| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० जुलै २०२४
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ईडी प्रकरणावरून जोरदार लढाई जुंपली आहे. केळीची कारवाई टाळण्यासाठी फडणवीस यांनी आपल्याला प्रस्ताव दिल्याचा दावा देशमुखांनी केला होता. तसेच आपल्याकडे या संदर्भातील व्हिडिओ क्लिप असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी फडणवीस यांनी त्यांना आव्हान देत देशमुख यांनी त्यांच्याकडील क्लिप जाहीर कराव्यात माझ्याकडेही काही क्लिप्स आहेत असा इशारा दिला आहे.
आता या आव्हान प्रति आव्हानात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उडी घेतली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, दोन दिवसापासून फडणवीस 'माझ्याकडे पुरावे आहेत असे म्हणत आहेत. फडणवीस गृहमंत्री आहेत आणि जर पुरावे असतील तर ते लपवून का ठेवत आहेत ? असा खडा सवाल पटोले यांनी केला आहे.
विरोधकांना धमकवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करीत आहेत. तुरुंगातून बाहेर येताच, अनिल देशमुख यांनी आरोप केला की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कारवाई करा कारवाई केल्यानंतरच आम्ही तुम्हाला सोडतो, असा दबाव होता. हे आरोप झाले तेव्हा फडणवीस का बोलले नाहीत पण आता दबाव तंत्र निर्माण केलं जात आहे. फडणवीस मध्ये दम असेल तर त्यांनी प्रथम त्यांच्याकडील पुरावे सादर करावेत. देशमुख यांनी केलेले आरोप खरे आहेत की खोटे हे राज्यातील जनतेला समजून घेण्याचा अधिकार आहे, त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती समोर ठेवावी असे आव्हानही पटोले यांनी दिले आहे.