Sangli Samachar

The Janshakti News

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या इशाऱ्याने राजकीय क्षेत्रात खळबळ !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जुलै २०२४
मराठा आरक्षणात आक्रमक झालेल्या आंदोलनात महत्त्वाचा घटक असलेल्या मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकादशीची पूजा घरातूनच करावी असा इशारा दिला आहे. भर सभेत एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. परंतु त्यांनी हा शब्द फिरवल्याने विठ्ठलाच्या पूजेला येण्याचा नैतिक अधिकार एकनाथ शिंदे यांनी गमावला असल्याचे सांगत, शासकीय पूजेसाठी पंढरपुरात न येण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा तर्फे करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्राकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिंदे यांनी भरसभेत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार सवलती दिल्या जातील, तसेच मराठा आरक्षणातील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना नोकऱ्या दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. मात्र सहा महिने झाले तरी यातील एकही आश्वासन मुख्यमंत्री शिंदे पूर्ण करू शकले नाहीत.

मुख्यमंत्र्यांना आपल्या दिलेल्या शब्दावर जरा जरी विश्वास असेल तर त्यांनी पंढरपुरात शासकीय पूजेस येण्याचे टाळावे, असे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी म्हटले आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकावर सतीश काळे, वैभव जाधव, रावसाहेब गंगाधरे,नकुल भोईर,गणेश दहिभाते, अभिषेक म्हसे, संतोष शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या इशारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासन आणि एकनाथ शिंदे याबाबत काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.