| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २३ जुलै २०२४
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील एक झुंजार व आक्रमक नेता म्हणून ओळख असलेल्या रविकांत तुपकर यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेतून ही घोषणा केली. यावेळी बोलताना जालिंदर पाटील म्हणाले की तुपकर हे गेल्या तीन-चार वर्षांपासून संघटनेच्या एकाही आंदोलनात सहभागी झालेले नव्हते. उलट स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठीवर बिन बोर्डाचे आरोप करीत होते त्यामुळे यापुढे शेतकरी संघटना आणि तुपकर यांचा कोणताही संबंध असणार नाही.
रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमातून आलेल्या बातम्यामुळे सर्वत्र होत होती. यानंतर रविकांत तुपकर यांनी ट्विट करीत, "संक्रमण होणार याची खूण ओळखतो, पावसाळा आणि उन्हाळा जून ओळखतो... माहिती आहे मला पुढची तुझी खेळी मी तुला आतून बाहेरून ओळखतो !" या कवितेतून राजू शेट्टींवर आक्रमक पद्धतीने आघात केला होता. याच पोस्टमध्ये त्यांनी सुरेश भट यांची 'विझलो जरी आज मी'... ही कविता सादर केली होती.
दरम्यान रविकांत तुपकर यांनी आपण 22 वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जीवाचे रान केले परंतु राजू शेट्टी आणि माझ्या दुरावा का निर्माण झाला हे आपणास ठाऊक नाही. 24 जुलै रोजी आम्ही बैठक बोलावली असून त्या बैठकीत पुढे निर्णय घेऊ असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.