| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जुलै २०२४
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून लोकप्रिय घोषणा केल्या जात असून, लाडकी बहीण, लाडका भाऊ, यानंतर लाडकी आजी, लाडके आजोबा अशा अनेक योजना येण्याची शक्यता आहे, जनतेने आपली दिशाभूल होऊ नये याकडे पहावे. झोपलेले राज्य सरकार लोकसभेनंतर जागे झाले आहे, अशी खरभरी टीका माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगली येथे बोलताना केली.
आ. जयंत आजगावकर यांच्या स्थानिक निधीतून सांगली जिल्ह्यातील 640 शाळांना आज प्रिंटरचे वितरण करण्यात आले, या कार्यक्रमात डॉ. विश्वजीत कदम बोलत होते. आ. विक्रम सावंत, आ. सुमनताई पाटील आ. अरुण लाड, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख दिगंबर जाधव आधी उपस्थित होते.
शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यातून मार्ग काढायला धमक लागते. आम्ही त्यासाठी आंदोलने केली, पाठपुरावे केले, यापुढेही आम्ही यासाठी निर्णय घेऊ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
पश्चिम महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा आणि शिक्षणाचा वारसा आहे असे सांगून आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, इथे शिक्षण संस्थांचे जाळे आहे. शिक्षण व्यवस्थेत चांगले काम करण्यासाठीच आजगावकर यांना संधी दिली आणि त्याने या संधीचे सोने करून दाखवले आहे. गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात खूप बदल झाले आणि दुर्दैवाने जे गडाला नको ते घडू लागले आहे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
खा. विशाल पाटील यावेळी आपल्या मनोगत म्हणाले की, यापूर्वी शिक्षक आमदार कोण आणि ते काय काम करतात हे माहितीच पडायचे नाही. आजगावकर यांनी आपल्या कामातून ते दाखवून दिले असे सांगितले. शिक्षण पद्धतीत बदल होत असताना, या व्यवस्थेला उद्या काय हवे आहे याचा विचार करून योजना राबविण्याचे गरज असल्याची अपेक्षा खा. विशाल पाटील यांनी व्यक्त केली व यासाठी आवश्यक निधी वाढवावा लागेल असेही ते म्हणाले.
खा. विशाल पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा एकत्रित जाहीर कार्यक्रम असेल तर एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली जातात. खा. विशाल पाटील आ. डॉ. यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करतात, यावेळी हसत हसत आ. डॉ. विश्वजीत कदम वस्तुस्थितीची जाणीव करून देत त्याचा इन्कार करतात.मैत्रीची ही जुगलबंदी या कार्यक्रमातही दिसून आली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीस उपस्थितांच्या नावाचा उल्लेख करताना खा. विशाल पाटील यांनी आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा उल्लेख भावी 'पालकमंत्री-मुख्यमंत्री' असा केला, हा धागा पकडत आपल्या भाषणात बोलताना आ. डॉ. विश्वजीत कदम पत्रकारांकडे पाहत हसत हसत म्हणाले की, 'पत्रकारांनी, विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी याची ब्रेकिंग न्यूज करू नये.' विशाल पाटील आणि आमचं सध्या जिव्हाळ्याचं नातं आहे. मी मुख्यमंत्री व्हावे, ही त्यांची मनापासून इच्छा आहे. सांगलीकरांच्या वतीने ते नेहमी आपली भावना प्रेमाने व्यक्त करतात, परंतु यामुळे तुम्ही बातमी लावाल आणि सारे हात धुवून आमच्या मागे लागतील, असे वक्तव्य करताच उपस्थितातून हास्याच्या कारंजा उडाल्या.
सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. विक्रम सावंत यावेळी बोलताना म्हणाले की, शिक्षण खात्यात रोज नवनवीन अध्यादेश निघत आहेत त्यात वारंवार बदल होत आहेत. मराठी, इंग्रजी, कन्नड अशा माध्यमांच्या शाळांमध्ये, त्या त्या भाषेतील तज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली जाणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा केला परंतु अद्यापही याबाबत निर्णय होऊ शकला नाही. माध्यमिक शाळा समोर अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी संयुक्त बैठकीची गरज व्यक्त करून दुर्गम भागातील शाळांना प्रोजेक्टर देण्याचे सूचना आ. सावंत यांनी यावेळी बोलताना केली.