| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ जुलै २०२४
माधवनगर रस्त्यावरील चिंतामणी नगर उड्डाणपुलाचे काम ३१ जुलै पूर्वी पूर्ण करा. त्या रखडलेल्या कामामुळे पुलाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या नागरिकांसह सांगलीत येणाऱ्या जिल्ह्यातील उत्तरेकडील व्यापारी व जनतेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा रेल्वे उड्डाणपूल पूर्ण होऊन सुरू झाल्याशिवाय वसगडे, पंचशील नगर व कृपामयी समोरील उड्डाण पुलाचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा माधवनगर व्यापारी संघाचे नेते प्रदीप बोथरा, हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष नितीनराजे शिंदे यांनी दिला होता.
परंतु सांगली महानगरपालिकेची परवानगी नसताना पंचशीलनगर येथील पुलाच्या ठेकेदाराने काम सुरू केले आहे. त्यामुळे माधवनगर व्यापाऱ्यांचे नेते प्रदीप बाफना, माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजप नेते पै. पृथ्वीराज पवार, माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी या कामाच्या ठेकेदाराला, परिस्थितीची जाणीव करून देत उड्डाण पुलाचे सुरू केलेले बांधकाम थांबवण्याचे विनंती केली.
यावेळी बोलताना माजी आमदार नितीनराजे शिंदे म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे चिंतामणी नगर येथील मालमत्ताधारक कोर्टामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे तो विषय आधी संपवा, मगच नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात करा. पंचशील नगर उड्डाणपूल चिंतामणी नगर उड्डाणपुलासारखा रखडता कामा नये, त्यामुळे प्रवासी व या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत.
भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पै. पृथ्वीराज पवार म्हणाले की चिंतामणी नगर येथील पुलाचे रखडलेले काम आधी पूर्ण करा पंचशील नगर येथील पुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
माजी नगरसेविका ॲड. स्वातीताई शिंदे म्हणाल्या की, महानगरपालिकेने परवानगी दिली नसताना कामाची सुरुवात कशी केली ? असा सवाल करून स्वाती त्या म्हणाल्या की, येथील महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची व ड्रेनेजची पाईपलाईन तसेच इलेक्ट्रिक पोल प्रथम शिफ्ट करून घ्या. या मार्गावरील महानगरपालिकेच्या सेवावाहिन्यांचे निश्चितीकरण करून वाहिन्या स्थलांतरित करणे बाबत निर्णय झाल्यानंतरच उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करावे त्यासाठी प्रथम महानगरपालिकेचे आवश्यक ती परवानगी घ्यावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
यानंतर ठेकेदाराने काम बंद करून रस्ता खुला केला. यावेळी श्रीनिवास बजाज, अशोक गोसावी, प्रकाश निकम, आयुब पटेल, गजानन मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, रवि वादवणे, किरण गोसावी, सचिन देसाई, निलेश हिंगमिरे, भूषण गुरव, जयदीप शेंडगे यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान या मार्गावर वृक्षतोडीसाठी मंगळवारी सकाळी पंचशील नगर येथून घनःश्याम नगर मार्गे पुन्हा रेल्वे गेट पर्यंत अशी बोळाबोळातून वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहनधारकांना वाहन कोंडीमुळे मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.