| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरू - दि. २१ जुलै २०२४
सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देणा-या घटना फार क्वचित घडतात. पण लहान-सहान घटना नित्य घडत असतात, ज्यांच्या निमित्याने कधी आनंद तर कधी दुःख. कधी मन सुख-समाधानाने भरून जाते तर कधी नैराश्य, वैफल्यग्रस्त होऊन त्रस्त होते.
मला समजायला (?) लागलेल्या दिवसापासून हा खेळ असाच सुरु आहे. दैनंदिन व्यवहारातील या घटनांची मिंमासा योगायोग, नशीब, चमत्कार, पुर्व जन्मीची कृत्य यांच्याशी मी घालत आलो आणि माझ्या विचारांची, दैनंदिन व्यवहारांची दिशा बदलत राहिलो. माझ्या पाऊलांना मी कधी मद्यालयाकडे वळवले तर कधी देवालयाकडे. कधी मी स्वतःला राजा भोज समजतो तर कधी गंगु तेली. पण या सा-यांचे मूळ एकच – माझा सुखाचा, आनंदाचा सतत शोध.
खरं तर, सुख व दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू. भरती नंतर जशी आहोटी, दिवसानंतर जशी रात्र, तसे सुखा मागून दुःख, आणि दुःखामागून सुख येत असते, जीवनचक्र सुरू राहते आणि एका अनोख्या क्षणी थांबते.
माझ्या मनांत विचार आला हे असे कां बरे घडत असावे? बरं हे फक्त माझ्या बाबतीत घडते की इतरांचा अनुभवही असाच आहे? मनांमध्ये उद्भवलेल्या या प्रश्नांची समर्पक उत्तरे देणारी एका कथा एके दिवशी माझ्या वाचनामध्ये आली.
चित्ताख्यान व विवेकशुन्य मनाचे आत्मघातकी
चाळे -1
महर्षि श्री वसिष्ठ प्रभु श्रीरामचंद्राला सांगू लागले, “रामा, एक अत्यंत विस्तृत, भयंकर अरण्यात प्रचंड शरीराचा, हजारो हात, डोळे असलेला एक भयंकर पुरुष राहत असे. त्याच्या हजारो हातामधील मोठमोठ्या शस्त्रांनी तो स्वतःलाच मारून घेई आणि मग भितीने, वेदनांनी किंचाळत इकडुन तिकडे पळत सुटे. पळता पळता कधी तो खोल अंधा-या खड्ड्यात पडे तर कधी, काटेरी वेली, झुडपांत कोसळी. कधी पळत जाऊन कर्दळीवनांत शांत होऊन क्षणांसाठी प्रसन्नता अनुभवी पण लगेचच तिथून बाहेर पडून, त्याचा तो चमत्कारिक क्रम परत-परत असंख्य वेळेला करत राहत असे. जखमांनी रक्तबंबाळ, छिन्नभिन्न होउनही तो कुठे स्थिर होत नसे की त्याला कणभर शांतता मिळत असे. एका क्षणांत तो सुखी तर दुस-या क्षणांत अस्वस्थ, व्याकुळ, अगतिक.
अशा या आत्मघातकी पुरुषाचे हे चाळे मी पुष्कळ काळपर्यंत अवलोकन केले आणि एके दिवशी योगबलाने त्याला अडवून विचारले:
"बाबा रे, तू कोण आहेस? असले विचित्र, घातकी वर्तन तू कशासाठी करतो आहेस? असे करण्यातून तूला काय मिळते?"
माझे प्रश्न ऐकताच तो प्रचंड शरीराचा, हजारो हात, डोळे असलेला भयंकर पुरुष रागावला व मला म्हणाला,
"तरू येथे आलास, मला पाहिलेस. माझ्या स्वैर भटकण्यात तुझ्यामुळे बाधा आली. माझे मरणच ओढल्यासारखे वाटत आहे."
