Sangli Samachar

The Janshakti News

शोधू कुठे रे तुला ? (✒️राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ७ जुलै २०२४
सकाळी देवपुजा व पोथीवाचनाचा नित्य परिपाठ झाला आणि सहजच एक विचार माझ्या मनामध्ये डोकावला. या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक माझ्यासारखे, ‘परमेश्र्वर आहे!’ अशी श्रद्धा बाळगणारे, पुजापाठ करणारे, मंदिर, मस्जीद, चर्च अशा प्रार्थनास्थळी जाणारे, घराच्या बाहेर पडतांना देवाच्या फोटोला नमस्कार करणारे, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या बसण्याच्या ठिकाणी देवाचे फोटो टेबलवरील काचेच्याखाली मांडून काम करतांना त्यांना वारंवार नमस्कार करणारे... तर दुसरे ‘परमेश्र्वर नाही!’ असे मानणारे अश्रद्ध लोक. 

मी असा विचार करत असतांनाच माझ्या मनातील ‘तो’ नेहमीचा कोपरा कुठुनतरी उद्भवला व म्हणाला, 

“नाही राजा, या जगात परमेश्वराविषयी मत असणारे दोन नाही तर, चार प्रकारचे लोक आहेत. एक परमेश्वराचे अस्तित्व पूर्णपणे नाकारणारे, स्टिफन हॉकींग, मार्क झुकेरबर्ग, बर्ट्रान्ड रसेल, ज्योति बसु, वर्गीज कुरीयन, बाबा आमटे, यांच्यासारख्या प्रसिद्ध चांगल्या व्यक्ति ज्यांची संख्या खुप कमी आहे. दुस-या गटामध्ये परमेश्र्वरावर आहे, तोच कर्ता-करविता आहे यावर पूर्ण विश्र्वास असणारे लोक, यामध्ये सर्व संत मंडळी, श्री रामकृष्ण परमहंस, श्री परमहंस योगानंद सारखे भक्त, योगी असे महान लोक आहेत. या दुस-या गटातील व्यक्तिंची संख्याही अत्यंत कमी आहे. 


ईश्वर या संकल्पनेविषयी थोडे वेगळे मत असलेल्या लोकांचा आणखी एक गट आहे ज्यांना अज्ञेयवादी असे संबोधतात. हे लोक ईश्वर म्हणजे काय याचे ज्ञान आपल्याला नाही असे मानतात. पण, या सृष्टीचे चलनवलन पाहणारी कोणती तरी एक शक्ति आहे यावर त्यांचा विश्वास असतो. गंमत म्हणजे असा विचार असणा-या लोकांची संख्याही अत्यल्पच आहे. आता राहिले चौथ्या गटातील लोक. हे लोक कोणते हे समजण्यासाठी मी केलेल्या एका कवितेतील पहिल्या कांही ओळी सांगतो ऐक...

एके दिवशी देव होता मोठ्या चिंतेत. 
कसे करावे, काय करावे नव्हते त्याला समजत
प्रश्न होता कांही मर्त्य माणसांच्या वर्तुणुकीचा
आहे जे जगती ते सर्व मागण्याच्या हव्यासाचा
दाखवली कधी लाच जपाची अन् कधी नवसाची
सारा व्यवहार, सारा व्यापार, धन्य मानवांची !"

कवितेच्या पहिल्या कांही ओळी सांगून माझ्या मनातील ‘तो’ कोपरा मला म्हणाला, 

“राजा, तर हे आहेत परमेश्वर या संकल्पनेविषयी मत असणारे चौथ्या प्रकारचे लोक येतात. ज्यांना परमेश्वर हवा असतो, आठवत असतो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. महत्वाचे म्हणजे अशा लोकांची संख्या पहिल्या तीन गटांतील लोकांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. पटत नाही ना माझे मत. ठिक आहे. शितावरून भाताची परीक्षा घेऊया. आजवरच्या तुझ्या जीवनाचे तू प्रामाणिकपणे निरीक्षण कर व ठरव तू कोणत्या गटामध्ये मोडतोस?” 


