| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि. १९ जुलै २०२४
सध्या जग गंभीर वळणावर आहे. स्वतःचेच म्हणणे खरे करण्याच्या नादात अराजकता निर्माण होत आहे, त्यामुळे स्वतःबरोबरच इतरांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावरही विचार करणे गरजेचे आहे. असे झाले तरच समता निर्माण होऊन जग शांततेकडे जाईल यासाठी अनेकांत वाद हा विचार खूप महत्त्वाचा आहे असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
डॉ. वकील पाराज लिखित 'अनेकांत वाद (विचारांची सहिष्णुता)' या भारतीय ज्ञानपीठ दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात श्रीराम पवार बोलत होते. शिवाजी विद्यापीठ भगवान अध्यासन केंद्र यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते व साहित्यिक राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी आ. राजेंद्र पाटील यड्रावकर हे खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की जगात मी जे म्हणतो तेच खरे आहे असे सांगत इतरांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. अशा अनेक शक्ती, राजकीय लोक तयार होत आहेत. दुसऱ्या विचारसरणीला दोष देऊन अराजकता माजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे सगळेच देश संकटात सापडले आहेत. डॉ. पारस यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये सर्व तत्त्वांचा अभ्यास करून अनेकांत वाद मांडण्यात आला आहे. पुस्तक लिहिताना कुठेही टीका न करता तो विचार सुंदरपणे मांडण्यात आला आहे. संशोधन कशा पद्धतीने होऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक होय, असे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी काढले.
यावेळी बोलताना डॉ. गवस म्हणाले की आज आपण एका विशित्र वळणावर आहोत. कोण कधी काय करेल याचा नेम राहिलेला नाही. शिक्षण, आरोग्य, राजकारण आधी सर्वच क्षेत्रात गोंधळाची परिस्थिती आहे. अशा वातावरणात अत्यंत अभ्यासपूर्ण लिहिलेले हे पुस्तक येत आहे, हे कौतुकास्पद असून जगाला मार्ग दाखवणारे हे पुस्तक उदयाच्या परिवर्तनाची नांदी ठरावी.
डॉ. पवार आपल्या भाषणात म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे हिंसेचा ऱ्हास आणि अहिंसेचे प्रत्येक म्हणून समोर येत आहे. स्वतःबरोबर दुसऱ्याचे म्हणणे हे बरोबर असू शकते, दोन्हींचा समन्वय साधला तर नव्याची निष्पत्ती होते, हे यातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
पुस्तकाचे लेखक डॉ. आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की वाढत्या स्पर्धेने, अपयशाच्या धक्क्याने, हादरून गेलेल्या कोपरेपणाच्या भावनेने पछाडलेले माणसाला नवी दृष्टी देण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. जैन दर्शनाचा अत्यंत प्राचीन विचार मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
डॉ. विजय काकडे यांनी प्रास्ताविकामधून, हे पुस्तक सर्वांच्याच दृष्टीने महत्त्वाचे ठराविक असे मत मांडले. तसेच या पुस्तकात अनेकांतवाद याच्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यावेळी डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुरुवातीस ब्र. रावसाहेब चौगुले यांनी उपस्थित आमचे स्वागत केले तर आभार शरद इंजिनिअरिंग कॉलेजचे ग्रंथपाल युवराज पाटील यांनी मांडले. या कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.