Sangli Samachar

The Janshakti News

बंदिशाळेतील एक कैदी - कोऽहम् ?


| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरू - दि. ८ जुलै २०२४
तुरुंगातील जीवन. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सारे नियमाप्रमाणे, बंधनामध्ये. नियम, बंधन मोडले की होणारी मारहाण, काठीने झोडपणे, शिक्षा. सर्व कांही एका चाकोरीत, चौकटीत. या चौकटीतून, बंधनातून बाहेर पडून मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी, मुक्त जीवन जगण्यासाठी सा-यांची धडपड. कांही क्षणांसाठी जरी मुक्तता मिळाली की आनंद, जल्लोश, नाही मिळाली की आरडाओरडा, शिवीगाळी, दंगा, स्वतःच स्वतःला मारून घ्यायचे, जख्मी करायचे, आत्महत्या करायचा प्रयत्न करायचा. पण कांही केले तरी तुरूंगातून मुक्तता होत नाही हे समजले, जाणवले की वाढता अबोला, एकटेपणा, भकास; अश्रु आटलेले डोळे आणि मनात विचारांचा ज्वालामुखी. 

तुरूंगातील कैद्यांचे जीवन व त्यांची मानसिक आंदोलने दाखविणारा मधुर भांडारकरचा ‘जेल’ सिनेमा मी टी.व्ही.वर पाहत असतांना मला ‘जग हे बंदिशाला’ हे गाणे आठवले आणि माझ्या मनात एक विचार आला. 'हे जग जर बंदीशाळा, तर या जगातील मी कोण? एक बंदी, एक कैदी? मी बंदी, कैदी, पण हे कसं शक्य आहे ? मी कुठे तुरूंगात आहे ? मी तर माझ्या स्वतःच्या बंगल्यात पत्नी, मुलांच्यासह राहतो. शिवाय चांगली नोकरी, समाजातील माझे स्थान, मान-मरताब. मला कसले बंधन, कैद कांहीतरीच काय. मी स्वतंत्र आहे, मुक्त आहे. मनाला हायसे करणारा प्रतिसाद माझ्या मनात आला न आला तोच, ..... 

“राजा, तू कैदी नाहीस म्हणजे..... कसल्याही बंधनात नसलेला, स्वतंत्र विचाराने आचरण करणारा, कुणाचेही, कशाचेही बंधन, दडपण न मानणारा, स्वतःला कशातही कोंडून न घेणारा, कसल्याही सीमा, मर्यादा न अडकणारा, कशातही न बांधला गेलेला, गुंतलेला, स्व-विचाराने चालणारा, कुणाचाही अंकुश, गुलामगिरी मानत नसलेला, असा आहेस असे कां सांगायचे आहे तुला? माझ्या मनातील ‘त्या’ नेहमीच्या कोप-यातून आवाज उमटला.
 
“हां, जवळ-जवळ तसेच. अपवाद फक्त, सरकारी नियम, कायदे व सामाजिक बंधनाचा. ती मला पाळावीच लागतात, नाहीतर माझी रवानगी खरोखरच्या तुरूंगात होऊन कैद्याचे जीवन मला भोगायला लागेल” 

माझ्यात मुरलेला पक्का पांढरपेशी नेहमीप्रमाणे गुळुमुळु उत्तरला.

“सरकारी नियम, कायदे वगैरेचे बंधन पाळणे हे ठिक, पण बाकीच्या बाबतीत काय ? तिथे तर तू बंदी, कैदीच आहेस ना ? मला काय सांगायचे आहे हे तुला समजण्यासाठी तुझ्या आजवरच्या वर्तणुकीचा, जीवनाचा आपण संक्षिप्त आढावा घेऊया हं.” 

बोलण्याची, बचावाची कोणतीही संधी मला न देता माझ्या मनातील ‘तो’ कोपरा पुढे बोलु लागला. 

“मला सांग, उभ्या आयुष्यात कधीतरी तू चटकदार कांदाभजी, झणझणीत मिसळीवर, बोंबील-बांगड्याच्या खमंग रश्श्यावर, हैद्राबादी चिकन बि्रयाणीवर उभा-आडवा हात मारलास कां, कधी आवडीचे कपडे वापरलेस कि, रपरप कोसळणा-या पावसात चिंब भिजून आल्यावर कडकडीत ३ एक्स रमचे दोन पेग मारलेस ? नेहमी विचार अपचन होईल, शुगर - बी.पी. वाढेल, घरी समजलं तर काय होईल, लोक काय म्हणतील, आपल्या खिशाला परवडेल कां.....
 
