भस्सकन उसळून वर आली.
‘राजा, कांही काळानंतर तुझी अवस्थाही अशीच होणार’ असे सांगून मनाचा 'तो' कोपरा मला भिववू लागला. जीवन संपल्याची एक थंडगार लाट मला पुतळ्यासारखी स्तब्ध बनवून राहिली.
“रस्ता पार करायला कोणी मला मदत करेल कां?”
परत एक वेळ त्या अंध व्यक्तिचे शब्द माझ्या कानांवर पडले आणि मी भानावर आलो.
“या माझ्या बरोबर”
स्वतःला सावरत मी म्हणालो व त्या अंध व्यक्तिचा हात हातात घेऊन आम्ही दोघांनी रस्ता पार केला. रस्ता पार केल्यावर मी त्या अंध व्यक्तिला विचारले,
“तुम्हाला कुठे जायचे आहे? मी सोडू कां तुम्हाला तिथे?”
“तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद, पण मी एकटा जाऊ शकेन. इथून फक्त १५३ पावलांवर तर आमची शाळा आहे.”
ती व्यक्ति म्हणाली व माझा हात सोडून आपला मार्ग आक्रमू लागली. इतरांची मदत न घेता १५३ पाऊले मोजत स्वतः एकटे जाण्याचा त्या अंध व्यक्तिचा निर्धार व आमची शाळा या शब्दांनी या व्यक्तिने आपले अंधत्व स्विकारले आहे. अंधत्वावर पूर्णपणे मात जरी करता आली नाही तरी आत्मविश्वासाने स्व-जीवन जगत आहे, हे मला समजले. माझ्या मनात आशेची पालवी फुलली. मी त्या व्यक्तिला म्हणालो,
“खरं तर, मला तुमच्याशी बोलायचे आहे. कांही विचारायचे आहे. मी सोबत येऊ कां तुमच्या?”
माझ्या बोलणे ऐकून ती अंध व्यक्ति म्हणाली,
“स्पष्ट बोलतो. माफ करा. कशासाठी तुम्हाला माझी सोबत करायची आहे ? काय विचारायचे आहे तुम्हाला?”
माझ्या मनातील भय मी त्या व्यक्तिला सांगितले व म्हणालो,
“तुमच्या वागण्या, बोलण्यातील आत्मविश्वासाने खरं तर मी भारला गेलो आहे. तुमच्या ‘१५३ पावल, आमची शाळा’ या शब्दांनी माझे कुतहूल वाढले आहे. तुमच्याशी केलेली चर्चा माझ्या मनातील भय कमी करायला निश्चित उपयोगी होईल असे मला वाटते. तेव्हां माझ्या मनातील भय कमी होण्यासाठी मला मदत कराल कां?”
माझ्या बोलण्यातील याचनेचा भाव त्या अंध व्यक्तिने जाणला व माझ्या विनंतीला होकार देत सांगितले, “मला कांही विचारण्या व मी कांही सांगण्यापेक्षा तुम्ही माझ्या सोबत आमच्या शाळेत चला. तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून तुमचे भय कमी होण्यास निश्चित मदत होईल.”
त्या व्यक्तिसोबत मी अंधासाठी चालवलेल्या शाळेत पोहचलो. शाळेमध्ये सर्व वयाचे विद्यार्थी होते. शाळेच्या मैदानामध्ये कांही मुले क्रिकेट खेळत होती. अन्य सर्व शाळांमध्ये असतात तसे वर्ग चालू होते. वर्गात नेहमीचा अभ्यासक्रम शिकवला जात होता. कांही खोल्यांमध्ये कॉम्युटर व तर कांहीमध्ये कोणतीतरी मशीन्स चालविण्याचे प्रशिक्षणवर्ग सुरू होते. इतर शाळांमध्ये व या शाळेत फारसा वेगळेपणा मला जाणवला नाही.
माझ्या मनातील सल, सारे प्रश्न गळून पडले आणि माझ्या मनातील ‘तो’ कोपरा उद्भवला,
“राजा, आता तरी पटले? शारीरिक अपंगत्वावर मात करून जगता येते. पण गरज असते ती त्याला धैर्याने सामोरी जाण्याची. नेहमी लक्षात ठेव, जीवनातील संकटांना, अडचणींना धैर्याने सामोरी जाण्यातच सुटकेचा मार्ग दडलेला असतो. शारीरिक अपंगत्व औषधोपचार, यंत्राच्या सहाय्याने कांही प्रमाणात कमी होऊ शकेल पण मानसिक खच्चीकरणाने येणारे अपंगत्व ....... व्यर्थ चिंता करण्याने कांहीही साध्य तर होत नाहीच; उलट नुकसान होते.
राजा, सत्य जाण, समजून घे. परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा आपल्या मनातील विचारांची दिशा बदल आणि ख-या अर्थाने जग.”
मनातील ‘तो’ कोपरा अंतर्धान पावला.
मला; एका डोळसाला ‘जीवन-प्रकाश’ दाखविल्याबद्दल त्या अंध व्यक्तीचे मी आभार मानले व शाळेतून बाहेर आलो.
घरी परततांना, आपल्यावर यापुढे कोणत्याही आपत्ती आल्या; तरी त्यांना धैर्याने तोंड देत जीवन जगण्याच्या एका नव्या हुरुपाचा अंकुर माझ्या मनामध्ये रूजला व त्या ओघात मला एक कविता सुचली.
जीवन आहे जगण्यासाठी, नाही रडत, कुढण्यासाठी,
नको समजू अपंग स्वतःला, नकोस लेखु कमी,
स्वामी तू तुझ्या जगाचा, नाही कशाची कमी,
मिळता जन्म हा मानवाचा, हवा आधार अन्य कशाचा,
उघड पंख विचारांचे अन् घे कवेत आकाश,
जीवन आहे जगण्यासाठी, जाण हा जीवन-प्रकाश।।
- आजचे बोल-अंतरंगाचे पूर्ण
संदर्भ १. जॉन मिल्टन वचन