| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ जुलै २०२४
सांगली शहर हे जसे खोक्याचे शहर म्हणून ओळखले जाते तसेच त्याचे खड्ड्यांचे शहर म्हणून हे ओळख आहे. वास्तविक अतिक्रमित खोके व खड्ड्यावरील रस्ते किंवा रस्त्यातील खड्डे हे केवळ सांगली मिरजच नव्हे तर राज्यातील अनेक शहरांची डोकेदुखी आहे. मध्यंतरी गल्लीबोळातील आणि गरज नसतानाही काही मार्गावर डांबरीकरणाचे थरावर थर चढवले गेले. परंतु यावेळी काही मुख्य मार्ग मात्र डांबरीकरणापासून दूरच राहिले परंतु यावरील खड्डे आता वाहनधारकांसाठी धोकादायक बनले आहेत.
थोड्याशा विश्रांतीनंतर पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे, त्यामुळे सांगली मिरजसह कुपवाडमध्येही सखल भागात पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे शहरातील खड्डेमय रस्त्यावरही पाण्याचे डोह साठलेले आहेत. वाहन चालकांना विशेषतः दुचाकी धारकांना पावसाच्या पाण्याने साठलेल्या या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे हे खड्डे अपघातास निमंत्रण ठरत आहेत. त्यामुळे 'लोकहितकारक आयुक्त' अशी प्रशंसा मिळवलेले शुभम गुप्ता यांनी तात्काळ शहरातील खड्डेमय रस्त्यावर पॅचवर्क करावेत आणि दुचाकी धारकांच्या जीवाशी खेळ सुरू असलेले खड्डे मुजवावेत अशी वाहनधारकातून मागणी होत आहे.