बरं खाण्यापिण्याचे राहुंदे ! तू काय शिकाव, कसे शिकाव, इंजिनीयर-डॉक्टर व्हावं की आणखी कोणी, याचा निर्णय कुणी घेतला?” 

माझ्या मनातील ‘तो’ कोपरा माझ्या असहाय्यतेचा एक-एक पैलू उघडा करू लागला.

“बरं तेही जाऊंदे, लहानपणी, आई-वडीलांच्यावर अवलंबून असल्याने, तुला स्वतंत्र विचाराचे जीवन जगता आले नाही. पण शिक्षण संपल्यावर, तू स्वतः कमावता झाल्यावर तरी तुला जसे जगायचे होते, जे काम करण्याची इच्छा होती ते तरी तू केलेस कां ? नको सांगू. मला माहिती आहे तु कसा जगलास आणि काय केलेस ते. 

सकाळी उठायचे, नैसर्गिक विधी, स्नान आवरायचे. आईने - पत्नीने प्लेटमध्ये दिलेला नाष्टा करायचा. धावत-पळत ऑफीसमध्ये जायचे. मनाला पटुंदे अथवा न पटुंदे बॉसची आज्ञा पाळत तो सांगेल ते काम ‘होयबा’ म्हणत खाली मान घालून करायचे. दुपारी डब्यातील थंडगार जेवण पोटात ढकलायचे. संध्याकाळी दमून-भागुन घरी यायचे. जेवण करायचे. अंगात शक्ति असेल तर बायकोशी 'तो' क्षण उपभोगायचा... तोही अंधारात, अर्धवट कपडे अंगावर ठेऊनच... आणि पोटाजवळ पाय घेऊन झोपी जायचे. 

सकाळी उठून .... रहाटगाडगे सुरू. हां, कधीतरी चवीत बदल म्हणून घरी किंवा ऑफीसमध्ये वादावादी, भांडण तेही आपली कातडी बचावून करायचे किंवा LTC घेऊन पहिला वर्गाचे भाडे मिळत असतांनाही स्लिपरक्लासचे तिकीट काढून प्रवासाला जाऊन यायचे. व्वा, राजा व्वा, ह्या चौकट, चाकोरीबद्ध जीवनाला तू स्वतंत्र, बंधनमुक्त जीवन समजतोस कि काय?” उपरोधाने माझी भंबेरी उडवत माझ्या मनातील ‘तो’ कोपरा माझ्या मुक्त जीवनाच्या चिंध्या करत, पुढे बोलू लागला. 

“बरं, हे ही सगळे तू एक गरीब-बिच्चारा मध्यमवर्गीय पोटार्थी आहेस हे समजून मान्य करूया. अरे पण, कधीतरी रांग सोडून मध्येच घुसणा-या एखाद्या धनदांडग्याला ‘रांगेतून या’ म्हणण्याचे किमान धैर्य दाखवलेस, कि आईच्या मृत्युचा दाखला देण्यासाठी लाच मागणा-या त्या कारकुंड्याविरूद्ध तक्रार केलीस ? की तुझ्या आई-बहिणीची कोणी टिंगल केली, घाणेरडे शेरे मारले तर रक्त उसळून त्या चिलटाच्या थोबाडात दोन सणसणीत ठोसे ठेऊन देण्याचे व पेकाटात चार सणसणीत लाथा घालण्याचे स्वातंत्र्य घेतलेस? मनातल्या मनात जळफळण्याशिवाय, कुढण्याशिवाय वेगळे काय केलेस? कांहीही केले नाहीस!” 

माझ्या मनाचा ‘तो’ कोपरा माझ्या खोट्या, दिखाऊ, वरवरच्या, मुक्त जीवनाची, ढोंगी स्वातंत्र्याची पुरेपुर लत्कर करूनही थांबायचे नांव घेईना. 

“अरे हे तर कांहींच नाही, त्या भगवंताची, परमेश्वराची, जगन्नायकाची आराधना, स्तुती, प्रार्थना मनाप्रमाणे करण्याचे, त्याला ख-या अर्थाने समजावून घेण्याचा विचार तरी तुझ्या मनाला कधी शिवला कां ? या बाबतीतही रूढी, कर्मकांड, विशिष्ट शिकवणुक यांच्या ताठर बेड्यांनी तुला जखडून टाकलेले. आणि हे सारे असुनही .... तू स्वतंत्र, मुक्त, तुझे मुक्त जीवन. छ्छी ऽऽऽ,” सणसणीत तिरस्काराचा एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकून मनातील ‘तो’ कोपरा नाहीसा झाला.

