Sangli Samachar

The Janshakti News

सरदार पाटील यांच्यासाठी खणलेला राजीनाम्याचा खड्डा आ. विक्रमसिंह सावंत यांच्यासाठीच धोक्याचा ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जुलै २०२४
'दुसऱ्यासाठी खणलेले खड्ड्यात पडण्याची वेळ स्वतःवरच येऊ शकते !' या म्हणीचे अनुभव सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार केला म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सिंह सावंत यांनी सरदार पाटील यांना मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदाचा राजीनामा देण्याचा आदेश नुकताच दिला. सरदार पाटील यांनी हे कुठलीही खळखळ न करता तो सादरही केला.

जिल्हा परिषदेत भाजपने सभापतीपदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्याने नाराज झालेले सरदार पाटील काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. विक्रमसिंह सावंत यांच्यामुळे त्यांना जिल्हा बँकेत स्वीकृत सदस्याची लॉटरी लागली. परंतु लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा आ. सावंत यांचा सल्ला न मानता सरदार पाटील यांनी विशाल पाटील यांच्या ऐवजी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार केला. त्यामुळे आ. सावंत यांनी पाटील यांना जिल्हा बँकेच्या स्वीकृत सदस्य पदावरून राजीनामा देण्याचा आदेश दिला. आता हाच आदेश आगामी विधानसभा निवडणुकीत कोलदांडा बनून त्यांच्याच विजयाआडचे कारण बनू शकते.

सरदार पाटील यांनी हा राजीनामा देत असताना उपस्थित केलेले मुद्देच कळीचे ठरणार आहेत. काँग्रेस ज्या महाविकास आघाडीत आहे त्या आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील होते. मात्र, त्यासाठी राजीनामा न मागता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार का केला नाही म्हणून राजीनामा मागणे कितपत योग्य आहे ? असे सरदार पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आ. विक्रमसिंह सावंत यांच्या पाठीशी उभे राहणार का ? त्यामुळे सरदार पाटील यांच्या पाठीशी असलेल्या यांच्या फळीमुळे आ. सावंत यांच्या विजयासाठी धोकादायक ठरणार का ? याची उत्तरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येतील. परंतु या पार्श्वभूमीवर सध्या जत विधानसभा मतदारसंघात आ. सावंत यांच्या बद्दल 'दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतःलाच पडण्याची वेळ येते !' अशी चर्चा सुरू आहे.