मी विचार करू लागलो आणि मला कळून चुकले, परमेश्वर मला हवा आहे तो फक्त माझ्या इच्छांच्या पूर्तीसाठीच. शाळा कॉलेजमध्ये असतांना मला देवाची आठवण यायची दुस-या दिवशी गणिताचा पेपर असला की. किंवा, परिक्षेत चांगले मार्क्स मिळावेत आणि वर्गामध्ये पहिला नंबर असावा यासाठी. नंतरच्या आयुष्यात मला परमेश्वर हवा असतो तो मला चांगली नोकरी दे, नोकरीत बढती दे, माझ्या व्यवसायाची भरभराट होऊं दे, माझ्या घरी सुख, शांती, सुबत्ता असुदे अशा मागण्यांच्या पुर्ततेसाठी. 

बरं, परमेश्वराकडे मागणी करत असताना माझे शब्द कोणतेही असोत त्यांचे मूळ रूप देवाला ती आज्ञाच असायची व सवयीच्या परिणामापोटी यांत्रिकपणे करत असलेल्या पोथीवाचन, देवपुजेमागे आपल्याला कांही अडचण, त्रास, दुःख नसावे हा सुप्त हेतुच मनामध्ये असायचा. आणि, ‘देवा मला मुलगा होऊं दे, तुला सोन्याचे टोपडे वाहतो’ या सारखे माझे नवस, संकल्प म्हणजे तर स्वार्थाने लडबडलेल्या इच्छापूर्तीसाठी देवाला दाखवलेले आमिष व लालुच. 

शितावरून भाताची परीक्षा झाली आणि माझ्या मनांतील ‘तो’ कोपरा परत आला व म्हणाला,

“राजा, झाले आत्मपरीक्षण. आता तूच ठरव परमेश्वराची अशा प्रकारे भक्ति (?) करणा-या चौथ्या गटातील लोकांची संख्या किती असेल ते. आणि बरं कां राजा, अशा लोकांच्या संख्येचा परिणाम काय झाला माहीती आहे?” नकारार्थी हाललेली माझी मान पाहून माझ्या मनातील कोप-याने कवितेच्या पुढील ओळी मला ऐकवल्याः 

पाहून माणसाच्या स्वार्थाचा तमाशा विटले मन देवाचे
देऊळ, मस्जीद, चर्च सोडले, ठरवले इथे नाही फिरकायचे
धूम ठोकली त्यांने डोंगरात, दऱ्या आणि जंगलात
जाऊन आत दडुन बसला खोल खोल सागरात
शोधून काढले तिथे ही त्याला, माणूस पिच्छा सोडेना
आता कुठे लपावे, कसे लपावे हे देवालाही समजेना”

माझ्या मनातील कोप-याच्या बोलाने मला कांही सुचेना. परमेश्वरावरील माझ्या बेगड्या ढोंगी भक्तिची मला लाज वाटू लागली आणि माझ्या मनातील ‘तो’ कोपरा मला म्हणाला, 

“ राजा, आता या कवितेच्या शेवटच्या ओळी ऐक...

मग देवाला सुचली एक युक्ती,
बसला तो लपून अशा ठिकाणी
मानव शोधू लागला त्याला
पोथ्यापुराणी, काष्ठी, अन् पाषाणी
अन् तो मात्र आहे बसला
मानवाच्या अंतरी दडुनी

म्हणून वेड्या राजा, नकोस शोधू अनंताला
काष्ठी, पाषाणी, मंदिर, पोथ्यामध्ये,
हृदयी आहे तो वसला शोध घे त्याचा तिथे”

माझ्या मनातील ‘तो’ कोपरा आपल्या जागी परतला आणि मी ‘त्याचा’ शोध कसा घ्यावा या विचारात पडलो. 
- आजचे बोल-अंतरंगाचे पूर्ण