पण जातांना माझ्या मनात विचारांचे वादळ उठवून गेला. वास्तवतेची मला जाणीव झाली आणि मी बेचैन, हताश झालो. टी.व्ही. बंद केला. बंदीशाळा, कैदी यांचा खरा अर्थ माझ्या मनाला ग्रासू लागला.  

नाही समजली मज ही बंदिशाळा
नाही सुटका यातून कधी काळा
रिपु, अहंकार, भिती, धर्म, जातीच्या भिंती
मज माणसास किड्या मकोड्यात बदलती
भ्रमाच्या चक्रव्यूहात माझी वाट मीच हरवली
वर्तुळ मजला झाले प्रिय, फिरत असतो कसा तरी मी
आता नच कधी सुटका, ना कधी तुटणार कडी
मीच निर्मीली ही बंदिशाळा, मनास माझ्या घालूनी बेडी !

माझ्या असहाय्यतेच्या, परावलंबतेच्या, बंधनांच्या, जाणीवेनें, माझ्या मनात नैराश्य, उद्विग्नता, विषण्णता, चिड, विफलता दाटुन आली, आणि मी घराच्या बाहेर पडून फरफटत्या पायांनी रस्ता फुटेल तिकडे दिशाहिनपणे चालु लागलो. कांही वेळाने, माझ्या मनातील ‘तो’ कोपरा परत एक वेळ उगवला व मला म्हणाला, 

“राजा, असे दिशाहिनपणे, पाय फरफटत कुठवर आणि किती काळ चालणार आहेस तू ? ऐक ती पक्ष्यांची किलबिल, रस्त्याच्या कडेला फुललेल्या लहानशा, सुंदर रानफुलांची साद. हृदयात भरून घे कडक उन्हाने तापलेल्या जमीनीवर पडलेल्या पहिल्या पाऊसाच्या थेंबांतून दरवळणारा सुगंध. आईच्या हळुवार मऊ स्पर्शाची आठवण करून देणा-या पावसाच्या धारात घे चिंब भिजवुन स्वतःला. पाहा तो दररोज सकाळी, संध्याकाळी, सोनेरी, गुलाबी, नारंगी रंगाची उधळण करत क्षणाक्षणाला रंग बदलणारा, कॅलिडिओस्कोप, ही सारी सुंदरता याच जगात आहे.

राजा, जाणुन घे हे जग खुप सुंदर आहे. पण, तू स्वतःच तूझ्याभोवती रुढी, जुनाट, कुबट विचार, धर्म-जात-पात, दांभिक मान-सन्मान, .... या सा-यांच्या उंच-उंच भिंती उभ्या करून त्याची ‘बंदिशाला’ बनवली आहेस. अजुनही वेळ गेलेली नाही. थांबव तुझी ही फरफट. खुल्या कर तूझ्या मनाच्या कड्या, तोडून टाक त्या बेड्या, उध्वस्त कर तुझ्या मनाभोवती उभारलेल्या त्या दगडी उंच-उंच भिंती. मुक्त हो, बाहेर पड या सा-यातून आणि जग आयुष्यातील प्रत्येक क्षण ख-या अर्थाने.  

हसावेसे वाटले की दिलखुलास हसावं. रडावसे वाटले तर ओक्साबोक्क्षी टाहो फोडून असा रड, की आभाळ फाटून त्या जगत्जननीच्या डोळ्यांतील अश्रू पावसांच्या धारांच्या रूपात जमीनावर आले पाहिजेत. आणि मग त्या पाऊसाच्या धारात स्वतःला चिंब भिजवून हो शांत. मनापासुन गा जीवनाचे गाणे, आळव त्यातील विविध राग, दाद दे बंदिशीला, तबल्याच्या ठेक्याला, सतारींच्या तारांना आणि आनंद घे ख-या स्वतंत्र, मुक्त जीवनाचा”. 

माझ्या मनाचा ‘तो’ कोपरा अंतर्धान पावला. 
आणि मी जीवनातील संध्याकाळी तरी या ‘बंदिशाले’तुन मुक्त व्हायचे असा विचार करून मी घरी परतलो. 

- आजचे बोल अंतरंगाचे पुर्ण
संदर्भः १. जेल - हिंदी सिनेमा २००९, २. जग हे बंदिशाला, गीत ग.दि. माडगुळकर मराठी सिनेमा - जगाच्या पाठीवर ३. कविता लेखन आधार – जग हे बंदिशाला हे गीत, मूळ रचना स्व. ग.दि. माडगुळकर