दुःखाने त्यांने आपल्या जखमी, विकल, छिन्नभिन्न शरीराकडे पाहिले आणि दीनवदनाने गळा काढून तो रडू लागला. पण लगेच रडे आवरून, त्यांने पुन्हा आपल्या शरीरावरून दृष्टी फिरवली व मोठ्याने हसत एक आरोळी मारली. त्याचे एकेक अवयव गळून खाली पडले. आपले अवयव विसर्जित करून तो पुरूष कोणा नियतीच्या ओढीने कोठेतरी निघून जाण्यास सिद्ध झाला.
रामा, हे जग म्हणजेच ते महाभयंकर अरण्य.
अरण्यात आत्मघातकी चाळे करत फिरणारे तो प्रचंड पुरूष म्हणजे चंचल, अस्वस्थ मन.
हजार हात, डोळे म्हणजे चित्ताच्या, मनाच्या असंख्य वृत्ती व अवयव व अंग म्हणजे विषय व विषयांच्या इच्छा.
स्वतःच स्वतःला मारून घेणे म्हणजे मनाच्या कुकल्पनांनी, परस्परविरूद्ध विचारांच्या आघातांने स्वतःला क्षीण, कुमकुवत करणे.
अंधारी खोल खड्डे म्हणजे नरक.
काटेरी झुडपे म्हणजे आसक्ति, ओढ व कर्दळीवन म्हणजे मनाला आल्हाद देणारा स्वर्ग.
‘मनांला’ पाहणारा ‘मी’ म्हणजे ‘विवेक’.
‘तू, मला पाहिलेस, त्यामुळे माझ्या स्वैर भटकण्यात, सुखदुःखात बाधा आली. माझे मरण ओढल्यासारखे मला वाटत आहे’ असे म्हणणारा पुरूष म्हणजे तत्वबोधाने क्षीण झालेले मन.
त्या पुरूषाची अंगे नष्ट होणे म्हणजे विषय व विषयांच्या इच्छा नष्ट होणे.
अंगे नष्ट होतांना मोठ्याने रडणे म्हणजे पुर्ण ज्ञान झाले नाही अशा मनाला विषय, विषयांच्या इच्छेचा त्याग करतांना होणारे क्लेश, दुःख.
तर शरीरावरून दृष्टी फिरवत मोठ्यांने हसणे म्हणजे ज्ञानप्राप्तीमुळे सर्व दुःखांचा नाश होऊन हर्षित, आनंदी झालेल्या चित्ताची, मनाची स्थिती...”
चित्ताख्यानाची ही कथा इथे पूर्ण झाली आणि जीवनामध्ये असणा-या दुःखाचे कराण मला समजले.
मला समजले, जीवनातील दुःखाला मनाची चंचलता, अस्वस्थता, विषय व विषयांच्या इच्छा, आसक्ति, ओढ, कुकल्पना, परस्परविरूद्ध विचार कारण आहेत.
ही कथा वाचल्याला बराच काळ लोटला त्यानंतरच्या काळात अशा अनेक कथा मी वाचल्या व त्या सा-यांचे सारही मला समजले.
मला समजले, जीवनामध्ये आपल्याला जर आनंद, सुख-समाधान हवे असेल तर, आपल्या चंचल, स्वैर मनाच्या विचारांना, आचारांना, सवयींना, व्यसनांना आत्मपरिक्षणाच्या कठोर छन्नीने तासले पाहिजे. विवेकाने विचार करून वागले पाहिजे, तरच शेवटचा दिस गोड होतो.
हे सर्व मला समजले, पण आज वयाची साठी उलटून गेली आहे, तरीही माझ्या मनाचा सुख-दुःखाच्या उनपाऊसाचा खेळ अजून सुरूच आहे कारण .... मन माझे ओढाळ ओढाळ हेच खरं!
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण
संदर्भः 1 ‘चित्ताख्यान, विवेकशुन्य मनाचे आत्मघातकी चाळे’, कथा आधार - यशवंत प्रकाशन, पुणे प्रकाशित ‘सुबोध योगवासिष्ठ, श्री वसिष्ठ - राम संवाद’, लेखिका - प्रा. सुमन दत्तात्रेय महादेवकर