| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जुलै २०२४
पुणे येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक दिवसीय बैठक काल संपन्न झाली. ही बैठक गाजली ती दोन कारणांनी... पहिले म्हणजे याचे सुरुवात होणार होती ते केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत... पण ते उपस्थित न झाल्याने त्यांच्या विनाच बैठकीची सुरुवात झाली... आणि दुसरे कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणामुळे ही बैठक गाजली...
नरेंद्र भाईंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील टिकेने तर शेवटही केला याच दोन्ही नेत्यांच्यावर केलेल्या आरोपाने... या सुरुवात आणि शेवटच्या मध्यंतरात अमित शहा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांचे कान टोचलेच परंतु आगामी विधानसभेत महायुतीची सत्ता का हवी आहे याचेही डोस उपस्थितांसह राज्यातील जनतेला पाजले...
आता अमित शाह यांच्या भाषणावरून सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजपला एक अनाहूत सल्ला दिला आहे. तुम्ही जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट करणार असाल, तर विधानसभेतही याचा फायदा या दोन्ही नेत्यांनाच होणार आहे... लोकसभेत याची प्रचितीही आली होती.
एका प्रसार माध्यमांशी बोलताना खा. विशाल पाटील म्हणाले की महागाई व बेरोजगारी हा देशापुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भाजपा केवळ शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावरच लक्ष केंद्रित करीत आहे. या दोन मुद्द्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारीसह मराठा आरक्षण आणि इतर अनेक मुद्दे निवडणुक प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, असे खा. विशाल पाटील यांनी म्हटले आहे. आता खा. विशाल पाटील यांचा हा अनाहूत सल्ला भाजप नेते किती मानतात, हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसून येईल...