Sangli Samachar

The Janshakti News

इतिहासाच्या खुणा अंगाखांद्यावर झेलत उभा असलेला विलासगड अर्थात अर्जुनगड !


| सांगली समाचार वृत्त |
वाळवा - दि. २३ जुलै २०२४
हिंदू मुस्लीम भाविकांची गर्दी खेचणारा पण पर्यटन स्थळ म्हणून विकासाच्या प्रतीक्षेत असलेला वाळवा तालुक्यातील मल्लिकार्जुन उर्फ विलासगड इतिहासाच्या खुणा अंगाखांद्यावर झेलत उभा आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा गड हिंदू मुस्लीम भाविकांच्या गर्दीने फुलून येतो.

सह्याद्रीच्या पर्वत रांगातील डोंगर रांगेवर येडेनिपाणी गावाजवळ मल्लिकार्जुन (विलासगड) आहे. विलास गड हा गिरिदुर्ग समुद्र सपाटी पासून २६८० फूट उंचीवर आहे. ट्रेकिंग, रमणीय परिसर आणि धार्मिक. इतिहास ही या गडाची वैशिष्ट्ये होत. हे ' क ' वर्ग पर्यटन स्थळ आहे. पूर्वी हा किल्ला आदिलशहाकडे असावा. १७१७ - १८ या वर्षी मोगलांनी शाहूंना दिलेल्या सुमे व किल्ल्यांच्या यादीत विलासगडचे नाव आहे. १७९८ ला गड पुनर्बांधणीचा प्रयत्न झाल्याची नोंद आहे. अफजल खान वधानंतर १६७० -७१ च्या दरम्यान हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला असावा. प्रामुख्याने या गडाचा वापर टेहळणी साठी होत असावा सध्या हा डोंगर व गड वन खात्याच्या ताब्यात आहे. 

येडेनिपाणी गावाच्या पूर्वेला तीन कि.मी. अंतरावर पायथ्या जवळून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारपणे २५ मिनिटांनी आपण मल्लिकार्जुन मंदिर परिसरात पोहचतो. अगस्ती ऋषींनी या देवस्थानची स्थापना केली असे म्हणतात. मंदिर खडकात खोदलेले आहे. उमाशंकर, भीमाशंकर, मानकरी कट्टा, सासुरवाशीण मूर्ती, कोरीव खांब, स्वयंभू सोमनाथ, नागशिल्प, कोरीव दरवाजे, दीप माळेवरील हत्ती, तिरका नंदी या परिसरात आहे. तुळशीवृंदावन, हेमाडपंथी मंडप, गंगा टाके हे पाण्याचे ठिकाण मंदिर व आवराचे सौंदर्य खुलवतात. 


मंदिराच्या पाठीमागून वर गेले की वरच्या पठारावर बाले किल्ला आहे. इथे दरवाजाचे अवशेष आहेत. झेंडा काठी, वाड्याचे अवशेष, तट बांधकामे अवशेष आहेत. भुयारी कोठारे आहेत. पाण्यासाठी खोदलेला तलाव आहे. श्रीकृष्ण मंदिर, विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. अनेक यादव कालीन गुहा आहेत. घोडे तळाची जागा आहे. काझा कबीर चांदसाहेब दर्गा परिसरात मुस्लीम भाविकांची गर्दी असते. अनेक पाण्याचे टाके आहेत. विलासगड हा अनेक पौराणिक कथा व इतिहासाचा संगम आहे. 

मंदिर परिसरात नगारखाना आहे. वरच्या बाले किल्ला पठारावरील दर्ग्याला हजरत चांदबुखारी बाबा दर्गा असे नाव असून या परिसराला स्थानिक पातळीवर बावरदीन म्हणतात. आजही वरच्या पठारावरून परिसरातील रमणीय निसर्ग, कृष्णा, वारणा या नद्या, पन्हाळा, किल्ले मच्छिंद्रगड, आगाशिवचा परिसर दिसतो. कातळाच्या पोटातील गुहेत मल्लिकार्जुन मंदिर हे भाविकांसाठी आकर्षण स्थळ आहे. श्रावण महिन्यातील दर सोमवारी जत्रेमूळे डोंगर माणसांच्या गर्दीने फुलून येतो.

येडेनिपाणी कडून पायऱ्यांचा रस्ता तर गोटखिंडी, मालेवाडी, इटकरे, येलुर, तांदूळवाडीकडून डोंगरावर येण्यासाठी पायवाटा आहेत. वनखात्याने वृक्ष लागवड करून चांगले संगोपन केले आहे. अनेक ओढे व नाल्यावर साकव बांधण्याचे काम सुरू आहे. येडेनिपाणी, गोटखिंडी गावातील अनेकांनी वृक्षारोपणात लोकसहभाग नोंदवला आहे. डोंगर माथ्यापर्यंत विद्युतीकरण झाले आहे. 'ब' वर्ग पर्यटन स्थळ व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. 

पूर्वीचा हा टेहळणी गड आज रमणीय परिसराचे दर्शन घडवतो. गोटखिंडी गावाकडून वर येताना शिवाजीचे कोडे नावाचे कातळ शिल्प आहे. प्रत्येक पायवाटेवर मूर्ती, मंदिर, यांच्या सुरस कथा आहेत. श्रावण सोमवार प्रमाणे कायमस्वरुपी हे पर्यटन स्थळ व्हावे यासाठी विलासगडच्या उश्या, पायथ्याला असणाऱ्या येडे निपाणी, गोटखिंडी, मालेवाडी, इटकरे, येलुर, तांदुळवाडी, बहादुरवाडी या गावांनी सामूहिक कृती कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. मल्लिकार्जुन उर्फ विलासगड हे समृध्द पर्यटन स्थळ होण्यासाठी पुढील बाबीकरता येतील.

📍सर्व गावांपासून डोंगर माथ्यावर येण्यासाठी डांबरी रस्ता करणे. 
पठारांवरील मैदान खेळांसाठी विकसित करणे.
📍वृक्ष लागवड व संगोपनावर भर देणे.
पठारांवर निवासाची सोय करणे.
देवराष्ट्रेच्या धर्तीवर पशू - पक्ष्यांसाठी अभयारण्य उभारणे.

📍शासकीय स्तरावर कामे कशीही असोत सध्या भाविक व ट्रेकिंग करणारे तरुण यांच्या मनातलं पर्यटन स्थळ म्हणून आमचा विलासगड आधीच मान्यता प्राप्त बनला आहे. हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक बनलेल्या या विलासगडला आवश्य भेट द्या.

प्रा. डॉ. संजय थोरात,
 इस्लामपूर.