| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जुलै २०२४
जिल्ह्यातील पूर परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. यदा कदाचित पुढील काही दिवसात पूरस्थितीचे संकट उद्भभवल्यास याचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून सैन्य दलाची एक तुकडी आज जिल्ह्यात दाखल झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली आहे. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्या पावसाचे प्रमाण तसेच कोयना धरणातून विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले असले तरी गाफील राहून चालणार नाही. शनिवार व रविवार या दिवशी अधिक पर्जन्यमान झाल्यास आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकेल. आपत्कालीन स्थिती उद्भभवल्यास जिल्हा प्रशासन त्याचा मुकाबला करण्यास समर्थ आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सदैव तयार आहोत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
या सैन्य दलाच्या तुकडीत सुमारे ९० जवान आणि १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिली. या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, आदी उपस्थित होते.
नागरिकांच्या मदतीकरता आम्ही तत्पर आहोत. आर्मीच्या (सैन्यदल) वतीने आम्ही सर्वस्वी योगदान देऊ, अशी ग्वाही मेजर संकेत पांडे यांनी दिली. यावेळी मेजर विनायक, लेफ्टनंट आदित्य पुष्करनाथ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, तहसीलदार लिना खरात यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.